वैदिक विवाह विधी: Page 3 of 9

सामाजिक गोष्टींचा संकर झाला होता. तो साफ खरचटून निराळा काढला आणि संस्कारसिद्ध व कायद्याचे परिपालन या दृष्टीने वेदांत व वेदसंमत गृह्यादि सूत्रांत जेवढा भाग आढळला, तेवढाच सुसंगत रीतीने संशोधन करून तो हिंदुजनांच्या चरणी सेवेला अर्पण केला आहे.

विवाहविधीत येणे प्रमाणे कर्मानुक्रम सिद्ध केला आहे – (१) आवाहन (२) अनुमति (३) मधुपर्क (४) कन्यादान (५) कन्याप्रतिष्ठा (६) पाणिग्रहण प्रतिज्ञा (७) विवाहहोम (८) लाजाहोम (९) सप्तपदी (१०) गृहप्रवेश व (११) शान्तिसूचक. या विधिविषयी लिहिताना खुद्द कै.वैद्य २३-१२-१९१८ च्या हिंदु मिशनरीत म्हणतात - ‘‘हा विधि आम्ही पुरा जुन्या संप्रदायातून घेतला. तो तपासून पाहताना छापलेली पुस्तके पाहिली व तोंडी माहिती विचारली...... सावधान चित्ताने विधीचा एक एक भाग संशोधून पाहिला. संशोधनकर्म पुरे झाले व ओम तत्सद ब्रह्मार्पणामस्तु हे अन्त्यवचन लिहिले गेले त्यावेळी गुरुवार तारीख १९ डिसेंबराच्या (१९१८) रात्री १।। वाजला होता. अनेक दिवसांची चिंता अंत पावली व आमचे चित्त स्वस्थ झाले. मद्रास व म्हैसूर येथून दोन पुस्तके मिळाली. मद्रासचे पंडित ए. महादेव शास्त्री यांनी उपयुक्त माहिती पाठविली आणि ‘आणखी’ लागेल ती माहिती विचारा असे त्यांनी लिहिले. बळवंतरावजी टिळकांनी विलायतेस जाताना चार पुस्तके दिली ती उपयोगी पडली. वामनशास्त्री किंजवडेकर यांचा ‘संस्कार मीमांसा’ नामक नूतन ग्रंथ पाठभेद तपासताना व मंत्राचा अर्थ लावताना फार उपयोगी पडला. सर्व मंत्र, सापडले तितके, मूळच्या वेदग्रंथांत तपासून पाहिले व पाठभेद दिसला तेव्हा विचार करून मूळचा पाठ आम्ही घेतला. कायद्याच्या कोर्टात हिंदुविवाहविधीचा कोणता भाग आवश्यक लागतो त्याची चौकशी केली, तेव्हा दानप्रतिपह, विवाहहोम आण सप्तपदी इतकी तीन विधिकर्मे झाली म्हणजे काम होते असे समजले, ...... मूळ तेवढे आम्ही ठेवले आणि आगंतुक भाग काढून टाकला. रूढीजन्य भाग काढून टाकला तेव्हा थोडे जड वाटले, तरी भावी काळाकडे व तत्त्वांकडे पाहून शस्त्रवैद्याप्रमाणे प्रेमाची सुरी हातात घेऊन अति निष्ठुर प्रेमाने आम्ही शस्त्रप्रयोग केला. याचा उपयोग पुष्कळांना होईल आणि सुविद्य जनांना साध्या विधीपासून समाधान होऊ लागेल.’’ सांप्रतच्या रूढ विवाहविधीत अनावश्यक सामाजिक गोष्टींनी भयंकर घोटाळा उडविला आहे व त्यामुळे विवाहविधीचा शुद्ध हेतु व संस्कारपरिणाम साफ विनष्ट झाला आहे. इतकेच नव्हे तर खुद्द विवाहपद्धतसुद्धा उलटीपालटी होऊन बसली आहे, हे किंचित चिकित्सक दृष्टीने प्रचलीत विवाहविधी पहाणारांच्या तेव्हाच लक्षात येण्यासारखे आहे.

जिज्ञासु तरुणांनी व विचारवंत पोक्त जनांनी या बाबतीत विचारणा करणे आवश्यक आहे. कै. गजाननराव वैद्य म्हणतात - ‘‘मराठी प्रांतांत सांप्रत जो विवाहविधि होतो तो अशास्त्र असलेला दिसतो. छापील पुस्तके पाहिली तर त्यात कोठेही विधिकर्माची व्यवस्थित मांडणी केलेली दिसत नाही. प्रत्यक्ष व्यवहारांत अंतर्पाटापासून आरंभ होतो आणि मंगलाष्टक नामक आशीर्वादाचे (?) आठ श्लोक पुरोहीत म्हणतात आणि ‘लग्न लागले’ असे समजून साक्षीजन निघऊन जातात. अहो, जेथे ‘कन्या देतो’ असे कन्यादान झाले नाही आणि वराने ‘घेतो’ म्हटले नाही, तेथे ‘लग्न लागले’ कोणाचे आणि कोणत्या मंत्रानी? याचा विद्वज्जनांनी विचार करावा.’’ हे मंगलाष्टकाचे खूळ आणि त्यामुळे सबंध विधीची झालेली अमंगल उलथापालथ पाहून एकही विचारी हिंदूच्या चित्ताला संशयाचा धक्का बसू नये किंवा हे असे का? विचारण्याचे धैर्य होऊ नये या स्थितीला मानसिक गुलामगिरीपेक्षा दुसरे काय नाव द्यावे? कै. वैद्य पुढे म्हणतात, ‘‘बहुतेक सर्व साक्षीदार निघून गेल्यावर’’ ‘कन्यादान + होम + सप्तपदी = विवाह’ हा त्यंत महत्त्वाचा प्रकार कसा तरी होत असतो. त्यावेळी वधूवरांपाशी थोडीच माणसे असतात व बाकीचे, विवाहाला (म्हणजे कन्यादान + होम + सप्तपदी) याला साक्षीस रहाण्यास आलेले जन नारळ घेऊन परतलेले असतात किंवा भोजनकर्मात गुंतलेले असतात. आमच्या सुंदर विधीची अशी ही दुर्दशा असावी ना? विद्वजनहो जरा इकडे पहा तरी?’’ वधुवरांच्या कुंडल्या एकमेकांशी घासून त्यांतून षडाष्टके खडाष्टके एक नाडी दोन