वैदिक विवाह विधी

हे पुस्तक थेट प्रबोधनकारांनी लिहिलेलं नाही. हे पुस्तक आहे आद्य हिंदू मिशनरी गजाननराव वैद्य यांचं. प्रबोधनकार त्यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीमुळे खूप प्रभावित होते. वैद्य यांनी तयार केलेल्या वैदिक विवाह विधीनुसार आजही लग्न होतात. हा विधी पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. ते या पुस्तिकेचे संपादक होते. या पुस्तकातला विधी आणि मंत्र न देता केवळ त्याविषयीचं प्रबोधनकारांचं लेखन सोबत देत आहोत.

हिंदुजनातील असंख्य जातीत विवाहविधीच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत. सर्वात जर काही विधिसाम्य दिसतच असले तर ते ‘शुभमंगल साSवधान’मध्ये दिसते; की कशास काही मेळ नाही. खुद्द ब्राह्मण म्हणविणारांत सुद्धा पद्धतीची एकवाक्यता नाही. यजुर्वेद्यांच्या चित्पावनांशी जुळत नाहीत, चित्पावनांच्या देशस्थांशी पटत नाहीत व दैवज्ञांच्या विश्वब्राह्मणांहून भिन्न. हाच प्रकार इतर सर्व जातींतून पहावयास मिळतो. पेशव्यांच्या दप्तरात कोणकोणत्या जातीच्या नवरदेवाची वरात कशाकशावर बसवून काढावी, याचे निर्णय झालेले कागदपत्र पाहिले तर, कोणाची वरात घोड्यावर, कोणाची खेचरावर, कोणाची बैलावर, कोणाची पालखीत, कोणाची माणसाच्या डोक्यावर, तर कोणाची पायी, असे अनेक प्रकार त्यात दिसतात. (बिचा-या गाढवाची मात्र सोय कोठेच लागली नाही!)

सारांश, मुसलमान, पारशी, यहुदी, क्रिस्ति म्हटला म्हणजे त्याच्या विवाहविधीची एक ठराविक पद्धत असते, तसा प्रकार हिंदुजनात नाही. सर्वसाधारण साम्य जर हुडकूनच काढले तर बहुतांशी ते ‘शुभमंगल साSSवधान’ या मामुली बेंडबाजा पद्धतीत दिसते. कित्येक जातीतील लग्नविधी तर इतक्या चमत्कारिक पद्धतीने होतात की ते पाहून शिसारी आली नाही, तरी हसू आल्याशिवाय राहत नाही. शिवाय भिक्षुक भटजींच्या अकलेचे व विद्वत्तेचे तारे तुटतात, त्याचा महिमा सहस्रमुखी शेषाच्या बापाला सुद्धा वर्णन करिता यावयाचा नाही. एका उच्चवर्णीय तरुणाच्या लग्नसमयी भटजीने ‘शांताकारं भुजगशयनं’ श्लोक सात वेळा महणून सप्तपदीचा विधी उरकलेला आम्ही स्वतः पाहिला. प्रत्यक्ष विधीच्या वेळी काही बोलण अप्रशस्त, म्हणून त्या वेदशास्त्रखंकाची खासगी गाठ घेऊन कानउघडणी केली. तो म्हणाला, ‘चाललं आहे झालं. यजमानाला विधघीचे ज्ञान नसतं म्हणून आमच्या सारख्याचे भागते. तुम्ही विधी समजून उमजून करण्याइतके हुशार बनलात, मग तुमचे सर्व विधि चालवणारे भटजीही तसेच विद्वान मिळतील.’ भटजीचे हे म्हणणे अगदी रास्त आहे. विवाहविधी, त्याची आवश्यकता, त्याचे पावित्र्य व जबाबदारी या विषयींच्या ज्ञानाची हिंदुजनांना तिळमात्र क्षिति वाटत नाहीशी झाल्यामुळे, भट सांगेलत्या च-हाटाला वेदवाक्य मानून लग्नविधिचा खटाटोप कसा तरी चटावर आटपून घेण्याकडे त्यांची प्रवृत्ती बेताल झाल्यास काही आश्चर्य नाही. लग्नविधि आणि सामाजिक उन्नती यांचा परस्परसंबंध अत्यंत निकटचा आहे; इतकेच नव्हे तर, या विधीच्या शुद्धतेकडे जनतेचे लक्ष जसजसे जाईल तसतसे आमच्या अंगी खिळलेले व राष्ट्रोन्नतीला घातक होणारे अनेक सामाजिक दोष आपोआप नष्ट होतील.

हिंदुजनातल्या लग्नविधीत जे भिन्न भिन्न प्रकार दिसतात म्हणून वर म्हटले आहे, त्यांचे नीट परीक्षण करेल तर असे स्पष्ट सिद्ध होते की हे प्रकार धार्मिक नसून शुद्ध सामाजिक आहेत. त्यातही पुन्हा प्रांतविशिष्ट कल्पना, कौटुंबीक रूढी, परिस्थितीमुळे कधीकाळी जडलेल्या किंवा मुद्दाम लादलेल्या रीतीभाती यांचेच प्राबल्य फार. अर्थात् या गोष्टींना धर्मशास्त्राची मान्यता मुळीच नसते. उदाहरणार्थ, पाठारे प्रभूजनांचे उपनयनविधि घराच्या मागल्या दरवाज्याकडे होतात. याला कारण पेशवाईत त्यांच्यावर झालेल्या एका भयंकर ग्रामण्याचा परिणाम. यात धर्म कसला? परंतु त्यांचा हा क्रम जणू काय एखाद्या धर्माज्ञेप्रमाणे अजूनपर्यंत आहेतसाच चालू आहे. संशोधनाची वृत्ती जागृत होईपर्यंत मागील दारचे उपनयनविधि पुढील दारापर्यंत कशाचे धूम ठोकणार? बहुतेक ब्राह्मणातले विवाह माजघरात उखळावर लागतात, साक्षीजन बाहेर मंडपात गप्पा ठोकीत बसलेले असतात आणि तिकडे मंगलाष्टकांची नाटकी कवाईत होऊन भटजीने ‘जयघंटा’ म्हटले की ताशांच्या खडखडाटात साक्षीजन टाळ्यांचा कडकडाट करून ‘लग्न झाले’ असे प्रदर्शित करितात. कायस्थ प्रभूंत उपनयन विवाहादी विधि साक्षीजनांच्या समक्ष भर मंडपात करावे लागतात; परंतु बंगाली कायस्थांत पडद्याची रानटी पद्धत जूनही असल्यामुळे त्यांच्या विवाह विधीत एक प्रकारचा रजपुती इस्लामी धाटणीचा