संगीत विधिनिषेध: Page 6 of 34

बाळगलीत, त्यानं नाही का तुमच्या घराण्याचं नाव बुडालं ? पुराणे- मग मी काय बायकोशिवाय राहूं वाटतं ? मला पेनशनर वयस्काला कोण देणार आपली मुलगी ? म्हणून ठेवली त्या घारीला घरट्यात आणून. भैरव- पण लोक काय बोलतात ? पुराणे- लोक लाख बोलतात, झक मारतात. आमच्या अडचणी आम्हाला माहीत. भैरव- शान्तीच्या अडचणी शान्तीला माहीत. पुराणे- म्हणून काय बालविधवा कुंकू लाऊन, बापाची जाहीरात देत शहरभर फिरेल ? भैरव- बापाची का मेल्या नव-याची, कुणी सांगावं ! तुम्हाला जर इतक्या उतार वयात अन्तराळी गिरक्या भिरक्या मारायला एक घारी घार लागते, तर शान्तीला नको का एकादा गटर्घुम पारवा शेजारी घुमायला. पुराणे- म्हणजे ? ती कारटी पुनर्विवाह लावणार की काय ? भैरव- गुपचूप अंगवस्त्रे बाळगणा-या संभावीत पुराण्यापेक्षां उघड पुनर्विवाह लावणारी त्यांची मुलगी खास लोकादराला पात्र होईल. पुराणे- त्या सटवीला म्हणावं, लाव पाहू कसा पाट लावतेस ती ! कुत्र्याची पुडी घालून त्या नव-याला ठार मारीन. पुराण्यांच्या घराण्यात पाट ? भैरव- पाट लावला नाही, तर पोट पाडील. पुराणे- पोट पाडले तरी परवडले— भैरव- आहेच तुमची घारी, पण्ढरीची वारकरी. पुराणे- पण पाट लावलेला नाही मला खपायचा. भैरव- पण तिला खपला तर ! ती आता काही मायनॉर नाही, मेजॉर आहे. पुराणे- मेजॉर असो, नाही तर कॅपटन असो, मी तिचा बाप आहे बाप.- बेफाम कारटी. आंगाची अशी आग होते कीं आता माझ्यासमोर आली तर – अशी नरडी दाबून जीव घेईन. कुंकू लाव, पाट लाव. ( भैरवाची नरडी दाबतो. तो “ मेलो मेलो- धावा धावा ” ओरडतो. डॉक्टर प्रवाळ व बॅरिस्टर विवेकराव धावत येऊन भैरवला सोडवतात. ) पुराणे- कुंकू लावायला पाहिजे- पाट लावायला पाहिजे- प्रवाळ- अहो रावसाहेब, डोळे उघडून पहा नीट. हा भैरव-भैरव. कसले कुंकू ? कुणाचा पाट ? भैरव- गंडांतर टळलें ! वा रावसाहेब, छान नाटक केलंत. शांति समजून माझीच मानगटी दाबलीत. आपण धावून आलात म्हणून ठीक, नाहीतर गोव-यांआधींच मी नदीचा काठ गाठणार होतो. विवेक- पण रावसाहेब इतके का बिथरले ? भैरव- यांच्या विधवा मुलीनं अलीकडं कुंकू लावण्याची केली आहे सुरूवात— विवेक- मग त्यांत काय बिघडलं ? पुराणे- त्यात काय बिघडलं ? सुधारकच दिसता हो तुम्ही ! प्रवाळ- रावसाहेब, पोरीच्या कुंकवांत कशाला घालता एवढं लक्ष्य ? पुराणे- मी काय माथेफिरू वेडा आहे वाटतं ? काय मी पायात पागोटं घातलं, कां डोकीवर वाहाणा घेतल्यात ? प्रवाळ- घेतल्या नसाल तर आता घ्याल. शान्ति समजून भैरवाच्या बोकांडी बसलात ! वेडाला आता शिंगं का उरली ? पुराणे- सुधारकांशीं बोलण्याची माझी इच्छा नाहीं. स्वराज्य तुम्हीच बुडवलं न् परक्यांना तुम्हीच घरांत घेतले. पाजी-चोर-सुधारक-कम्युनिष्ट. [जातो] प्रवाळ- भैरव, जा त्याच्या पाठोपाठ. नीट घरी पोचव. वेताळ भडकलाच, तर मला कळव, म्हणजे या म्हसोबाला ठाण्याच्या गोठ्यांत नेऊन ठाणबंद करतों. ( एक पान गहाळ ) प्रवाळ- तशी ती पडली नाहीच. लग्नातच या बाळानं आपल्या अकलेची धुळवड केली. सारा युरप पायदळी घातला, पण त्याच्या पिण्डाचा हिंदुपणा नाही गेला. विवाहात सगळे जुने चोचले. वरात आल्यावर, डोक्यावर झाल धरून सगळ्या मानकरी मण्डळींच्या माण्डीवर वधूला बसवून तिच्या तोण्डात साखर कोम्बम्याचा एक बाष्कळ विधि करतात, तो तुझ्या पाहण्यात असेलच. क्रान्तीसारख्या ग्रॅज्वेट प्रौढ वधूला तो कसा आवडणार ? तिने स्पष्ट नकार दिला. झालं सनातन्यानं जमदग्नीचा आव आणून, क्रान्तीची भरमण्डळीत निर्भत्सना केली. तिनेही उलट या स्वदेशी म्हसोबाचे कान तिथच्या तिथे उपटून हातात दिले, अन् तडक बापाच्या घरचा रस्ता सुधारला. विवेक- क्रान्तीची उष्टी हळद सनातन्याला चोपडणारांच्या अकलेचं दिवाळंच वाजलं म्हणायचं. पुढं काय झालं ? प्रवाळ- त्या दिवसापासून क्रान्ति सनातन्याला मेली न् सनातन्या क्रान्तीला