संगीत विधिनिषेध: Page 5 of 34

कशाला लोकांना ? भैरव- तेवढीच बेरोजगा-यांच्या संख्येंत घट होईल. तोण्डं पाहण्यापेक्षां चांभारचौकशा ब-या. आमच्या वाचाळपुरीला बेरोजगारीचे वावडे फार. नोकरी धन्दा नसला, तर घरचं खाऊन लष्कराच्या भाक-या भाजतील. पण आढ्याला तंगड्या लाऊन स्वस्थ बसणार नाहींत. इथल्यासारखा उद्योग जगात दुसरीकडं कुठेंहि आढळायचा नाहीं. पानसुपा-या, पुराणं, प्रवचनं, प्रदर्शनं, परिषदा, पिक् पॉकेटिंग, पकडापकडी, सारखा पकारी, प्रवाह चालू असतो. फार उद्योगी ! शान्ति- अमूक एक कुमारी, म्हणून तिच्याशीं लग्न लावायला कुणी पुढं होत नाही. भैरव- शान्ता शान्ता, ही तरूणांची शुद्ध बदनामी आहे. आगळिकीशिवाय आमच्या कोमल भावना दुखावणारा खेटरप्रहार आहे. मोटेच्या बैलाप्रमाणे हा आरोप मागे घे. नाहीतर अस्साच तडक जाऊन चव्हाट्यावर उपासमारीचा जाहीर धिंगाणा करीन. मग गांधीच्याही मध्यस्थीचा मुलाजा राखणार नाही.—कुमारिकांचे पाणिग्रहण करायला म्हणे तरूण पुढे होत नाहीत ! पुढें व्हायचे कसे ? त्याच तुरतुर तो-यानं सारख्या पुढंपुढं पळतात, तर त्यांच्या मागेमागे जाण्याशिवाय आमच्या हातात- नव्हे पायात काय असणार ? म्हणे तरूण पुढें होत नाहीत. शेंकडो होतील- नव्हे होतात, पण कुमारीच माघार घेतात. क्रान्ति- जे तरूण पुढे येतात, ते हुण्ड्याचा मलिदा खायला येतात. भैरव- शेण खायला येतात, पण येतात ना ? क्रान्ति- चवली पासून रूपया इतक्या कुंकवाचे टिकले लावणा-या बाया, म्हणजे जित्या नव-याच्या जित्या प्रॉपर्ट्या. हे समजून उमजून सुद्धा त्याच्याकडं काण्या डोळ्यांच्या नजरफेकी करायला पुरूषांना लाज नाहीं कारे वाटत भैरव ? भैरव- बायका जर पुरूषाकडं चोरट्या नजरेनं पाह्यला चुकत नाहींत, तर पुरूषांना त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायला लाज कसली ? शिवाय, कवि चित्रकार न् लेखक याना या नजरफेकीचा अधिकारच असतो. शान्ति- सारेच पुरूष काही कवि चित्रकार न् लेखक नसतात. कुंकवाच्या लाल बावट्याची सुद्धा तुम्हाला भीति वाटत नाही, तर मेल्यांनों तुमच्या वाह्यात नजरफेकीनं, आम्हा विधवांची काय तिरपीट उडत असेल, याची कल्पना तरी करून पहा. क्रान्ति- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. भैरव- त्यासाठी काय विधवेच्या पोटीं जन्म घेतला पाहिजे ? शान्ति- त्यासाठी विधवेचा जन्म घेतला पाहिजे. भैरव- विधवेचा जन्म ? जन्मताच कोण कशी विधवा होऊ शकेल ? कुमारीचा जन्म घेऊन, मग मुद्दाम विधवा बनलं पाहिजे, असं तरी म्हण. क्रान्ति- अनाथ विधवेला माणुसकीच्या कळवळ्यानं, सनाथ करायला तर कोणी पुढं व्हायचं नाही- शान्ति- उलट, कुत्सित बुद्धीनं, बेवारशी चीज म्हणून हवे ते पुरूष त्या बिचारीकडं चारगट नजरेने टौकारून पाहातात. म्हणून म्हणते, कपाळी कुंकवाचा टिकला असला, तर तेवढाच त्यांच्या चारगटपणाला आळा बसेल. भैरव- हां हे मात्र खरं आहे बुवा. कुंकवाच्या लाल बावट्याला लोक थोडेसे भितात. पण पाण्ढ-या बावट्याला पाहाताच, डोळेफेकीची मेलगाडी भरधाव त्या फीमेलवर सोडतात. क्रान्ति- कशाचे मेले लाल बावट्याला भितात ? डोक्यापासून पायापर्यंत ताम्बडे लुगडे पांघरलेल्या तरूणीकडे तर मेले अधिकच टौकारून पाहतात. भैरव- हा कोण बुटबैंगण, टौकारून पाहत इकडं आला ? [शिपायी प्रवेश करतो] शान्ति- हा आमच्या क्लबचा शिपायी बगळाजी. कारे झाली का सगळी बोटिंगची तयारी ? बगळाजी- तयारी म्हडी ? समद्या होड्या भरल्या. तुमी जाऊन बसलात का वल्ही मारून होडी ढकलायची. चला बिगि बिगि, किकमार्च [जातो] क्रान्ति- शान्ते, चल लवकर, ब्रव्हो भैरव ; बाय बाय रावसाहेब. [जाते] शान्ति- थँक्यू भैरव. गुडबाय पपा. [जाते] पुराणे- तुझा बाप पपा. बिघडली कारटी. क्रान्तीच्या नादानं ही शान्ति बिघडली, का शान्तीनंच क्रान्तीला बिथरवली रे भैरवा ?- बसला का तुझ्या कानाला दडा ? ( त्याला हालवून ) तुझ्या कानाला दडा बसला दडा ! भैरव- मग या कानाशी कशाला ओरडा ? इकडे येऊन रडा. ( दोघे जागा बदलतात ) पुराणे- या कारटीनं कपाळावर मळवट भरून आमच्या पुराणे घराण्याचं तोण्ड काळं केलं. भैरव- शान्तीची आई मेल्यावर, घरात ती एक घारी घार