संगीत विधिनिषेध: Page 4 of 34

तुझ्या कपाळी कुंकूssअ ! क्रांति- बायकांनी नाही कुंकू लावायचं, तर काय पुरूषांनी ? पुराणे- जिचा नवरा जिवंत असतो, तिलाच कपाळी कुंकू लावण्याचा अधिकार. क्रांति- अन् एकादीचा नवरा जिवंत असून तिला मेल्यासारखा असला तर ? पुराणे- तिनं नुसतं मेण चोपडावं चहाटळ ! क्रांति- अन् लग्न न झालेल्या कुमारीच्या कुंकवाचा काय हो अर्थ ? भैरव- वेदकाळीं कुमारिकाच होत्या कुठं मुळीं. त्या वेळी लग्न लागल्याशिवाय एकसुद्धां कारटं चुकून जन्माला आलं नाही. पुराणे- कुमारीच्या कुंकवाला कवडीचाही अर्थ नाही. शांति- मग माझ्याच कुंकवात कसला इतका अनर्थ दिसतो तुम्हाला ? मी पण कुमारीच नव्हे का बाबा ? पुराणे- तूं कुमारी ? तूं कुमारी ? भैरव- हां ! मी कुमार, तीही कुमारी. पुराणे- अगो तुझं लग्न होऊन, तुझा नवरा वारला ना ! भैरव- नव-या बरोबर कुंकू नाहीं वारलं, उलट वाढलं ! शांन्ति- नवरा वारला, त्याला मी काय करणार बाबा. मी का त्याला मारलं, का मरायला सांगितलं. क्रान्ति- नवरा मेला म्हणजे तुम्ही मुडदेफरास पुरूष, बायकांचे कुंकू पुसता न् मंगळसूत्रं तोडता. मग, एकाद्याची बायको मेली, तर त्याचे काय तुम्ही गंध पुसता का जानवं तोडता ? भैरव- पुरूषांचं कुणी काही पुशीत नाही न् काही तोडीतहि नाही. शान्ति- मला माझ्या लग्नाची आठवण सुद्धा नाही. पुराणे- तुला नसेल आठवण. पण मला- तुझ्या बापाला आहे ना. बायकांच्या कपाळाचं कुंकू म्हणजे त्याच्या, नव-याच्या जिवन्तपणाची निशाणी. भैरव- जिवंत राहाण्याची विमापॉलिसी तर नव्हे ना ? क्रान्ति- तर मग कुणाचे नवरे कधी मरते ना ! भैरव- अन् कपाळावर मळवट फासणा-या बायांचे मेलेले दादले, सरणावरून ताड् दिशी उडी मारून घरच्या खाटल्यावर परत आले असते. पुराणे- अगो पोरी, विधवा जर कुंकू लाऊ लागल्या, तर काही त्यांचा न् सवाष्णींच्या समाजात एकच गोंधळ उडेल. भैरव- सवाष्ण पूजनाच्या राष्ट्रीय एळकोटात विधवांच्या ओट्या भरल्या जातील. शान्ति- ओट्या भरताक्षणींच घरोघर पाळणे हालू लागतात, असा तर तोडगा नाही ना ? क्रान्ति- सगळ्याच बायकांनी कुंकवाला कायमचा फाटा दिला, तर काय नवरा बायकोला ओळखणार नाही, भाऊ बहिणीला पारखणार नाही, का मूल आईला बिलगणार नाही ! पुराणे- अगो पोरींनो, ही तुमची तोण्डे, ताकघुसळणीचे भाण्डे, कां फोनोग्राफचे शिंगाडे ! भैरव, हें हें हें सारें शिक्षणाचें परिणाम बरं, शिक्षणाचें परिणाम ! भैरव- स्वराज्य झाल्याशिवाय बायकांच्या शिक्षणाला आळा, यायचा नाही, पुराणे, आपले पूर्वीचं स्वराज्य असतं, आsहा ! शान्तीच्या नव-याइतकीच त्याची आठवण ! पण जीव कसा अगदी कायदेभंग्यासारख्या वैतागतो. स्वराज्य असतं, तर चोळीऐवजी पोलकी न् तिपेडी वेणीऐवजी फुग्याचे आम्बाडे घालणा-या बायांना, श्रीमतांच्या जनानकान्याची जन्मठेप शिक्षा ठोठावली असती. क्रान्ति- बायकांना पुरूषांच्या जनानखान्यात कोम्बण्याऐवजी, पुरूषांना बायकांच्या हमालखान्यात कोम्बण्याचा मनू उगवला आहे बरं ! भैरव- मनू उगवला असेल, पण संधी कुठं आहे ? संधिप्रकाश दाखवा. I most humbly beg to offer myself for the same. As for my qualifications मी सडासोट बजरंगबली आहे. आहे का एकादी व्हेकन्सी ? शान्ति- नो व्हेकन्सी ? भैरव- असून नाही म्हणाल तर वशिल्याचे वंगण चोपडून खटपट करीन. क्रान्ति- कुंकवाच्या वादात तुझ्या वंगणाची जरूर नाहीं. कानफाट्या ! भैरव- एकवार वापरून खातरी करा. स्वदेशीला उत्तेजन द्या. नमुना फुकट. वैधव्याची भीति नाही. मेलो, तरी अखण्ड सौभाग्याची हमी. पुराणे- सगळ्याच बायका कुंकवाचे मळवट भरू लागल्या, किंवा पाण्ढ-या फटफटीत कपाळांनीं मिरवूं लागल्या, तर अमकी सवाशीण न् तमकी विधवा, हें लोकांना समजणार तरी कसें रे भैरव ? क्रान्ति- लोकांना समजून करायचं काय ? भैरव- मग संध्याकाळी बाजार पेठेतल्या कंबरखुंट्या लोकांनी गप्पा तरी कसल्या मारायच्या ? बायकांच्या कपाळाच्या ? शान्ति- ही कुमारी, ही सौभाग्यवती, ही विधवा, याच्या चांभारचौकशा हव्यात