संगीत विधिनिषेध: Page 2 of 34

मेल्या सनातन्यानी क्षुल्लक कारणासाठी तुला टाकली. जिता असून तुला मेल्यासारखाच नाहीं का ?

क्रान्ति- शान्ते, अगं मी पण विधवाच ! तुझा नवरा तुझं कपाळ असून मेला, अन् माझा नवरा मला विवाहाचा डाग लावून जगला. एवढाच काय तो फरक. बाकी आपण दोघीजणी विधवाच.

शान्ति- कुंकू लावण्याच्या धाडसाबरोबर, मला पुनर्विवाहाचं पण धाडस करता येईल. पण तुला तीही सवलत नाही, क्रान्ते.

क्रान्ति- मला त्याचा मुळीच विधिनिषेध वाटत नाही. एकाच विवाहाचे असले थेर झाल्यावर, पुनर्विवाहाच्या फन्दात पडून मला काय मिळणार ? बी.ए. झाले म्हणून या केंब्रिज एम.ए.शहाण्याच्या बाशिंगाला बाबांनी मला बांधली. त्याचा हा असा विचका झाला! विवाहाचे न् संसाराचे सोहाळे झाले इतके पुरे. आता विद्येच्या आनन्दातच आयुष्य काढण्याचा, आणि साधेल झेपेल तर समाजसेवा करण्याचा माझा विचार आहे. [क्लबचा शिपायी येतो.] शिपाई- अवss करान्तिबाय, अवs शेन्ताबाय.

शान्ति- अगबाई ! बोलण्याच्या नादात आपल्याला लेट झाला वाटतं.

शिपाई- ल्याट म्हजी ! व्हेरी ल्याट झालाय. समदी फि-याण्ड मण्डावली तकडं तुमची वाट पाहत्यात. शेम शेमबि वराडत्यात. पुरटीस व्हईल पुरटीस ! चला बिगी बिगी. किक् मार्चआँ ! आन् व्ह्यो काय चिमित्कार ! वण्डार वण्डार ! श्येन्ताबायच्या कपाळाला कुकू ? कवा लागला तुमचा पाट ? अन् कुणालाबि न्हाय त्येची दाद ? आणखी याक पिकणी पारटी व्हणार.---- चला बिगी बिगी. कमसून. [जातो. शान्ति- क्रान्तिताई, मला बाई लाज वाटते असं कुंकू लाऊन पार्टीला जायला. सगळे फ्रेण्ड्स् माझी थट्टा करतील. टाकू का पुसून ?

क्रान्ति- खबरदार पुसशील तर. यात कसली आहे लाज! विधवांची कुंकवं पुसून, बेवारशी बायका म्हणून रस्तोरस्ती त्यांचे धिण्डवडे काढणा-या समाजाला वाटते का आपल्य़ा लेकी बहिणी सुनांची लाज ? नाही ना ? मग कशाला पाहिजे त्या लाजेचा आपल्याला एवढा विधिनिषेध ? अगदी हळव्या मनाची आहेस तू शान्ते. अगं नवीन सुधारणे प्रघात असाच धिटाईने सुरू करावा लागतो हो.

शान्ति- पण कुणी हासलं तर? क्रान्ति- कुणी हाशलं तर ! कुंकवाला हसायला कुणाला काय झालं ? हासले फ्रेण्ड्स् तर हासले. सांग त्यांना बेलाशक, म्हणावं ही, माझा पाट लागला, गन्धर्व झाला न् पुनर्विवाह पण उरकला. शान्ति- अन् कुणाशी लागला म्हणून विचारलं, तर काय ग सांगू ?

क्रान्ति- सांग, माझ्याशी तुझा पाट लागला म्हणून. धान्दरट कुठली. चल. [जातात] प्रवेश दुसरा [पुराणे व पाठोपाठ भैरव येतो.] पुराणे- काय राण्डेचा हा धिंगाणा ! लग्नच मोडलेन् या बटकीच्या पोरीन् ! काय म्हणे, हुण्डेबाज गधड्याचं पाणीग्रहण करणार नाही. टराटर अंतरपाट फाडला न् राण्डेची बोहल्यावरून पळाली. जुने डोळे न् नवे तमाशे. तुला कसे वाटतात रे भैरवा ?– कायरे, बोलतो ते ऐकू येत नाही वाटतं? डोळे फुटले, का कान फुटले ?

भैरव- माझ्याशी काही बोलत का होतात तुम्ही ? [दुस-या बाजूला येऊन उभा राहतो] हां, बोला आता काय बोलावयाचे ते. पुराणे- म्हंजे ! आतापर्यंन्त बोललो ते गेलं वाटतं सारं कच-याच्या पेटींत.

भैरव- ड्रेनेजात का म्हणाना, गेलं खरं ! पुराणे, मला अलीकडे एक कानफाट्या विकार जडला आहे. केव्हा ना केव्हा माझा एक कान बहिरा असतो. कोणत्या वेळी कोणत्या कानाला घट्ट दडा बसेल, याचा मुळीच नेम नसतो. फण्डगुण्डांच्या हंगामी न् दिखाऊ देशभक्तीसारखी, माझ्या कानाच्या दड्याची भरतीओहोटी दर तासाला चालू असते.

पुराणे- चमत्कारिकच रोग म्हणायचा हा ! पण कोणत्या कानाला दडा बसलाय, हे तरी तुला उमगतं का ?

भैरव- तो सुद्धां धकाधकीचाच मामला ! कुणीतरी गचाण्डी धरून धकाण्डी दिल्याशिवाय नाही उमगत. थेट आत्ताच्या लग्नाचा प्रकार. क्रान्तिबाईनं कावळे वकिलाला बोहोल्यावर लाथांचा आहेर देईपर्यंत, हुण्ड्याच्या पापाची नाही त्याना अटकळ झाली. छान छान, झाला हा प्रकार छान झाला ! पुराणे- बोडके