संगीत विधिनिषेध

नाटककार म्हणूनही प्रबोधनकार खूप मोठे होते. करमणूक करण्यासाठी त्यांनी नाटकं लिहिली नाहीत. पण ती छान करमणूक करायचीच. आणि त्यातला बोधही प्रेक्षकांपर्यंत उत्तमपणे पोहोचायचा. क्रांती, शांती, पुराणे, सनातने ही विधिनिषेध नाटकातली नावंही वाचली तरी त्याचा बाज लक्षात येतो.

विधिनिषेध “ डेक्कन स्पार्क्स ”ची तीन अंकी संगीत नाटिका.

- लेखक - केशव सीताराम ठाकरे ( प्रबोधनकार )

प्रकाशक वि. ग. ताम्हणकर महाराष्ट्र पब्लिशिंग हाऊस लि. पुणें. या नाटिकेसंबंधी सर्व प्रकारचे हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत.

आवृत्ती पहिली ] किं. १० आणे [ १९३४ विधिनिषेध नाटिकेचा पहिला मंगल प्रयोग पुणे येथे विजयानन्द नाट्य मन्दिरात, ता. ९ फेब्रुवारी सन १९३४ शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता, मेसर्स श्री. आणि कम्पनीच्या सुप्रसिद्ध टापटिपीच्या व्यवस्थेखाली झाला. नाटिकेतल्या भूमिका व स्पार्क्स. क्रान्ति श्री. कमळाबाई कामत शान्ति भाई कर्णिक भैरव श्रीकान्त राजे पुराणे प्रधान डॉ. प्रवाळ वसन्त कुळकर्णी विवेकराव नीलकण्टराव पाटील बवळे ओकांरराव पाटील वावळे वसन्त म्हैसाळकर सनातने नाथ टिपनीस गोरक्षण्या डोंगर चिरमाडे बगळाजी सदाशिव जावळे इन्स्पेक्टर जगन्नाथराव कुळकर्णी पुणे,ता. ९-२-३४ } दत्तात्रय विश्वनाथ सुळे. जनरल मॅनेजर “ डेक्कन स्पार्क्स ” नाट्यसंस्था.

संगीत विधिनिषेध नाटिका

अंक पहिला प्रवेश पहिला

नान्दी

नित नवल नटविशी नटेश्वरा | विधीनिषेध तुज ना जरा || ध्रु. ||

मानव हृदया विस्मया-खनि करूनी | हसविशि रूसविशि | क्षणांत जनांत ||

नर राक्षस राक्षस नरसम कृती | दिसे जनी | चराचरी | परोपरी || १ ||

[क्रान्ति प्र. क्र.] क्रान्ति- ( पद ) फुरफुरत्या हृदया प्रणति करित क्रांन्ती || ध्रु. ||

हरविल झणिं भ्रान्ती || खुलविल नव शांन्ती || बदलासि भ्याड भीतो | काळासि ओळखी ना |

त्यागोनि दिव्य क्रान्ति | शान्तीसही मुके तो || १ || मर्दास क्रान्ति शोभे | परी हीच भ्रान्ति लोकां || २ ||

संगित- विधिनिषेध नाटिका [शान्ति प्रवेश करते]

शान्ति- कोण क्रान्ती ? हल्लो, गुड ईव्हनिंग्.

क्रान्ति- (शान्तीने कुंकू लावलेले पाहून) छान, अगदी छान कुंकवाची ही टिकली लावल्यानं आत्ता तू कित्ती छान दिसतेस म्हणून सांगू ! तुझी दृष्ट काढाविशी वाटते.

शान्ति- माझ्या पांढ-या फटफटीत कपाळावर एकसारखी खिळलेली लोकांची दृष्ट हा टिकला खरच काढील कागं ? क्रान्तिताई, इवलासा टिकला, पण पिंजरेची चिमुट हातात घेऊन कपाळाशी नेताना, माझी छाती कित्ती कित्ती धडधडत होती म्हणून सांगू ! दोन तीन वेळा तर लोक काय बोलतील ? या भीतीनं माझा हात खाली पडला. घाबरून आरशात पाहते, तो काय! माझ्या चेह-याऐवजी तुझाच हा रागीट चेहरा तिथे मला दिसला. मग केलाच हिय्या, अन् टेकलाच हा टिकला एकदाच कपाळाला! क्रान्ति- पण आता तर नाहीना तुझी छाती धडधडत ?

शान्ति- छाती नाही धडधडत, पण मन मात्र गडबडतं खरं. पण कायग, लोकं मला नाव तर नाही ना ठेवणार ?

क्रान्ति- लोकं नावं ठेवीत नाहीत कशाला ? आतापर्यंत पांढ-या कपाळाची म्हणून बोटं दाखवली, आता कुंकू लावलं म्हणून दाखवतील. त्याचा विधिनिषेध आता किती बाळगायचा ! पांढ-या फटफटीत कपाळाकडं ज्यांनी त्यांनी रोखरोखून मारलेले डोळे सहन करण्यापेक्षा, कुंकवाचा हा कम्युनिष्टी लाल बावटा पत्करला. कुंकू लावलंय, ठीक केलंय. आता मरेपर्यंत ते पुसू नकोस.---- म्हणे विधवांनी कुंकू लाऊ नये !

शान्ति- क्रान्तिताई, नावासारखी आहेस खरी तू क्रान्ति. अगं, कुणाला विधवा म्हणावं, न् कुणाला नाही, याचा तरी विधिनिषेध पुरूषांनी बाळगला आहे थोडाच ! मला तर मेलं काहीच आठवत नाही. पण बाबा म्हणतात म्हणून मी समजून चालते, का केव्हातरी, कुठंतरी, कुणाशीतरी माझं लगीन लागंल, न् नवरा मेला, म्हणून मी विधवा. पण तू तर जित्या नव-याची जिती बायको. तुझ्यात न् विधवेत काय फरक ?