साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 9 of 15

कसा घेऊ देईल. असले हे लोकमान्य नातु शेंडी झटकून पुढें सरसावतांच त्यांच्या पाठिमागे चिंतामणराव सांगलीकर, बाळाजी काशी किबे, बाळंभट जोशी, बाळकोबा केळकर, नागो देवराव, भोरचे पंत सचीव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बल्लाळ महाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले, (एक मावळा – अरं इचिभन ! हत बी भाऊ लेल्या?) असले हे अस्सल ब्राम्हण वीर प्रतापसिंह छत्रपतींची चळवळ आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी कमरा कसून सिद्ध झाले. परंतु ही सर्व सेना जातीची पडली ब्राम्हण, एकरकमी चित्पावन, अस्सल राष्ट्रीय, तेव्हा आपल्या पक्षाला ‘ सार्वजनिकत्व ’ आणण्यासाठी बाळाजीपंतांना कांही आत्मद्रोही व घरभेद्या ब्राम्हणेतर पात्रांची फारच जरूर भासूं लागली. लवकरच परशुरामाच्या कृपेने बाळाजीपंतांच्या या राष्ट्रीय चळवळीत एक बिनमोल ब्राम्हणेतर प्यादें हस्तगत झाले. ते कोणते म्हणाल, तर खुद्द प्रतापसिंहांचे धाकटे बाऊ आप्पासाहेब भोसले. खुद्द राजघराण्यातलाच असला अस्सल मोहोरा राष्ट्रीय चित्पावनी मंत्रांच्या जाळ्यात सापडतांच नातूंच्या राष्ट्रीय कटाला सार्वजनिकपणाचें स्वरूप तेव्हांच आलें आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बगलेत शिरून या राष्ट्रीय नातूकंपूनें इंग्रजांच्या हातून छत्रपतींच्या सिंहासनाचें परस्पर पावणेतरा करण्याची आपली कारवाई सुरू केली. या कामी त्यांनी एकदोन शंकराचार्यासुद्धां बगलेत मारले. नातूंनी विचार केला की हा मरगट्टा छत्रपती ब्राम्हणेंतरांत धार्मिक आणि सामाजिक जागृति करून आम्हां भूदेवांचें वर्चस्व कढी पेक्षांहि पातळ करणार काय ? थांब लेका ! तुझ्या सिंहासनाच्या खालीच माझ्या चित्पावनी कारस्थानाचा बांब गोळा ठेवून, कंपनी सरकारच्या हातूनच त्याचा स्फोट करवितों मग पाहतों तुझ्या ब्राम्हणेतरांच्या उन्नतीच्या गप्पा ! बांधवहो, कोल्हापुरच्या श्रीशाहू छत्रपतींना ‘ स्वराज्यद्रोही ’ ठरविण्याची केसरीकारांची राष्ट्रीय चतुराई आणि प्रतापसिंहांला गुप्त कटाच्या फांसात अडकवून जिंवत गाडण्याची नातुशाही या दोनही गोष्टींचा मसाला एकाच राष्ट्रीय गिरणीचा आहे, इतके आपण लक्षात ठेवले म्हणजे झाले. नातुकंपूत सामील झालेल्या या सर्व पंचरंगी राष्ट्रीयांनी कंपनीसरकारच्या गव्हर्नरपासून तों थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्व पात्रांच्या नाकांत आपल्या कारस्थानांची वेसण खूप शर्तीने घातली.

-------------------------------------

अर्थात सर जेम्स कारनाकपासून तों थेट रेसिंडेंट कर्नल ओव्हान्सपर्यंत सगळी बाहुली लोकमान्य नातूंच्या सुत्रांच्या हालचालीप्रमाणे ‘लेफ्ट राईट’, ‘लेफ्ट राईट’ करू लागली. या पुढचा इतिहास अत्यंत भयंकर आणि मानवी अंत:करणास जाळून टाकण्यासारखा आहे. परंतु तो प्रत्यक्ष घडवीत असतांना मात्र बाळाजीपंत नातू किंवा चिंतामणराव सांगलीकर यापैंकी एकाचेंहि अंत:करण चुकूनसुद्धां कधी द्रवले नाही. राष्ट्रीय अंत:करण म्हणतात ते हे असे असतें. अनुयायांची गोष्ट काय विचारावी ? जेथें खुद्द आप्पासाहेब भोसले, राज्यलोभाने सख्या भावाच्या गळ्यावर सुरी फिरविण्यास सिद्ध झाला, तेथे आपल्या सदासिद्धविवेक बुद्धीची मुंडी पिरगळतांना इतरांना कशाची भीती ? प्रतापसिंह महाराजांनी भिक्षुकशाहींचें बंड मोडून ब्राम्हणेतरांना धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य देण्याची चळवळ हात घेतांच, बाळाजीपंत नातूच्या उपरण्याखाली जे राष्ट्रीय कुत्र्यांचें सार्वजनिक मंडळ जमा झाले, त्याला एवढीच कल्पना भासू नये काय, की आपल्या या उलट्या काळजाच्या कारस्थानामुळें श्रीशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचें सिंहासन आपण जाळून पोळून खाक करीत आहोत ? महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवीत आहोत ? जाणूनबुजून क्षुल्लक स्वार्थासाठी फिरंगी आपल्या घरांत घुसवीत आहोंत ? आजला त्याच हरामखोर नातूचे सांप्रदायिक जातभाई करवीरकर छत्रपतींना ‘ स्वराज्यद्रोही छत्रपती ’ म्हणून शिव्या देण्यास शरमत नाहींत. यावरून एवढेंच सिद्ध होते की, बाळाजीपंत नातूचा स्वराज्यद्रोही संप्रदाय अजून महाराष्ट्रांत जिंवत आहे. आम्हांला जर स्वराज्य मिळवावयाचेंच असेल, आमचें उद्याचें स्वराज्य चिरंवीज व्हावें अशी जर तुमची इच्छा असेल, तर प्रतापसिहांच्या वेळी भिक्षुकशाहीनें या साता-यांत रायगडच्या स्वराज्याचा जसा मुडदा पाडला, तसाच उद्याच स्वराज्य मिळविण्यापूर्वी महाराष्ट्रांत शिल्लक उरलेल्या स्वराज्यद्रोही नातु संप्रदायाचा आपणांस प्रथम बीमोड केला पाहिजे, नव्हे, असे केल्याशिवाय तुम्हांला स्वराज्यच मिळणे शक्य नाही. बाळाजीपंत नातूचे चरित्र भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, स्वराज्यहत्या आणि सत्यहत्या असल्या कल्पनातीत महापातकांनी नुसतें बरबटलेलें आहे. अर्थात् जोपर्यंत हा नातु, किबे, केळकर अन्ड को. चा संप्रदाय