साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 8 of 15

मंगल प्रसंगी ‘शिवरायास आठवावें’ या विषयानुरूप शिवचरित्राबद्दल मी कांही विवेचन करावे अशी आपली अपेक्षा असणे साहजिक आहे व तसा माझाहि उद्देश होता, परंतु पाडळीला मोटारींत बसून मी साता-याकडे येऊं लागतांच माझा तो बेत बदलला. शिवरायास आठवतां आठवतां सबंध शिवशाहीचा चित्रपट माझ्या अंतश्चक्षूसमोर भराभर फिरूं लागला; आणि सातारच्या या निमकहराम स्वराज्यद्रोही राजधानींत मी येऊन दाखल होतांच, शिवाजीनें स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अंतकाळचा भेसूर देखावा मला स्पष्ट दिसूं लागला. बांधवहो, आपण सातारकर असल्यामुळें आपल्याला सातारचा अभिमान असणें योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाहीं. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची -हासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य या साता-यास अस्त पावला. रायगडला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देऊन भिक्षुकशाहीनें या साता-यास त्या स्वराज्याचा मुडदा पाडला. दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या सिंहासनाला गदागदा हालविणा-या, इतकेच नव्हे, तर अटकेपार रूमशामच्या बादशाही तक्ताचा थरकांप उडविणा-या हिंदवी स्वराज्याचे रक्त या सातारच्या पापभूमीवर सांडलेलें आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमीत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभें राहून आजच्या मंगल प्रसंगी पुण्यश्लोक शिवरायांचे गुणगायन करण्यापेक्षा आमचें हिंदवी स्वराज्य का नष्ट झालें, त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीनें कोणकोणत्या घाणेरडीं कारस्थानें करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या साता-यांत पाडला, त्याचा आज जर आपण इतिहासाच्या आधारानें विचार केला, तर सध्यांच्या स्वराज्योन्मुख अवस्थेंत आपल्याला आपल्या कर्तव्याचीं पावलें नीट जपून टाकितां येतील. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्विक पुराणें सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झालें आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यांस ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्यभिचार करण्याच्या कामी किंचितसुद्धा शरमली नाही, त्यांचा खराखुरा इतिहास उजेडांत आणणारे मात्र आपल्याला मुळींच भेटणार नाहीत. आज स्वराज्य शब्दाचें पीक मनमुराद आलेलें आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठी स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणीच स्पष्ट करीत नाही, अशा प्रसंगी आपलें हिंदवी स्वराज्य आपण का गमावले, याचा नीट विचार केल्यास सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राम्हणेतर संघानें किती जपून वागले पाहिजे याचा खुलासा तेव्हांच होईल. राष्ट्रीयांची स्वराज्य-पुराणे म्हणजे गांवभवानीची पातिव्रत्यावरील व्याख्यानें आहेत, कारस्थानी वेदांत आहे, ठगांची ठगी आहे, स्वार्थसाधूंचा मायाजाल आहे, शिवरायास आठवावे; गोष्ट खरी ! परंतु आज शिवछत्रपतींचे स्मरण होतांच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या -हासाचें पृथक्करण करण्याकडे आपली स्मरणशक्ति वळते, त्याला इलाज काय ?

-------------------------------------

तेव्हां आपण आतां छत्रपति प्रतापसिंह महाराज यांच्या कारकीर्दीकडे वळूं. प्रतापसिंह हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे करवीरकर शाहू छत्रपति होते. १८१८ सालीं रावबाजींचें व त्याबरोबर पुण्यातल्या पेशवाईचें उच्चाटन पापस्मरण बाळाजीपंत नातूंनी केल्यानंतर ईस्ट इंन्डिया कंपनीने प्रतापसिंह महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या सिंहासनावर स्थापन केले. यापूर्वी येथील नजिकच्या वासोटा किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना निमकहराम कृतज्ञ पेशव्यांनी सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्षे कैदेंत ठेवलेले होते. सिंहासनाधिष्ठित होतांच, महाराजांनी राजकारणांची यंत्ररचना ठाकठीक बसविल्यानंतर, ब्राम्हणेतरांच्या सामाजिक व धार्मिक उन्नतीचा प्रश्न त्यांनीं हाती घेतला. थोडक्यात सांगायचें म्हणजे ब्राम्हणेतरांच्या उन्नतीचा जो प्रश्न करवीरकर छत्रपतींनीं सध्या हाती घेतलेला आहे, तोच प्रश्न प्रतापसिंह महाराजांनी हाती घेऊन दीनदुनियेला ब्राम्हणांच्या कारस्थानी भिक्षुकशाही बंडापासून मुक्त करण्याचा विडा उचलला. ब्राम्हणेतरांच्या अज्ञानावर मनमुरात चरण्यास सोकावलेल्या पेशव्यांच्या अभिमानी भिक्षुकांना महाराजांची ही चळवळ कशी बरें सहन होणार ? ती हाणून पाडण्यासाठी भिक्षुकशाहीनें कमरा कसल्या त्यावेळी या कंपूचें पुढारपण स्वीकारण्यासाठी पुढें झालेले त्यावेळचे ‘ लोकमान्य ’ म्हटले म्हणजे पापस्मरण बाळाजीपंत नातु हे होत. इंग्रजांकडून मिळणा-या जहागिरीच्या लचक्याला लालचटलेल्या ज्या अधमानें स्वजातिवर्चस्वाच्या शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा फडकवायला मागें पुढें पाहिले नाही, तो चांडाळ छत्रपतींच्या ब्राम्हणेतर संघाला उन्नतीचा एक श्वास देखील