साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 7 of 15

ब्रिटिशांना सहजशक्य गोष्ट आहे. ही न्यायाची मागणी आहे. कृतकर्मांचें प्रायाश्चित घ्या आणि सत्याची लाज राखा, असा हा उघडउघड सवाल आहे. रात्रंदिवस शल्याप्रमाणें हृदयांत डाचत असलेल्या अमंगल गतेतिहासाला पुनरुज्जीवनाच्या मंगल कार्यानें पावन करा, असा हा न्याय मागणीचा अर्ज आहे. या कामीं ब्राम्हणब्राम्हणेतरांनी एकवटून कार्याला सुरवात केल्यास त्यांच्या पूर्वजांनी छत्रपतींच्या उच्चाटणाचें जे दुष्कृत्य केले त्याच्या पापापासून त्यांची मुक्तता होईल आणि सातारा ही इतर देशी संस्थानांप्रमाणे पुनरुज्जीवित अशा शिवछत्रपतींची शिवनगरी झाली, तर तो मंगल सोहळा महाराष्ट्राला त्याचप्रमाणे ब्रिटिश लोकांना मोठ्या अभिमानाचा, सत्यप्रियतेचा आणि न्यायप्रियतेचा म्हणून भावी इतिहासांत रेडियमच्या अक्षरांनी चिरंजीव होऊन बसेल. साता-याची शिवनगरी बनविण्यासाठी ब्राम्हणांनी, पूर्वग्रहांना विसरून एकानिश्चयानें तुम्ही तयार व्हा; कारण तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कर्माचे प्रायाश्चित तुम्हांला घ्यावयाचें आहे, ते या उमद्या मार्गाने घ्या. यात सारें जग तुमच्या बुद्धिमत्तेचें कोतुक करील. तुमच्या पाप भीरुत्वाचा इतिहास ग्वाही देईल. ब्राम्हणेतरांनों, क्षत्रिय मराठ्यांनों तुम्हांला शिवस्मारक पाहिजे ना ? मग त्या भांबुर्ड्याच्या धोंड्यावर डोकी फोडण्यापेक्षा या अभिनव शिवनगरीच्या उद्धारासाठी तुम्ही आपली डोकी अवश्य चालवा.

आज तुम्हाला अस्सल भोसले कुळांतला एक बालवीर दैवाच्या सता-यानें सता-यांचे दैव गदागदा हालविण्यासाठी अकस्मात प्राप्त झाला आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही शिवनगरीचा जर ध्यास घ्याल आणि प्रबोधनाच्या कल्पनेंत खेळणारी ही कल्पनासृष्टी प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न कराल, तर बंदिवासाच्या हाल अपेष्टांत काशीला मरण पावलेला प्रतापसिंह छत्रपती आणि त्यांच्या नावासाठी व तक्तासाठी अनुपमेय आत्मयज्ञ करणारा रंगो बापूजी यांच्या स्वर्गस्थ आत्म्यांना खात्रीनें संतोष वाटेल, सरतेशेवटी ब्रिटिश राजकर्त्यांना आमची अशी विनंति आहे कीं, साता-यांच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रश्न आपण आतांही जर न सोडविला तर सत्य, न्याय आणि माणुसकी या तीनही तत्त्वांच्या दृष्टीने ती एक मोठी नामुष्कीची गोष्ट होईल, असे छातीठोक विधाने करण्यापुरता पुरावा गतेतिहासांतून आम्ही लागेल तितका काढून देऊ. ब्रिटिशांना महाराष्ट्राच्या मनोभावनेची जर कांही दरकार असेल तर त्यांनीं हा शिवनगरीचा प्रश्न अवश्य विचारांत घ्यावा. सद्दीच्या जोरावर छत्रपतींचे तहनामे रद्दी ठरविले गेले. जाऊ द्या. तत्कालीन् रेसिदटांनी गव्हर्नरांची मनें, ब्राम्हणांच्या चिथावणीनें, कलुषित केली; करूं द्या. रंगोबापूजींच्या १४ वर्षांच्या विलायती वनवासाला यश आलें नाही; न येऊं द्या. अनेक ब्रिटिश मुत्सद्यांची न्यायबुद्धी व सत्यप्रियता त्या वेळी वांझोटी ठरली; ठरू द्या. भूत काळ मेला; मरू द्या. भविष्याकडे लक्ष द्या. भूतकाळाच्या भूतांना वर्तमानकाळांत गति देऊन, भविष्य काळाला उज्ज्वल करा. शिवरायाला नुसता मुजरा करूं नका; त्याचें जिवंत स्मारक करा. प्रतापसिंह छत्रपतींची पदच्युतता म्हणजे अखिल महाराष्ट्राच्या काळजांत खोल घुसलेला आंग्रेजी जांबिया आहे. तो एक अन्याय आहे. ती एक सत्याची बेगुमान मुस्कटदाबी आहे. तो जांबिया आता खेचून काढा. तो महाराष्ट्राचा अपमान आता पुसून टाका. लढाईंत जिंकलेलें टिपू वाघाचें राज्य ज्या ब्रिटीश सरकारने वडेयार हिंदू घराण्याला परत देऊन म्हैसूरचें राज्य पुनरुज्जीवित केले; काशीच्या राज्याची पुनर्घटना केली, त्याच ब्रिटानियेला शिवरायांचे मुळ तक्त पुनरुज्जीवित करायला फारसें कठीण नाही. ब्रिटानिये! तुझ्याआठी मराठ्यांनी आपली उमलती जवान पिढी युरोपच्या रणयज्ञांत बळी दिली आहे, हे विसरू नकोस. तुझ्या उद्याच्या नृपतीने व हिंदुस्थानाच्या बादशहाने आमच्या शिवदेवापुढें टोपी काढून मुजरा केला आहे, हे लक्षात घेऊन, सातारच्या अन्यायाचे परिमार्जन करायला या वेळी तूं तुझ्या इतिहासप्रसिद्ध न्याबुद्धीचा उपयोग धोरणांने करशील अशी आशा आहे. ००० हिंदवी स्वराज्याचा खून (ता. २९ एप्रील १९२२ रोजीं सातारा येथें श्रीशिवजयंत्युत्सव प्रसंगी श्री. ठाकरे यांनीं दिलेलें व्याख्यान.) भगिनीबांधवहो, आज आपण पुण्यश्लोक श्रीशिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता जमलो आहो.

आजचा दिवस अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र, आणि स्फूर्तिदायक असा आहे. या दिवशी गुलाम महाराष्ट्राला स्वतंत्र करणारा, नामर्द म-हाठ्यांना मर्द बनविणारा आणि नांगरहाक्या अनाडी शेतक-यांतून भीष्मार्जुनकर्णापेक्षांहि सवाई भीष्मार्जुन निर्माण करणारा राष्ट्रवीर जन्माला आला. अर्थात् अशा