साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 5 of 15

सात वर्षाच्या चंद्रसेन भोसला केवळ आपल्या नसांतल्या रक्ताच्या पुण्याईवर सातारच्या जहागिरीचा श्रीमंत जहागिरदार झाला.

या अकल्प घटनेचा सातारच्या जनतेला कल्पनांतीत आनंद वाटला आणि तो तिनें न भूतो न भविष्यति अशा थाटानें व्यक्तहि केला. दत्तविधान, दरबार, हत्तीवरील मिरवणूक वगैरे समारंभांनी सातारा राजधांनीचा आनंद गगनात मावेना. त्यातच ब्रिटीश सरकारने या सर्व कृत्यांना आपली सार्वभौमी सहानुभूती दाखविल्यामुळें तर या आनंदाला पारावारच उरला नाही. पण हा आनंद अपूर्ण आहे. हा आनद खेदमिश्रित आहे. या आनंदात निराशेच्या वेदना आहेत. हा आनंदी वर्तमानकाळ दु:खमय भूतकाळांतील अनेक दुर्दैवी घटनांनी व्यथित आहे. ००० आनंदाच्या या विरळ आवरणाखालीं अनेक राष्ट्रद्रोही कारस्थानांची पिशाच्चे नंगानाच घालीत असलेलीं अजूनही आपल्याला दिसतात. या आनंदाच्या देखाव्याचा पार्श्वभाग काळा कुट्ट असल्यामुळें विरोधाभासानें त्याची रुची विद्यमान सातारकरांना अमृतापेक्षांही जरी गोड वाटत असली, तरी त्या रुचीत मिसळलेला आत्मद्रोहाच्या जहाराचा फणफणाट अजूनही विचारवंतांच्या विचारांत विलक्षण खळबळाट उडवीत आहे. चिरंजीव शाहू महाराज भोसले आज ज्या गादीवर दैवाच्या सता-यानें अधिष्ठित झाले आहेत, त्याच गादीवरून प्रतापसिंह छत्रपतीला ४ सप्टेंबर १८३९ रोजी रात्रीं भर १२ वाजता उघड्या नागड्या स्थितीत हद्दपार व्हावें लागले आहे, ही गोष्ट नजरे आड केली तरी हृदयफलकावरून पुसून टाकता येत नाही. ही गादी महाराष्ट्राच्या अनुपमेय स्वार्थत्यागावर राजाराम छत्रपतींच्या हस्तें जरी स्थापन झालेली आहे, तरी तिच्यावरील प्रत्येक छत्रपति पेशव्यांच्या भिक्षुकी कारस्थानाला बळी पडलेला आहे, ही गोष्ट विद्यमान मातुश्री ताराबाईसाहेब यांनीं विसरून भागावयाचें नाही. सातारच्या गादीला भिक्षुकी वर्चस्वाचे कायमचें ग्रहण न लागतें तर मुंबईच्या टोपकर बनिया कंपनीला प्रतापसिंह छत्रपतींच्या आंगाला हात लावण्याची काय छाती होती ? ज्या मराठ्यांनी जिंजीचें राजकारण लढवूंन औरंगजेबासारख्या कर्दनकाळ दैत्याची मुत्सद्देगिरी आणि लष्करी डावपेच, डोळ्यांचे पातें लवतें न लवतें तोंच ठेचून जमीनदोस्त केले, तेच मराठें वीर आपल्या छत्रपतीला पापस्मरण बाळाजीपंत नातू आणि कर्नल ओव्हान्स यांनी दंडाला धरून तक्तावरून खेचून हद्दपार करतांना नामर्द हिजड्याप्रमाणे स्वस्थ कसे आणि का बसले ? त्यांच्या तलवारीचीं पातीं आणि भाल्यांचीं फाळें एकदम अवचित बोथट का पडली? त्रिखंडविश्रुत मराठ्याचा दरारा त्याच काळरात्रत्री कमकुवत कसा झाला? या प्रश्नांची उत्तरें तारबाई मासाहेब, आपण आपल्या हृदयाला विचारा, म्हणजे आपल्या युवराजाच्या दैवाचा सतारा यापुढें कोणत्या शिस्तीनें बळविला पाहिजे याची आपल्याला पूर्ण जाणीव होईल.

आजहि आपल्या भोंवती स्वार्थी लाळघोट्या कारस्थानांचा गरडा पडलेला आहे. त्यांच्या कारवाईची योग्य वेळीच वाट लावली नाही, तर आपल्या युवराजाच्या दैवाच्या सता-याची वाट ठरल्यासारखीच म्हणावी लागेल. भिक्षुकी वर्चस्वाचें जंतर मंतर आपल्या काळजाला आरपार भिनून तें जर थंडगार पडलें असेल, तर ज्या तक्तावर आज आपण एका भाग्यवान युवराजाची स्थापना केली आहे, त्या तक्तापुढें येत्या ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आपण शांत चित्तानें चिंतन करती बसा म्हणजे त्या तक्ताच्या हृदयांतून पिळवटून बाहेर पडणा-या रक्ताच्या चिळकांड्या आपल्या व आपल्या युवराजाच्या वास्तविक स्थितीची आपणांस पूर्ण कल्पना करून देतील. वेशासंपन्न आप्पासाहेब सांगलीकर आणि चित्पावन आयागो बाळाजीपंत नातू यांच्या उलट्या काळजाच्या धर्मकारणाला आपल्या उर्ध्वमुखी राजकारणाची फोडणी देऊन बनिया कंपनींनें त्या तक्ताला दिलेला भडाग्नी जड सृष्टीत आपल्या लौकिकी डोळ्यांना जरी दिसत नसला, किंवा आपल्या पूज्यपतीच्या गादीखाली तो भासत नसला, तरी तो विझवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हृदयांत चिरकाल विराजमान झालेल्या शिवछत्रपतींच्या शिवतक्ताच्या पुनरुजीवनासाठी, एक दोन नव्हे तर सतत १४ वर्षे विलायतेत रंगो बापूजीनें लढविलेला प्राणांतिक झगडा, आणि सरते शेवटी सत्तावन साली म-हाठशाहीनें अवघ्या हिंदुस्थानाला पाठीशी घालून दिल्लीच्या समरांगणावर केलेला अखेरचा मर्दानी थैमान याच चित्तवेधक, स्फूर्तिदायक परंतु हृदयाचें पाणी पाणी करणारा खेदजनक इतिहास ते तक्त आपणांला, मांसाहेब, मोठ्या आवेशानें खास खास कथन करील. ज्या तक्तावर चिरंजीव शाहूमहाराज आपल्या दैवाच्या सता-यानें बसले आहेत, त्या तक्ताखाली ब्राम्हणेतरांच्या सर्वांगीण प्रबोधनाचा प्रश्न अर्धवट