साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 4 of 15

मूक रयतेच्या हृदयावर स्वयंनिर्णयी आत्मोद्धाराचें छत्र धरून त्यांना स्वावलंबनाच्या चैतन्यांत रंगवून सोडतो.

सातारच्या भोसले घराण्याबद्दल भिक्षुकी प्रेमाचा लोंढा केवढा गिरसप्पी आहे, हें कांही नव्यानें कोणाला सांगणं नको. पण कै. भाऊसाहेब व त्यांच्या आसपास असणारी कारस्थानी कुत्रीं माकडें जात्याच भटांची पायचाटी करणारी असल्यामुळें, भिक्षुकी छावण्यांत भाऊसाहेब महाराजांचा बोलबाला दक्षिणेच्या भरती ओहटीप्रमाणें कमी अधिक घुमत असें, यांत कांही नंवल नाही. कै. भाऊसाहेब भोसल्यांनी दत्तकाच्या पसंतीसाठी अनेक तरुणांना आपल्याजवळ ठेऊन घेतले, त्यांची तैनात चालविली, पण अखेर दत्तकविधान न होतांच ते दिवंगत झाले. या पांच सहा तरुणांनी कै. भाऊसाहेबांच्या हयातीत खाण्यापिण्याची खूप मजा मारली, पण बेट्यांचे दैव तितकेंच. समर्थ रामदासांच्या ब्रम्हचर्याचा चक्रवाढी सूड एकामागून एक अशा सात बायका करून घेणा-या चाफळ मठाधिशाच्या मांडीवर दरबारांत बसण्याचें त्यांचें भाग्य नव्हते. त्यांच्या उलट्या अंबारीच्या नशिबाच्या कवटींत अंबारीचा हत्ती नव्हता. हा दैवाचा सतारा साता-यांतहि नव्हता. तो भाटघरच्या धरणावर भिरभिरत होता. तो जलमंदिरांत आपल्या आयुष्याचे दिवस मोजीत पडलेल्या भाऊसाहेब भोसल्यांच्या निर्णयांत नव्हता, तो भाटघर धरणावर पोटासाठी राबणा-या मजुरांच्या झोपड्या झोपड्यांतून भटकत होता. त्या दैवाच्या सता-याची छाया सातारच्या राजवाड्यांतल्यां मिष्टान्नावर नव्हती, ती हातावर मिळवून तळहातावर खाल्या जाणा-या कदन्नावर होती. ती दत्तकविधानाच्या उमेदवारीवर नव्हती, ती कल्पनेलाहि चकविणा-या अकस्मातांत लपलेली होती. हा दैवाचा सतारा ‘ प्लकी ’ नव्हता, ‘ लकी ’ होता. तो तारुण्यावर भाळणारा नव्हता, तो एक बालमूर्तीवर – मल्हारराव होळकराच्या मस्तकावरील नागाच्या फडेप्रमाणे – डुलत होता, तो नुसता ‘ वंशाला आधार ’ शोधीत नव्हता, तर भोसल्यांच्या औरस बीजाला व अस्सल रक्ताला धुंडीत होता. हें रक्त अज्ञात दशेच्या कवचाखाली दडलें होते. हे बीज दारिद्र्याच्या उकीरड्यांत गाडून पडलें होते. राजवैभवी कल्पनेला ते पूर्ण पारखें झालें होते. परिस्थितीच्या दणक्यांनी त्याचा भूतकाल अंध:कारमय बनला होता, आणि त्याला भविष्य काळ तर मुळीच माहीत नव्हता.

वर्तमानकाळांत ‘भोसले’ या आडनांवापलीकडे त्याला कशाचीही दाद नव्हती. मागें पुढें अंधार व दृष्टीपुढें दारिद्र्य, यापलीकडे जगाची कसलीच कल्पना नव्हती. कांही र-ट-फ शिकणें झालें तरी शिकावें, नाही तर दणकट मनगटाची मजुरी करून पोट भरावें, यापेक्षां अधिक कसल्याहि महत्वाकांक्षेची पुसटसुद्धां ओळख त्याला नव्हती. साता-याच्या दैवाच्या जरी ठिक-या ठिका-या उडालेल्या असल्या तरी या बालमूर्तींच्या दैवाचा सतारा मात्र मोठा जबर बापाची सारी हयात भाटघर धरणाच्या स्टोअर्स खात्यांत मजुरी करण्यांत गेली, तरी मुलाच्या दैवाने त्याच्या कोंड्याच्या भाकरीचा मांडा झाला. दुपारी बारा वाजलें म्हणजे आईनें बांधून दिलेली झुणका भाकरीची शिदोरी बापाला नेऊन पोहोंचविणारा गरीब ‘चंद-या’ सातारच्या भोसले घराण्याचा श्रीमंत सरदार होणार हें खुद्द आईबापालाच उमगलें नाहीं, तर इतरांची तरीं काय कल्पना असणार ? भाऊसाहेब भोसले जिवंत असतांना जरी हा मुलगा त्यांच्यापुढें उभा केला असता, तरी त्याच्या बाह्य वेषानें त्यांच्या मनांत निवडणुकीची प्रेरणा झालीच असती, असें सांगतां येणार नाहीं. दैवाचा सतारा आपल्या ठराविक धाटणीनेंच परिपक्व होत असतो. जेथें ज्योतिषी बुवांची अक्कलच लोळपाटणी खातें तेथें कुंडलींतल्या ग्रहांची गृहें परळ-महालक्ष्मीच्या सिमेंट चाळीप्रमाणे बिनचुक ओसाड पडलेली दिसल्यास त्यात नवल नाहीं. ज्याच्या जन्मापासून आज सात वर्षे जगाने या मुलाची कसलीच दाद घेतली नाही, तोच मुलगा एकदम श्रीमंत शाहू महाराज भोसले म्हणून सतारा शहरात हत्तीवर मिरविला जातो, हा चमत्कार ‘भविष्य’ म्हणून वर्तविणारा एकहि ज्योतिषी महाराष्ट्रांत जिवंत आढळू नये, हे दैववाद्यांचे दैव का ज्योतिषशास्त्राचा फोलकटपणा ? आकाशस्थ रेवतीवर दृक्प्रत्ययी नरबाजीचे डोळे मारणा-या कुंडलीबहाद्दरांनी आतांतरी जागे होऊन या दैवाच्या सता-यानें साता-याचे दैव उदयास येईल कीं नाही, याचे फल ज्योतिष्य वर्तविण्याची लगबग करावी. नाहीं तर भविष्यानें भूताची पाटलुण चढविल्यावर वर्तमान काळाच्या पेशवाई झग्यांत ठोकताळ्याचे ढेंकूणशोधण्याचा तडफडाट जगाच्या उपहासाला मात्र पात्र होईल, हें या पंचांगपंडितांना सांगितलेंच पाहिजे काय ?