साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 3 of 15

तल्लीन होतात. असल्या क्षणिक तल्लीनतेंत त्यांना असेंहि वाटतें की साता-याचें दैव उदयाला आलें !

-------------------------------------

तीन चार महिन्यापूर्वी सातारचे श्रीमंत भाऊसाहेब महाराज भोसले दिवंगत झाले. ते निपुत्रिक वारल्यामुळें त्यांच्या राणीने एक अल्पवयी मुलगा दत्तक घेतला. या दत्तविधानाचा इतका मोठ्या थाटाचा समारंभ सातारा शहरांत झाला की ‘ गेल्या १०० वर्षांत असा थाट साता-यात कोणी पाहिला नाही’ असें विश्वसनीय लोकमत आहे. बहुजनसमाजाचा आनंद तर वर्णनीय होता. ब्राम्हणांपेक्षां ब्राम्हणेतरांची दाटी अर्थात् विलक्षण दांडगी होती. भोळी बिचारी रयत! त्यांना घटकाभर स्वराज्याचा व छत्रपतींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचाच भास होऊन, साता-यांचे दैव पुन्हा उदयास आलें असें वाटूं लागलें. ब्राम्हणी कारवाईला छत्रपति प्रतापसिंहांचा बळी पडून त्यांच्या गादीवर घरभेद्या आप्पासाहेब भोसला बसला. त्या वेळच्या राज्यभिषेकाच्या सुतकी थाटानंतर आज 86 वर्षांनीं साता-यानें हा दत्तकविधानानिमित्त केलेला भव्य समारंभ पाहिला. मग आनंदाला काय पारावार ? पण हा आनंद क्षणिक आहे. नुसत्या समारंभप्रियतेचा परिणाम आहे. एक शतकपर्यंत दपडून पडलेल्या स्वातंत्र्याच्या उत्कृष्ट भावनांची ही उसाळी आहे. छत्रपतींच्या तक्ताबद्दल महाराष्ट्रियांच्या नसानसांत फुरफुरणा-या निर्व्याज व निष्कलंक प्रेमाचा हा उमाळा आहे. आपलेपणाच्या तेखदार रक्ताचा हा सणसणाट आहे. पण त्या उसाळीचा आणि उमाळ्याचा आज काय उपयोग आहे ? उत्पद्यंते विलीयन्ते दरीद्राणां मनोरथा: पैकीच सारा प्रकार. मानवांची समारंभप्रियता असल्या एखाद्या विशिष्ठ प्रसंगी आपल्या भावनांना मनसोक्त विहारासाठी मोकळे सोडते ; पण तेवढा समारंभ झाल्यानंतर पुढें काय ? तात्पुरता आनंद, त्याची तात्पुरतीच फलश्रुति. आज सातारा हें स्वतंत्र संस्थान नाहीं. तेथें स्वराज्य नाहीं, आणि छत्रपतीहि नाहीं. अर्थात् दत्तकविधानानिमित्त परवां तेथें झालेल्या भव्य समारंभात, हत्तीवरल्या मिरवणुकींत आणि त्या नाटकी दरबारांत, भिक्षुकी कारस्थानामुळें पालथें पडलेलें साता-याचें दैव यत्किंचितहि उलटे सुलटे होण्याचा संभव नाहीं. दगडा धोंड्यांना शेंदूर फासून त्यांना देवकळा आणण्यांत पटाईत असलेल्या हिंदुजनां, केवळ आपल्या भावनांच्या खुषीसाठीं, वाटेल त्या व्यक्तीपुढें ‘ छत्रपति – महाराज – सरकार - मायबाप ’ म्हणून लोटांगणें घालण्यास कांहींच अडचण पडत नसते. पण या नुसत्या लोटांगणांनी स्वराज्य किंवा छत्रपति निर्माण होते तर पृथ्वीचा स्वर्ग व्हायला कांहींच अवधि लागता ना. सारांश, परवा साता-यास झालेल्या दत्तविधान समारंभानें साता-याच्या दैवात जरी कांहीं फेरबदल झाला नाहीं, तरी दत्तक बसलेल्या भाग्यवान मुलाच्या दैवाचा सतारा मात्र कुतुहल उत्पन्न करण्यासारखा आहे खास. इतिहासाकडे पाहिले तर असें दिसून येतें कीं शिव छत्रपतींचा वंश म्हणजे दत्तकविधानाच्या बाबतींत अनेक व्यक्तींना दैवाचा सतारा ठरलेला आहे. या वंशांतील कांही दत्तविधानें राजकारणी बळजबरीची झाली तर कांही वाडीबंदराच्या एखाद्या भिवबा पांडबाला घोड्याच्या शर्यतीत लाख रुपयांचे टिकीट लागण्यासारखी झाली. नुसत्या अस्सल रक्ताच्या भांडवलाचाच विचार केला तर कित्येक भोसले जे एकदां परिस्थितीच्या प्रवाहांत वहात अज्ञात कोप-यांत पडले ते पडले, आणि भलतेच घराणेवाले भोसले बनले. -------------------------------------

साता-याच्या शाहू छत्रपतींनंतर जेवढे दत्तविधानी छत्रपति गादीवर आले, त्यांच्या शेळपटपणाला हा दत्तविधानी दैवाचा सताराच मूळ कारण झालेला आहे. शाहू छत्रपति करवीरकरांसारख्या अचाट बुद्धिमतेच्या एक दोन व्यक्ति बाद केल्या, तर बाकीचे सर्व छत्रपति म्हणजे दैवाच्या झोल्यांत हेलकावे खाणारे व भोसल्यांचा वंश कसा तरी आडनांवी पुण्याईवर पुढें चालविणारे प्राणी होते, यापेक्षां अधिक कांही नाही. कै. भाऊसाहेब महाराज सुद्धां याच पंक्तींतले. अलीकडे एक दोन ठळक प्रसंगी पुण्यांतल्या भिक्षुकी पत्रकारांनी त्यांना छत्रपति छत्रपति म्हणून जे विशेष उचलून धरले होते, ते साता-याच्या किंवा छत्रपतींच्या घराण्याच्या अभिमानानें नसून केवळ ब्राम्हणेतर पक्षाच्या चुरशीनें होय. ब्राम्हणेतरांनी करवीरकर ख-याखु-या स्वयंशासित छत्रपतीला आपला पुढारी मानला, तर भिक्षुकांनी तोडीस तोड म्हणून साता-याच्या सांदीतला छत्रपति उजाळा देऊन पुढें मांडला. ब्राम्हणेतरांचें कोल्हापूर, तर भिक्षुकांचा सातारा, ही चुरस कांही आजकालची नाही. फरक एवढाच की सातारचा छत्रविरहित छत्रपति भटांचा गुलाम असतो आणि करवीरचा छत्रपति भटांनी गुलाम बनविलेल्या कोट्यावधि