साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 2 of 15

सप्टेंबर १८३९ च्या मध्यरात्री बारा वाजतां छत्रपति प्रतापसिंहाच्या हद्दपारीनें साता-याचें दैव फिरलें आणि भिक्षुकांच्या देशद्रोहाला, धर्म-द्रोहाला आणि राष्ट्रद्रोहाला हिंदवी स्वराज्याचा अखेरचा बळी पडला. ब्राम्हणांनी हिंदवी स्वराज्याचा खून केला. यानंतर यशवंतराव शिर्के, भगवंतराव विठ्ठल चिटणीस आणि स्वराज्यवादी रंगो बापूजी इत्यादि अनेक पुरोषोत्तमांनी विलायतेची कायदेबाजी लढवून थकल्यावर, रंगो बापूजींनें १८५७ साली साता-याच्या फिरत्या दैवाचा सतारा पलटविण्यासाठी स्वराज्याच्या पुनर्घटनेचा अखेरचा म-हाटशाही धडाडीचा यत्न केला. पण ऐन घटकेलाच पंत सचिवाच्या घरभेदाच्या टोपकरी चापांत तो सापडला आणि उत्तर हिंदुस्थानांत रचलेल्या व्यूहांत ‘मर्दानी झांशीवाली’ देवी लक्ष्मी, धोंडोंपंत नानासाहेब, तात्या टोपे प्रभृति वीरांना हकनाहक राष्ट्रोद्धाराच्या यत्नयज्ञांत ठार मरावे लागले. केवळ स्वार्थासाठी राष्ट्रकार्याला आग लावण्याची ब्राम्हणी कारस्थानांची ही अखंड परंपरा पाहिली की विद्यमान राजकारणांत ब्राम्हणांच्या कासोट्याच्या आधाराने आत्मोद्धार साधू पाहणा-या माणसांना माणूस म्हणणारा माणूस एक माथेफिरू तरी असावा, किंवा अजागळ गद्धा तरी असावा. भिक्षुकांच्या हातलावणीनें आणि कावेबाज टोपकरांच्या मेहेरबानीनें, भावाच्या गादीवर घरभेद्या आप्पासाहेब भोसला छत्रपति म्हणून १८ नवंबर १८३९ रोजी जरी बसला, तरी साता-याच्या दैवाचा सतारा एकदा उलटा फिरला तो कायम. साता-याचें स्वराज्य गेलें, तेव्हांच तेथल्या भोसले घराण्याचे छत्रपतित्व मेलें. या पुढचे छत्रपति म्हणजे इभ्राहीम करीमच्या हरण छापाच्या छत्र्या वापरणारे दत्तक जहागिरदार ! यापेक्षां अधिक काय राहिले आहे ? आजचा सातारा म्हणजे पूर्वीच्या स्वराज्यरूपी आत्मा वावरलेल्या देहांचें नुसतें मढें आहे. स्वराज्याच्या आकांक्षा साता-यांत कधीच जळून खाक झाल्या आहेत. भिक्षुकी कारस्थानांच्या त्या पापभूमीवर स्वराज्याचे बीज मुळी जीवच धरणारा नाही, इतकी तेथील जमीन ब्राम्हणी तंत्रयंत्रादि मंत्रांनी वांझोटी बनली आहे. साता-यांच्या आसपास त्याच पूर्वीच्या टेकड्या आणि डोंगर आजहि आहेत. अजिंक्य तारा तोच आहे. राजवाडाहि जुनाच उभा आहे. त्यांतच जुन्या माणसांचे नवे वंशज कसे तरी कोठें तरी रहात आहेत. पण बाह्य दृष्टीला दिसणा-या या जड सृष्टीत आज कसले चैतन्य आहे !

डोंगर, टेकड्यांतून आज स्वराज्याचा पडसाद उमटत नाही. त्यांवरून वाहणा-या वा-यांत आज कसल्याहि स्फूर्तींचा संदेश नाही. अजिंक्य तारा म्हणजे दगड मातीचा एक डोंगर. कधी काळी मामलतदाराचा ‘ फास ’ घेऊन एकदा फेरफटका करून येण्याच्या लायकींचे जुनाट टेकाड. राजवाड्यांत तर काय, कायदेबाजी आणि कज्जेदलालीचा व्यापार भरभक्कम चालूंच आहे. समर्थांच्या त्या सज्जनगडावर अवघ्या दुर्जनांचा सुळसुळाट. कोठेंहि पूर्वीच्या म-हाटशाहीचा जिवंतपणा उरलेला नाही. खुद्द सातारा शहर सुद्धां उदास आणि ऐदी दिसतें. ज्या शहरांत अखिल महाराष्ट्राच्या राजकारणी व स्वयंनिर्णयी चैतन्याचा खून ब्राम्हणांनी पाडला, तेथें कसलें तेज आणि कसली भरभराट ? आज सातारा स्वराज्याकरितां प्रसिद्ध नाही. साता-याची प्रसिद्धी म्हणजे सातारी पेढा व ब्राम्हणांचा वेढा यांत आहे. स्वराज्याच्या विध्वंस केल्या दिवसापासून सातारा जिल्ह्यांतला पवित्र ब्रम्हंवृंद मारवाडी कसायाच्या धंद्याने ब्राम्हणेतर मराठ्यांच्या अज्ञानावर पोळाप्रमाणे चरून, बराच धनकनकसंपन्न होऊन बसला आहे. इंग्रजी विद्येचा प्रसार व तदंगभूत विवेकवाद कितीहि फैलवला असला आणि पदवीधरांचें प्रमाण कितीहि वाढले असले, तरी ब्राम्हणांची भोजनाची चटक कांहीं केल्या कमी होत नाही. खरकट्याच्या जन्मसिद्ध स्वराज्याच्या हक्कासाठी लढायला दरसाल किती तरी पुणेरी भिक्षुक वीर बिनचुक सज्जनगडावर जात असतात. सारांश, साता-याचे दैव सध्या अशा प्रकारचें आहे. विशेष कांही असेल तर एवढेंच की पुणेरी देशभक्तांच्या तोंडाळ लेखाळपणाचा प्रतिध्वनि साता-यांत बिनचुक उमटतो; इतका या दोन शहरांत भिक्षुकी एकजिनसीपणा आहे. एखादा ऐतिहासिक पुनरावृत्तीचा दाखला कोणी मागितलाच तर पुण्याच्या बाळंभट नातूच्या ‘ डिअरफ्रेंड खुरशेदजी मोदी ’ चा एक अवतार हल्ली साता-यांत सार्वजनिक हितवादाच्या क्षेत्रात लुडबूड करीत असतो. खालसांतल्या इतर सामान्य शह्रांपेक्षां साता-याला अधिक वैशिष्ट्य कांहींच उरलेले नाही. तेथें स्वराज्य नाही, स्वराज्याची अभिमानास्पद स्फूर्ति नाही, छत्रपति नाही, कोणी नाही. हिंदु लोक जात्याच देवभोळे असल्यामुळें, ब्राम्हणांच्या चिथावणीनें ते वाटेल त्या दगडधोंड्याचा देव बनवून त्यांच्या भजनानंदांत पृथ्वीवर स्वर्ग उतरल्याच्या कल्पनेत