साता-याचें दैव का दैवांचा सतारा

प्रबोधनकारांची खरी कर्मभूमी ही सातारा. त्यांच्या व्याख्यान्यांनी साता-याची मशागत केली, म्हणून आज सर्वत्र सातारा जिल्हा गाजतो आहे, हे उद्घार आहेत संपूर्ण महाराष्ट्राला तळहाताप्रमाणे जाणणा-या कर्मवीर भाऊराव पाटलांचे. ब्राम्हणी काव्यामुळे सातारचे पदच्युत छत्रपती प्रतापसिंह यांच्या आयुष्याची कशी धुळधाण उडाली, याची माहिती सर्वप्रथम उजेडात आणली, ती प्रबोधनकारांनीच. त्याविषय़ी साता-यात त्यांनी दिलेल्या व्याख्यानांवर आधारित या पुस्तिकेने महाराष्ट्र हादरला होता.

सातारा ! एकच शब्द आणि तीनच अक्षरे. पण त्यात किती सुखदु:खाच्या गोष्टी, आशा निराशेचा इतिहास आणि आंगावर रोमांच उभे करणा-या स्फूर्तीची व हृदयविदारक कल्पनांची साठवण झालेली आहे. हिंदवी स्वराज्याच्या पुनर्घटनेचा धडाडीचा भगिरथ प्रयत्न येथेंच झाला आणि त्या स्वराज्याच्या बलीदानाचा भिक्षुकी यज्ञ येथेंच धडाडला. छत्रपतींच्या सार्वभौम सत्ताप्रसाराची दिव्य शक्ती येथेंच प्रथम फुरफुरली व अटकेपार गुरगुरली; आणि छत्रपति मालकाची स्वारी पेशवे नोकरांच्या कैदखान्यांत येथेंच झुरणीला लागून बेजार झाली. समाज व धर्मकारणांच्या क्षेत्रांत आज मगरूर झालेल्यांच्या राजकारणांत सा-या महाराष्ट्राची स्वयंमान्य बडवेगिरी गाजविणा-या चित्पावन बृहस्पतींच्या लौकिकाची प्राणप्रतिष्ठा येथेंच साजरी झाली, आणि चित्पावनांनी आपल्या आत्मप्रतिष्ठेखातर छत्रपतींच्या प्राणांची व सत्तेची आहुती याच नगरांत दिली. जिंजीच्या आत्मयज्ञांत महाराष्ट्राची राष्ट्रीय इभ्रत तावून सुलाखून काढणारे पुरुषोत्तम येथेंच नांदले, आणि त्याच इभ्रतीचे हातपाय चित्पावनांनी केवळ आपल्या स्वार्थासाठी इंग्रजी डावपेचांच्या लोखंडी शृंखळांत येथेंच बांधले. शिवरायांच्या नांवासाठी तमाम हिंदुस्थानांत रक्ताचे सडे घालणारे वीर महावीर येथेंच थरारले, आणि भिक्षुकी पेशवे राहूंचे छत्रपतीला खग्रास ग्रहण लागतांच ब्राम्हण-भोजनाच्या खरकट्या पत्रावळी व द्रोणांचे पर्वतप्राय खच येथेंच पडले. भिन्नभन्न संस्कृत्यनुरूप महाराष्ट्रांतील यच्चावत् सर्व ब्राम्हण-ब्राम्हणेतर जातींचा देशहितासाठी व राष्ट्रोद्धारासाठी याच साता-यांत उद्धार झाला आणि चैनी व रंगेल शाहू छत्रपतीच्या राजविलासी मग्नतेचा फायदा घेऊन चित्पावनांनी चित्पावनेतरांना माजी पाडण्याच्या कटाचा भिक्षुकी पाया येथेंच घालता.

हिंदूंच्या हिंदुत्व रक्षणाचे व प्रसाराचे प्रयत्न येथेंच झाले आणि ब्राम्हण-ब्राम्हणेतर भेदाच्या विषवल्लीचे पुणेरी बीज प्रथम येथेंच पेरलें गेलें. गाई ब्राम्हणांच्या संरक्षणाचे प्रतिज्ञाकंकण चढविलेलें छत्रपति याच साता-यात गाजले, आणि ब्राम्हणी धर्माच्या यज्ञांत त्याच छत्रपतींना पेशव्यांनी जिंवत भाजून, टोपकरी सेनेला गोमांसाच्या मेजवान्यांनी येथेंच संतुष्ट केले. भट घरण्याची पेशवाई चिटणिशी कलमाच्या मखलाशींत येथेच जन्म पावली; आणि पेशव्यांच्या मखलाशीनें चिटणिशी घराण्याची राखरांगोळी येथेंच झाली. क्षत्रिय मराठ्यांच्या दणकट क्षात्रतेजावर ब्राम्हणांच्या जानवी शेंड्यांचें रक्षण याच राजधानींने केले, आणि अखेर त्याच ब्राम्हणांनी आपल्या जानवी शेंड्यांच्या वर्चस्वासाठी परकी टोपेकरांशी संगनमत करून, मराठ्यादि अखिल चित्वापनेतरांना ‘ शूद्राधम ’ ठरविण्यासाठी छत्रपति प्रतापसिंहाचा गळा याच साता-यांत भर मध्यान्ह रात्री कापला. ब्राम्हणी विद्येला उत्तेजन देणारी वेदशाला छत्रपतींनी येथेंच स्थापन केली, आणि कायस्थ मराठ्यादि क्षत्रियांना शूद्र ठरविण्याची भिक्षुकी कारस्थानें अखेर येथेच शिजली. विद्यासंपन्न भिक्षुकांना छत्रपतींनी शालजोड्यांची खैरात येथेच वाटली, आणि त्याच भिक्षुकांच्या सैतानी कारस्थानांनी हद्दपार होणारी छत्रपतींची मूर्ती एका मांडचोळण्याशिवाय उघडी नागडी स्वराज्य स्वदेशाला येथेंच मुकली. छत्रपतींच्या पायाच्या धुळीतून पंत सचीव, पंत आमात्य, पंत प्रतिनिधी, पंत पेशवे इत्यादि भिक्षुकी पंतें येथेंच निर्माण झाली, आणि अखेर याच पंत संतांनी ब्राम्हणी कारस्थानें रचून छत्रपतींला याच साता-यात अखेरची धूळ चारली. रायगडाला विसकटलेली स्वराज्याची घडी दैवाच्या साता-यानें बसवितांना छत्रपति राजाराम महाराजांनी ब्राम्हणांना आकंठ अमृतभोजन घातलें तें येथेंच, आणि ब्राम्हणी वर्चस्वाचा भिक्षुकी डोला उभारण्यासाठी छत्रपतींचा, व त्याबरोबरच हिंदवी स्वराज्याचा कंठ चरचरा चिरून ब्राम्हणांनी ब्राम्हणेतरांचा सूड उगविला तोहि येथेंच. ब्राम्हणांना चारलेल्या अमृताच्या मेजवान्यांचे पारणें अखेर हिंदवी स्वराज्याच्या खुनाच्या मुखशुद्धीत पार पडले.

-------------------------------------

दैवाचा सतारा फिरला, रायगड डळमळला, छत्रपति हाल हाल होऊन मोंगलांच्या छावणीत ठार मारला गेला, पण महाराष्ट्रांतल्या ख-या राष्ट्रवीरांचा धीर सुटला नाही. त्यांनी लगबग करून करनाटकांत राजकारणी नाटक केलें आणि स्वराज्याच्या अकल्पनीय पुनर्घटनेनें मोंगली मुत्सदेगिरीला चारी मुंड्या चीत केलें. साता-याचें दैव उदयाला आले. पण पुन्हा दैवाचा सतारा फिरला आणि ४