वक्तृत्व – कला आणि साधना: Page 10 of 75

करीत असतो. सध्याच्या जीवनात रेडिओने अत्यंत महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. रेडिओवर जशी गाणी गायली जातात, तशी भाषणे, संभाषणे, व्याख्यानेही दिली जातात. तमाशेही होतात. त्यात भाग घेणाऱ्या स्त्रीपुरुषांना स्वरांच्या आरोह-अवरोहांचा, शब्द्धाSघातांचा, स्वरांच्या वाकवळणांचा आणि विशेष म्हणजे गद्य भाषणातील सप्तसुरांचा मुद्दा विशेष अगत्याने अभ्यासणे जरूर असते. टेलिव्हिजन चालू झाले नाही तोवर हावभाव आणि मुद्राभिनयाचा प्रश्न जरी गौण असला, तरी आवाजाचे आरोग्य, कमावणी, स्वरोच्चार यावरच भाषकांना रेडिओवर आपली करामत दाखवायची असते, निरनिराळ्या भावना, विकार आणि विचार यांचा प्रभाव व्यक्त करायचा असतो. पण काय सांगावे ! रेडिओवर भाषणे करणारांपैकी शेकडा ९५ स्त्रीपुरुषांना अजून या महत्त्वाच्या मुद्यांची असावी तितकी जाणीव मुळीच नसल्याचे आढळते. रेडिओवर होणारी भाषणे ‘वाचावी’ लागतात. इतकेच नव्हे तर ती प्रथम ‘बोलायच्या भाषाशैलीने लिहावी’ लागतात. आणि या एकाच मुद्याचे ज्ञान बहुतेक भाषकांना नसल्यामुळे, रेडिओवरची मोठमोठ्या विद्वानांची भाषणे अगदी भिकारडी होतात. शब्दोच्चारांतही ‘निरनिराळा’ या शब्दाचा उच्चार ‘नीSरनिराळा’ करण्याची रेडिओ भाषकांत तर शर्यतच लागलेली दिसते. या मुद्यावर ‘भाषाशैली’ प्रकरणात आणखी सूचना दिलेल्या आहेत, तिकडे विद्यार्थ्यांनी अगत्य लक्ष्य द्यावे. स्वगत भाषणे अभ्यासा आरोहावरोह आणि स्वरांची भिन्नभिन्न विकारांनुसार होणारी वाकणे नि वळणे, यांचा अभ्यास करणारांनी काही निवडक जुन्या इंग्रजी मराठी नाटकातील स्वगत (सॉलिलोकी) भाषणांचा श्रवणनिरीक्षण पूर्वक अभ्यास करावा. शक्य तर ती नाटके मुद्दाम पहावी, म्हणजे पटाईत नट ती कशी वठवितात, हे प्रत्यक्ष समजून यईल. प्रथम ते नाटक नीट अभ्यासावे, निरनिराळ्या पात्रांच्या भूमिका समजावून घ्याव्या, म्हणजे स्वगत (आत्मगत) भाषण करणाऱ्या पात्रांच्या त्या त्या प्रसंगाच्या मनोविकारांच्या खळबळीचा आपल्याला प्रत्यय पटून, त्यांच्या भाषणातील भावनांचा रागरंग कळेल. भूमिका आणि प्रसंग नीट पटल्याशिवाय, निरनिराळ्या विकाराच्या हेलकाव्यांनी विचार कसे खळबळत बाहेर पडतात, शब्दोच्चारांचा चढ उतार कसा होतो आणि चित्तवृत्ती दाटून कोंदटल्यावर आवाजाची भिंगरी अगदी खालच्या खर्जात कशी जोरावर रोरावते, याचा अनुभव घेता येणार नाही. वर मी जुन्या नाटकाची शिफारस केली आहे. त्याच नाटकात उत्कृष्ट आत्मगत भाषणांचे नमुने आढळतील. नव्या पालवीच्या नाटककारांना आत्मगत भाषणांचे अर्जीर्ण झालेले दिसते. आत्मगत भाषण म्हणजे काय ? ‘‘आत्मगत भाषणाचा प्रसंग म्हणजे स्वतःशी एकाग्रचित्त एकांताचा अनुभव. आपण कसे व्हावे, कसे असावे, हे एकांत दाखवतो. आम्ही कसे आहो हे समाज सांगतो. वास्तविक पाहिले तर, समाजाच्या अभिप्रायापेक्षा, आपल्या खऱ्याखुऱ्या प्रकृतिधर्माची ओळख एकांतातच होत असते. एकांतात आपल्याला निसर्गाचे प्रत्यक्ष दर्शन होते. आसपास कोणी कुजबुजले का झाला त्याचा खेळ बंद. एकांतात निसर्ग आपल्याला नवनव्या योजनांचे मनमोकळे पाठ देत असतो. येथेच त्याचे शुद्ध स्वरूप पाहता येते.’’ (रेवरंड रिचर्ड सेसिल. ज. १७४८, मृ. १८१०) अभ्यासगतासाठी धडे शेक्सपियरच्या हेम्लेट नाटकातील त्या राजपुत्राची (सॉलिलोकी) स्वगत भाषण वाङ्मय, शब्दयोजना, त्यातून आपोआप निर्माण होणारे विचार-विकारांचे तुफान, सर्वच बाबतीत श्रेष्ठ गणली जाते. या नाटकाची मराठीत दोन भाषांतरे झालेली आहेत. पैकी आगरकरांचे विकारविलसित हेच काय ते नाटकवाल्यांना आणि लोकांना माहित. दुसरे, आनंदराव बर्वे यांनी लिहिलेले (स्वतंत्र रचनेचे) हिंमतबहाद्दर हे नाटक विस्मरणाच्या पडद्याआड कधीच बेपत्ता झाले आहे. आगरकर प्रबंधकार. बर्वे नाटककार. म्हणून विकारविलसितापेक्षा हिंमतबहाद्दर नाटकातल्या पात्रांची भाषा सरळ नि त्यांनी आपल्या प्रस्तावनेत कबूलही केलेले आहे. हिंमतबहाद्दराच्या स्वगताची बैठक मूळ शेक्सपिरच्याच विचारांची असली, तरी बर्वे यांनी नाट्यौधानुसार ती आपल्या भाषेत स्वतंत्र लिहिली आहे. आगरकरांच्या तर्जुम्यातील भाषेची दुर्बोधता दाखविण्यासाठी, त्या स्वगताचे मी बोलभाषेत केलेले (सरळ) रूपांतर वाचकांनी तोलून पहावे. HAMLET’S SOLILOQUY To be, or not to be, - that is the question : Whether ‘tis nobler in the mind to suffer. The slings and arrows of outrageous Fortune Or to take arms against a sea of troubles, And by opposing end them ? To die – to