वक्तृत्व – कला आणि साधना: Page 7 of 75

बसवलेली असते. माईकमधून वक्ता बोलू लागला की ती त्याच्या थेट तोंडासमोर येते आणि श्रोत्यांना वक्त्याचे तोंड बिलकूल दिसत नाही. श्रोता-वक्ता परस्परा ‘सन्मुख’ असला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरील विकाराभिनय स्पष्ट दिसले पाहिजेत. ते या पट्टीच्या अडथळ्याने दिसत नाहीत. हा प्रकार टळला पाहिजे आणि सभेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्याला बजावून ती पट्टी काढून टाकायला सांगायला पाहिजे. एका गायनाच्या बैठकीत तर या अर्धचंद्राचा भलताच परिणाम दिसून आला. गायिकेच्या समोर पट्टीवाला माईक ठेवला होता. माईकच्या मागे असलेल्या फूटलाईटचा प्रकाश गायिकेच्या तोंडावर पडावा, अशी योजना होती. पण मध्येच त्या पट्टीची काळीकुट्ट पडछाया तिच्या नेमकी तोंडावर पडून लांबून पाहणाऱ्याला बाईला भरघोस मिशा असल्याचा स्पष्ट भास होत होता. ती सुरूप बाई हकनाहक कुरूप दिसत होती. म्हणून यापुढे त्या अर्धचंद्र पट्टीलाच अर्धचंद्र देण्याची कसोशी सर्वत्र राखली पाहिजे. (३) आरोह अवरोहांचा विचार व्याख्यानात आपल्याला आपले विचार, विकार आणि भावना शब्दांनी व्यक्त करायच्या असतात. शब्दांना सूर अथवा स्वर असतात. स्वरांच्या आरोहावरोहांनी म्हणजे आवाजाच्या लवचिक चढणी उतरणींनी त्या भावना नि विकार शब्दांच्याद्वारे प्रकट करावे लागतात. यासाठी स्वरज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना असणे जरूर आहे. गद्य बोलताना काय, वाचतांना काय, किंवा पद्य गाताना काय, आपण ठराविक सात सुरांचा आणि त्यांच्या पोटभेदांचाच उपयोग करीत असतो. साध्या बोलण्यातही संगीत असते. झारदार भिंगरीदार आवाजाच्या संदुर चढणी उतरणीने, म्हणजेच आरोह-अवरोहांनी, सहज बोलणाराच्या आवाजाचा गोडवा श्रोत्यांना तेव्हाच आपलासा करतो. बोलण्याच्या त्या गद्यातही एक प्रकारची संगीताची खुमारी असते. एका सुरात बोलणे खरे म्हटले तर अनैसर्गिक आहे. तरीही एकसुऱ्या आवाजात भाषणे करून श्रोत्यांच्या कानांना शिक्षा देणारे रटाळ वक्ते नसतातच असे नाही. आरोहावरोहांचा उगम भावनांतून होत असतो. भाषणात खरे महात्म्य भावनेला आहे. स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोहावरोह, निरनिराळ्या गोष्टीतील, विचारातील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात. स्वरांचा वांक जर लांबट असेल, तर तो सत्य वचनांचे महत्त्व सुचवतो. सरळ थेट असेल तर कार्याची प्रत्यक्षता सिद्ध करतो. सौन्दर्य किंवा सहानुभूती दर्शविण्याच्या वेळी या वाकांत लहरी उत्पन्न होतात. हेच वांक तुटक तुटक उत्पन्न झाले, तर निर्बलता आणि विचारांची अनिश्चितता दाखवितात. नागमोडी किंवा लहरींवर लहरी अशा प्रकारचे स्वरांचे वाक व्यंगोक्ती, कुत्सितपणा, द्वेष अथवा दुटप्पीपणा यांचे दर्शक होतात. स्वरांच्या खोचा, वांक आणि आरोहवरोह यावरूनच वक्त्याच्या मनाचा कल नि त्याची प्रवृत्ती यांचा श्रोत्यांना बोध होतो. आशा प्रदर्शित करणे, एखादी गोष्टी किंवा विचार तहकूब करणे, त्याबद्दल शंकार व्यक्त करणे, एखादा विशेष भेद अथवा विचार स्पष्ट उघडा करून दाखविणे, या वेळी स्वरांचा कल सहाजिकच चढता असतो. ज्या वेळी एखाद्या शब्दावर अथवा वाक्यावर शब्दाSघात करायचा असतो, किंवा विचारपूर्णता दाखवायची असते, तेव्हा स्वरांचा कल पडता असतो. अभ्यासाचा धडा जगातील चित्रे आणि चरित्रे ही पराक्रमाची फळे आहेत. विलक्षण गुणांचे काही महत्कृत्य केल्यावाचून कोणाचे चित्र किंवा चरित्र उत्पन्न होत नाही. आधी चरित्र आणि मग चित्र, असा वास्तविक क्रम आढळतो. चरित्र चांगले असले म्हणजे त्याचे चित्र सिद्ध करण्याची इच्छा होत असते. देवादिकांचे नि माणसांचे जे पुतळे आपण पहातो, त्या सगळ्यांचा प्रकार हाच. चित्र ही हाताची कृती आणि चरित्र ही मनाची कृती. चित्र ही मूर्तीपुजा, तर चरित्र ही मानसपूजा. चित्र हे सगुण भक्तीचे साधन, तर चरित्र हे निर्गुण भक्तीचे साधन होय. जगातील चित्रे नाहीशी झाली, तर कोणाचे फारसे अडायचे नाही, पण चरित्रे नाहीशी झाली तर मात्र फार अडेल खास. म्हणजे चरित्र हे प्रधान आणि चित्र हे गौण. चरित्राच्या योगाने चित्राला मोठेपण येत असते. वामन पंडितांनी म्हटलेच आहे ना, नामसुधेत की “हरिपण हरिनामे धातुर्मूर्तीस आले” आपण माणसे मूर्तीस नाव ठेवल्यावर म्हणजे तिची प्राणप्रतिष्ठा केल्यावर, तिला भजू लागतो. याचा अर्थ हाच की, चित्राला मोठेपणा