वक्तृत्व – कला आणि साधना: Page 6 of 75

खरखर, चिरफाळ्या किंवा किंचाळ्या येऊ शकतात. त्या टाळल्या पाहिजेत. दहा फुटांवरील माणसाशी आपण बोलत असताना आवाजाचा जो विस्तार असतो, तो १०० किंवा १००० माणसांच्या समुदायाला ऐकू जाईल इतका प्रमाणबद्धच वाढवला पाहिजे. म्हणजे, समजा, अर्धा कार्ड आकाराचा फोटोग्राफ १२” X १५” प्रमाणात वाढवला म्हणजे चित्रातला तपशील (डीटेल्स) जसा प्रमाणबद्ध वाढतो, नेमका फफकरक तोच प्रकार आवाजाच्या बाबतीत असला पाहिजे. आपला आवाज सामान्यतः कोणत्या पट्टीतला आहे हे निश्चित झाल्यावर, अनुभवी वक्ते व्याख्यानाला जाण्यापूर्वी, आवाजाची अखेरची टीप आज कोठवर जाऊ शकते, याचा अंदाज घेऊनच व्यासपीठावर चढतात. आवाजाशी धिंगामस्ती नको आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारिरीक अथवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा दिलखुलास असावा. चोरटा नसावा. गवयात नेहमी दोन भेद आढळतात. एक केवळ कण्ठातून सूर काढून गाणारा आणि चांगले अनुभवी गवई स्वरांच्या उद्गम बेंबीपासून (अबडोमेनल मसल्स मधून) काढून गाणारे, खरी पद्धत हीच. वक्त्यांनीही हेच केले पाहिजे. नरड्यातून आवाज काढणाराला मोकळेपणा साधत नाही आणि आवाजाचा विस्तारही करता येत नाही. विस्तारात सप्तसुरांचे भेद, विचार, विकार यांच्या प्रदर्शनानुसार स्पष्ट व्हावे लागतात. भाषणाच्या स्वरविलासात एकतानता (हार्मनी) असावी. पण एकतानता म्हणजे एकसुरेपणा नव्हे. एकसुरे वक्ते तात्काळ श्रोत्यांच्या मर्जीतून उतरतात. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात रहाते. श्रोत्यांनाही ते विचार जसजसे व्यक्त होत जातील, तसे मोजूनमापून ग्रहण करता येतात. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवित असतो. धाकटा विल्सम पिट् याचा क्षुल्लक सुस्कारासुद्धा ब्रिटीश लोक सभेच्या भव्य सभागृहाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येत असे. या जवानाने आपला आवाज इतका पद्धतशीर कमावला होता की, त्याच्या केवळ २१ व्या वर्षी त्या आवाजानेच उभ्या ब्रिटीश साम्राज्याला आपल्या धाकात ठेवले होते. वेब्सरचा आवाज तर इतका भरघोस नि भिंगरीदार असे, की सभा आटोपून घरी गेलेल्या श्रोत्यांच्या कानात कित्येक दिवस तो सारखा घुमत असे. एके प्रसंगी सुभाषितातले वाक्य वेब्सटरने इतके ठासून आवेशाने उच्चारले की, त्याच्या समोरचे श्रोते आपापल्या खुर्च्यातून ताडकन् उठून उभे राहिले. मायक्रोफोनचा दुरूपयोग जुन्या जमान्यात ५-५ नि १०-१० हजार लोकांच्या सभेत बोलणाऱ्यांना आवाजाची फेक चढी ठेवूनच भाषणे करावी लागत असत. त्या चढ्या आवाजाच्या बैठकीवरून सुद्धा, आवाजाचे आरोह, अवरोह, वाक-वळणे, ठाकठीक वठवून, तत्कालीन बाबू सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, डॉ. अनी बेझण्टबाई, नाम. गोखले, शिवरामपंत परांजपे, मुजफरपूरचे हंसस्वरूप स्वामी प्रभृती मंडळी हा हा म्हणता श्रोत्यांची हृदये काबीज करून, त्यांना आपल्या विचारांनी भारून टाकीत असत. आजकालच्या वक्त्यांपुढे मायक्रोफोन नसला की त्यांची त्रेधातिरपीट उडते. याचे कारण, बहुतेकांच आवाज शास्त्रशुद्ध कमावलेले नसतात. आजकाल मायक्रोफोनची सोय असल्यामुळे, वक्त्यांची भाषणे हव्या तितक्या दूरवर जशीच्या तशी स्पष्ट ऐकू जातात. पण मायक्रोफोनवर बोलताना, आवाजाची गति, स्थिती कशी नि किती ठेवावी, हे शेकडा ८० वक्त्यांना कळत नाही. पुष्कळजण मायक्रोफोनजवळ आपले तोंड अगदी भिडवून मोठमोठ्याने ठणाणा करीत असतात. त्यामुळे आवाजाचा प्रतिध्वनी निघतो आणि कोणाला नीट काहीच ऐकू येत नाही. वास्तविक मायक्रोफोन आहे कशासाठी ? आपण सहज ज्या आवाजाच्या टिपेने बोलू, ते मायक्रोफोनने जशाचे तसे हवे तितके दूरवर सहज ऐकू जाते. पण हातात माईकचा दांडा घट्ट धरून ठणाणा करणारांना ही साधी गोष्टही समजू नये, हा बुद्धीमांद्याचा एक प्रकार होय. टेलिफोनवरही असे ठणाणा करून बोलणारे असतात. काही मोठे लोक माईकचा दांडा हातात धरतात नि जवळ तोंड नेऊन ओरडतात, म्हणून आपणसही तसे करावे, ही त्या मोठे लोकांइतकीच चूक आहे. माईकवर खूप मोठ्या आवाजाने बोलणे, ही आवाजाची ‘वारेमाप उधळपट्टीच’ होय. ती जरूर टाळावी. त्या अर्धचंद्राला अर्थचंद्र द्या माईकच्या दांड्यावरील यंत्राच्या जवळच, माईक-व्यापाऱ्याच्या नावाची जाहीरात करणारी एक अर्धचंद्राकृती पोलादी पट्टी