वक्तृत्व – कला आणि साधना: Page 5 of 75

रे ग म प ध नी या सप्तसुरांचे महत्त्व केवळ गायनशास्त्रापुरतेच मर्यादीत नाही. आपल्या कंठातून निघणाऱ्या आवाजातही हेच सप्त सूर असतात. उच्चारला जाणारा कोणताही स्वर या सप्तस्वरांपेक्षा निराळा असूच शकत नाही. ही गायनशास्त्राची व्याख्या वक्तृत्वशास्त्रालाही लागू आहे. सहजगत्या होणाऱ्या संभाषणावरून एखाद्याचा आवाज कोणत्या पट्टीतला (सप्तकातला) आहे, कोणत्या पट्टीपर्यंत चढू शकेल, गायकीच्या लायक आहे किंवा नाही, चालू रेडिओच्या भाषेत सांगायचे तर, मायक्रोफोनला फिट् आहे का नाही, यापुढे तो फुटणार आहे का फुटला आहे, फुटल्यास सुधारेल का नाही, इत्यादी गमके कित्येक अनुभवी संगीतपटू तंतोतंत पटवून देतात. स्वरांची सप्तके तीन. मंद्र, मध्य आणि तार. मद्र म्हणजे नेहमीच्या आवाजापेक्षा कमी टिपेचा. मध्य म्हणजे नेहमीचा आणि तार म्हणजे नेहमीच्या आवाजेपक्षा उंच टिपेचा. मंद्र सप्तकाचा आवाज फुफ्फुसांतून निघतो. मध्य सप्तकाचा आवाज कंठातून आणि तार सपत्काचा आवाज तालूतून काढावा लागतो. प्रत्येकाच्या आवाजाची टीप किंवा पट्टी निरनिराळी असली, तरी बोलताना किंवा गाताना त्या-त्या पट्टीच्या सारेगमपधनी स्वरांचाच भरणा त्यात असतो. गवयी गायला बसला म्हणजे साथीदार प्रथम त्याच्या आवाजाच्या पट्टीची चौकशी करतात. (हारमोनियमच्या भाषेत बोलायचे तर) कोणी काळी दोन मध्ये गातो, कोणी पांढरी चार मध्ये तर तिसरा काळी पाच टिपेचा असतो. ज्याची जशी टीप असेल तसे तंबोरावाला, व्हायोलिन, सारंगीवाला आणि तबलजी आपापली हत्यारे ‘लावून’ घेतात आणि सगळ्यांची ‘सुरावट एकतान जमली’ म्हणजे जलशाला प्रारंभ होतो. प्राचीन ऋषींनी हे सप्त स्वर कित्येक प्राण्यांच्या आवाजावरून संशोधनपूर्वक निश्चित करून त्यांना शास्त्रीय नावे दिली. ती अशी – सा रे ग म प ध नी मोर बैल बोकड क्रौंच कोकिळ घोडा हत्ती षड्ज ऋषभ गंधार मध्यम पंचम धैवत निषाद आरोह अवरोह सा पासून चढ्या टिपेने नी पर्यंत क्रमाक्रमाने स्वर म्हणण्याच्या क्रियेला आरोह म्हणतात आणी नी पासून उलट उतरत्या टिपेने सा पर्यंत स्वर म्हणण्याच्या क्रियेला अवरोह म्हणतात. या आरोह, अवरोहातही स्वरांचे आणखी कितीतरी पोटभेद आहेत. नुसते सारिगमपधनिसा – सानिधपमगरिसा करून भागत नाही. त्यातही कोमल, कोलमतर, कोलमतम; तीव्र, तीव्रतर, तीव्रतम इत्यादी अनेक खाचाखोचा नि भेद आहेत. मानवी मुखातून बाहेर पडणाऱ्या आवाजात भिन्न भिन्न असे २००० कंप आहेत, असा डेलसार्ट या संगीतज्ञाचा सिद्धांत आहे. या नानारंगी स्वरज्ञानात जो पटाईत असतो, तो दिलरुबा किंवा सारंगीसारख्या तंतूवाद्यावरही गद्य भाषणाचे स्वर उमटवू शकतो, असे म्हणतात. मानवी कंठात इतके विविध प्रकारचे स्वर निघू शकतात की, ते यथातथ्य उमटवण्याच्या कामी सतार, सारंगी किंवा दिलरुबा ही तंतूवाद्ये जशी उपयोगी पडतात, तशी हारमोनियम पेटी पडत नाही. पंडित विष्णू दिगंबरजींनी एकदा तर स्पष्ट म्हटले की, ‘भारतीय गायनाची यथातथ्य साथ करण्याच्या कामी हारमोनियम पेट्या मुळीच लायक नाहीत. कारण त्यात कित्येक स्वरच नाहीत.’ डॉ. रवींद्रनाथ टागोरांनी याच मताला दुजोरा दिला होता. (बॉम्बे क्रानिकल, नोव्हेंबर १९१५) ऑल इंडिया रेडिओवर हारमोनियमला बहिष्कार आहे, तो याच कारणामुळे असावा. आवाजाचे आरोग्य कसे कमवावे ? सगळ्यांनाच उत्तम आवाजाची देणकी लाभलेली असते, असे नाही. सगळ्याच गोष्टी ईश्वरदत्त किंवा किंवा जन्मजात मानल्या, तर व्यवहारात प्रयत्नवादाला किंमतच उरणार नाही. शारिरीक बळ कमविण्यासाठी जशी तालीमच करावी लागते, ठराविक आणि नियमित व्यायाम घ्यावा लागतो, नेमका तोच प्रकार आवाजाच्या कमावण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी नि महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर अगर पेटीच्या स्वरावर खर्च लावण्याच्या कसरतीने किरटे, घोगरे, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत. या खर्चाच्या नियमित तालमीने कंठ, टाळू निकोप राहतात; एवढेच नव्हे तर छातीचाही दमछाकपणा वाढीला लागून, आवाजाचा विस्तार (व्हॉल्यूम) हवा तसा लहान मोठा करण्याची हिकमत अंगवळणी पडते. आवाजाचा विस्तार म्हणजे नुसते मोठ्याने ओरडणे नव्हे. त्या विस्तारालाही कणखर गोडवा असला पाहिजे. पद्धतशीर तालमीशिवाय केलेल्या आवाजाच्या विस्तारात