वक्तृत्व – कला आणि साधना: Page 4 of 75

तरी जसजसा लोकशाहीचा उत्कर्ष होत जाईल, तसतशा त्याही जागोजाग निर्माण होतील. खरे म्हटले तर गायन कलेप्रमाणे वक्तृत्वाचे सर्वांगीण धडे गुरुसंनिधनच मिळाले तर बरे. तथापि कलेचे शास्त्र म्हणून या पुस्तकाचा महत्त्वाकांक्षी उमेदवारांना पूर्वी (सन १९१८) पुष्कळ उपयोग झाला आणि चालू लोकशाही जमान्यात तर होईलच होईल, असा मला आत्मविश्वास वाटतो. (२) आवाजाचे आरोग्य आणि महत्त्व श्रोतृन्मूक्यति ब्रुवन्स्थिरतम कुर्वन्नमीषां मनो निर्बाष्पः परबाष्पकृत्परदृशामेकाश्रयो नान्यदृक् यस्त्थक्तांगाविकम्पनः प्रचलयन्नित्यं सतां मस्तकं क्षीर श्रोतृषु मुख्यमात्मनि गुणंधत्ते स वक्तोत्तमः Two voices are there, one is of the sea, One of the mountains; each a mighty Voice, In both from age to age thou didst rejoice, They were thy chosen music, Liberty ? Wordsworth, Poems to National Independence. आवाज हे वक्तृत्वाचे मुख्यांग. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य संस्कृतीचा तेव्हाच बोध होतो. भरघोस कणखर, पण गोड आवाजावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा चटकन पडताळा पटतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला खर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे का हळवा, कमजोर नि मिंधा आहे, याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंतःकरणातील गूढ विकाराचे अविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे, शीलाने तो कच्चा का पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात निस्पृहता आहे का दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार, त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे का कोता, वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना तेव्हाच होतो. आवाजाचे महत्त्व भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकिळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघात बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही, उत्तम, गहिरा नि मोहक आवाजाचा चतुरस्त्र आसामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी आपली छाप पाडतो की, थोड्याच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते, असा बनाव बनतो.

आवाजालाही व्यायाम हवाच व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती आणि काव्य शास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरूरी आहे, हे फार थोड्यांच्या लक्षात येते. आवाजाचे आरोग्य वाढविण्यासाठी नि टिकवण्यासाठी गवई लोक जी मेहनत घेतात, तिचा त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य समधात राखण्याच्या कामीही फार उपयोग होतो. सकाळ, संध्याकाळ २-२ तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणारांचे आवाज नि आरोग्य उत्तम राहतात. उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता, तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षा त्याच्या भरघोस, मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते, तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत असत, तसेच त्यांचे व्याख्यान प्रवचन चालले असतानाही तल्लीनतेने माना डोलवीत ध्वनिदंग होत असत. कै. नामदार डॉ. मुकुंदराव जयकरांचा आवाज त्यांच्या उतार वयातही खणखणीत झारदार होता. तरुणपणापासून त्यांना संगीताचा नाद होता. स्वतः ते दिलरुबाही छान वाजवीत असत. महाराष्ट्र महर्षी धोंडोपंत कर्वे. त्यांनी तर शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातला गोंडसपणा नि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजीचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम ? शारीरिक व मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरूषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले. जीवन म्हणजे संगीत, हे कितीही खरे असले, तरी जीवनात सर्वत्र संगीत ओतून जगणारे फार थोडे. संगीताच्या अभ्यासाने मनुष्याच्या फुफ्फुसांना चांगला व्यायाम मिळतो. हा एक प्रकारचा प्राणायाम विधीच आहे म्हणा ना. तंबोऱ्यावर नेहमी सूर लावून खर्जाची तालीम करणाऱ्यांच्या छातीचे विकार नाहीसे होतात. सप्त स्वरांचे माहात्म्य सा