वक्तृत्व – कला आणि साधना: Page 3 of 75

एक नुसता गौरवाच्या भाषेचा प्रकार आहे. काव्य किंवा वक्तृत्व ह्याविषयाच्या आवडीचा अंकुर कित्येकात स्वाभाविक असला, तरी ज्यांच्यात तो नसेल, त्यांना अभ्यासाने कोणतीही कला साध्य करताच येत नाही, असा मात्र नियम नाही. उपजत कलेच्या अभावाने धीर खचण्याचे कारण नाही. एक गोष्ट सांगतो. पुण्याला श्रीधर विठ्ठल दाते नावाचे एक अत्यंत बुद्धीमान परंतु महाविक्षिप्त गृहस्थ होते. गायनाच्या मैफलीला एकदा गेले असताना, गवईबुवांची नि त्यांची काही बोलाचाल झाली. झाले, दात्यांनी पैज मारली. सहा महिन्यांत तंबोरा घेऊन तुमच्याशी गायनाच्या सामन्याला बसतो. स्नेही-सोबती हसू लागले. दात्यांचा आवाज जाडाभरडा, पल्लेदार आणि भसाडा. हा कसला गवई होणार ? पण दाते मात्र ठासून म्हणाले, “नावाचा श्रीधरपंत दाते आहे मी. म्हणेन ते करून दाखवीन.” दुसऱ्या दिवसापासून दात्यांच्या दिवाणखान्यात तंबोऱ्याचे झणत्कार ऐकू येऊ लागले. एक नामंकित गवई त्यांनी शिकवणीला ठेवला. रात्रंदिवस गाण्याच्या शास्त्रोक्त तालमी चालल्या आणि खरोखरच सहा-सात महिन्यांच्या अखेरीसच श्रीधरपंत दात्यांनी आपल्या दिवाणखान्यात आपल्या शास्त्रोक्त (क्लासिकल) गायनाचा जलसा करून श्रोत्यांकडून वहावा मिळवली. यावरून दाते जरी अगदी पट्टीचे गवई बनले नाहीत, उतार वय होईपर्यंत ज्याला गायनातील सारेगमचाही वास कधी चुकून लागला नाही, त्यांनी श्रमांची पराकाष्ट्रा करून, खाजगी बैठकीपुरते शास्त्रोक्त गायनाचे ज्ञान केले, ही काय सामान्य गोष्ट झाली ? लोकशाही ग्रीस देशात इ. स. पूर्वी ३८३ वर्षी जन्मलेल्या आणि वक्तृत्वच्या जोरावर तेथील अग्रगण्य लोकनेता बनलेल्या डिमॉस्थेनीस या अजरामर वाग्भटाची माहिती लक्षात ठेवण्यासारखी असल्यामुळे, ती येथे मुद्दाम देत आहे – “हा महाविख्यात वक्ता अथेन्स शहरी जन्मला. तो पुढे जरी महान योग्यतेस चढला, तरी त्याचे अंगचे वक्तृत्व प्रथमतः कच्चेच होते. ते असे की आवाज कोता, उच्चार साफ नाही आणि अंगविक्षेप श्रोत्यांचे चित्त वेधून टाकणारे नव्हते.

यास्तव हा जेव्हा एके प्रसंगी सभेत पहिल्यांदाच बोलावयास उभा राहिला, तेव्हा सर्वांनी वरील दोषांमुळे त्याची हुर्रेवडी उडवली. पण त्यामुळे हा खचून न जाता त्याने आपल्या अंगचे वरील दोष काढून टाकण्याविषयी सतत उद्योग चालवला. तो असा. त्याचा आवाज कोता होता, यास्तव तो मोठा व गंभीर करण्याकरिता त्याने समुद्रतीरी एकांती जावे आणि समुद्राच्या प्रचंड लाटा उसळू लागून त्यांची मोठी गर्जना होत असता तेथे खूप मोठ्याने आपली भाषणे म्हणावी. तसेच डोंगरांच्या दरडीवरून खाली वर पळत जाण्याची सवय करून त्यास दम छाटत नसे तो छाटेसा केला आणि उच्चार साफ होत नसे यास्तव तोंडात बारीक गारगोट्या धरून त्याने आपला शब्द बाहेर चांगला उमटेसा केला. याप्रमाणे वाणीचे जेवढे दोष होते, तेवढे काढून टाकल्यानंतर डिमॉस्थेनीसने तिचे मोहकत्व वाढविणारे जे कित्येक गुण ते आपल्या ठायी आणण्याचा यत्न चालविला. अथेन्स येथे रंगभूमीवर नाटक प्रयोग होत असत. यास्तव त्या कलेत अत्यंत प्रवीण असणाऱ्या काही नटांपाशी तो अगंविक्षेपादिक शिकला. तसेच आपल्या भाषणाची रचना प्रौढ, रसभरीत व मनोवेधक अशीआपणास करता यावी, या उद्देशाने नामांकित इतिहासकार जो थुसिडिडीज यांचा ग्रंथ त्याने आठदा आपल्या हाताने लिहून काढला. याप्रमाणे एवढे अचाट श्रम कित्येक वर्षेपर्यंत जेव्हा डिमॉस्थेनीस याने केले, तेव्हा त्याच्या देशबांधवांत त्याचे तेज पडून सर्वांवर त्याचा पगडा बसला आणि देशहिताची मोठमोठी कामे जी त्याने केली, ती त्याच्या हातून घडली” (निबंधमाला, वक्तृत्व, पान २४७-४८) सारांश, नामांकित वक्त्यांचा परिणामकारक नि बहारदार वाग्विलास पाहून व ऐकून, ‘आपल्याला हे कसे जमणार बुवा ? तेथे पाहिजे जातीचे’ असल्या निराश भावनेच्या पचनी हकनाहक पडणारांनी अभ्यासाने अशक्य ते शक्य होत असते, हा सिद्धांत डोळ्यापुढे ठेवूनच वक्तृत्वच्या अभ्यासाला लागावे. वक्तृत्वला अनुकूल काळ आला आहे वक्तृत्वचा जागतिक इतिहास पाहिला तर ज्या ज्या राष्ट्रात लोकशाही प्रस्थापित झाली, तेथे तेथे वक्तृत्वला खरा जोमदार बहर आला.

लोकशाहीतच वक्तृत्वकलेचा उत्कृष्ट उत्कर्ष होत असतो. आज आपल्या येथे वक्तृत्वाच्या पाठशाळा नसल्या