वक्तृत्व – कला आणि साधना: Page 2 of 75

ठराविक नियमांची शास्त्रीय बैठक हवीच हवी, असा सिद्धांत मांडला तर कला आधी का तिचे शास्त्र आधी, असा प्रश्न पुढे उभा राहतो. कोंबडे आधी का अंडे आधी ? झाड आधी का बीज आधी, इतका काही हा कोडेबाज सवाल नाही. वक्तृत्व म्हणजे वाग्विलास, वाणीचा विलास. आधी वाणी, नंतर तिचा विलास आणि त्यानंतर त्या विलासाच्या मर्यादा नि तिच्या शक्तीचा प्रभाव नियमित करण्यासाठी शास्त्राचे नियम, असा क्रम साहजिक दिसतो. शिल्पकार शास्त्रीय नियमाने छिनीचे टोले मारून, दगडातून देवाची प्रेक्षणीय मूर्ती निर्माण करतो, या नियमाने वागश्क्तीलाही नियमांचे काही ठराविक बंधन घालून, मानवतेच्या कल्याणाकडे तिचा उपयोग करण्यासाठी वक्तृत्वशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे. वाग्शक्ती जशी वाग्भूषण होते, तशी वाग्दूषणही होऊ शकते. अडॉल्फ हिटलरने म्हटले आहे की, “युगान्तर घडविणाऱ्या क्रांतिकारक घटना लिहिलेल्या शब्दांपेक्षा तोंडून निघालेल्या शब्दांनीच घडवून आणलेल्या आहेत.” प्रसिद्ध जर्मन कवी आणि तत्त्ववेत्ता गटे म्हणतो, “कोणतीही कला पूर्णत्वाला पोचण्यापूर्वी, ती साध्य करून घेण्यासाठी प्रथम पाया शुद्ध आणि पद्धतशीर अभ्यास बराच नि बिनचूक झाला पाहिजे.” वक्तृत्व कलेलाही हा नियम लागू पडतो. जिला आपण प्रासादिक, सहजस्फूर्त नि जातिवंत कला म्हणतो, तिची उभारणी शास्त्रीय अभ्यासावरच झालेली असते. व्याख्यानात आवाजाचा उपयोग निरनिराळ्या प्रसंगी कसा करावा, निरनिराळे विकार सहजगत्या चेहऱ्यावर कसे उमटवावे, मनोविकाराचे अनेकरंगी भाव व्यक्त करण्यासाठी भाषाशैलीची आणि शब्दोच्चारांची ठेवण कशी ठेवावी, इत्यादी वक्तृत्वाच्या अनेक अगोपांगांमध्ये बिनचूकपणा, लवचिकपणा नि साहजिकपणा कमावण्यासाठी, त्या कलेच्या शास्त्रीय म्हणजेच अनुभविक नियमांचा नि सिद्धांतांचा निर्धाराने, कळकळीने आणि उत्साहाने अभ्यासच केला पाहिजे.

कलेशी तादात्म्यता म्हणजेच प्रावीण्य कलेत मुनुष्य प्रवीण झाला, पक्का पटाईत झाला, आसे केव्हा समजावे ? जेव्हा त्या कलेशी तो तद्रूप होऊन ती कलाही त्याच्यात एकजीव एकतान विलीन होते, तेव्हा. मृदंगवादनाचीच कला घ्या. नवशिक्या जेव्हा या मृदंगवादनाचे शास्त्र शिकू लागतो, तेव्हा – धाता धिनता किटधा धिनता किटतक गदिगन धा हे बोल उमटविण्यासाठी फार परिश्रम घेत असतो. अगदी यांत्रिक कवायत असते ती. नुसते बोल उमटवूनच त्याचे भागत नाही. गवयाच्या गाण्यातली लय कशी आहे, काल कोठे येतो, सम कोठे यईल, इत्यादी अनेक अवधानांची नि भानगडींची गमके त्याला नीट अंगवळणी पाडून घ्यावी लागतात. याशिवाय मृदंग्याला चकविण्यासाठी – नव्हे, चुकविण्यासाठीच – गवईबुवा मधून मधून भलतीच हूल दाखवतात. तेढ्या वळणाने गातात. त्याचेही अवधान त्याला राखावे लागते. मोठे कटकटीचे नि कंटाळवाणे काम असते ते. पण कला साध्य करायची, तर स्वाध्यायाच्या या प्राथमिक कवायत – कर्मापासून सुटकाच नसते. सुरुवातीला ‘काला’ च्या ठिकाणी ‘सम’ आणि ‘समे’ च्या जागी ‘काल’ दाखवून फसला जातो. पण तोच मृदंगवादनाचा अभ्यास शास्त्रोक्त कसोटीने करून विद्यार्थी त्यात पटाईत होतो; मृदंगाचे शेकडो बोल तोंडाने बोलून मृदंगावर स्पष्ट उमटवू लागतो; लय, ठेका, काल, सम, तुकडे, गजरे इत्यादी सर्व प्रकार त्याच्या ‘हातचा मळ’ होतात आणि अनेक ‘सीधे तेढे’ गवयांची साथ करून ती कला त्याच्या मुरते नि तो त्या कलेशी तद्रूप होतो, तेव्हा त्याची अवस्था कशी असते ? प्रारंभाला बिकट वाटणारे आणि खरोखरच बिकट असणारे मृदंगवादन शास्त्र त्याला आता काहीच वाटत नाही. मृदंग्या नि मृदंगशास्त्र आता एकजीव झालेले असतात.

शास्त्री आणि शास्त्र यांची जी ही तादात्म्यता, तिलाच आपण जातिवंतपणा असे नाव देतो. पण त्याच्यामागे पद्धतशीर अभ्यासाची तपश्चर्या असते, शास्त्रीय सिद्धांताची बैठक असते, हे विसरता कामा नये. वक्तृत्व कलेचा पाया शुद्ध अभ्यास करणारा विद्यार्थी जसजसा या शास्त्रात प्रवीण होत जातो, तसतसे नियम, व्याख्या नि धडे यावरील त्याचे भान उडून जाते आणि व्यक्त करायच्या विकार, विचार नि उच्चार यांच्याशी तो एकतान, एकरूप होतो. शास्त्रीय बंधन जाऊन कलाविकासात तो आरपार रंगतो. असाध्य ते साध्य करिता सायास उपजत कवि आणि वक्ता, हा