वक्तृत्व – कला आणि साधना

१९१८ साली प्रबोधनकारांचं वक्तृत्वशास्त्र नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. या विषयवार भारतीय भाषांमधलं हे पहिलंच पुस्तक असावं. लोकमान्य टिळकांनीही या पुस्तकाची शिफारस केली होती. नंतर या पुस्तकात बदल करून प्रबोधनकारांनी वक्तृत्व कला आणि साधना हे पुस्तक प्रकाशित केलं.

 

वक्तृत्व माझ्या जीवनातला अतिशय आवडीचा विषय. या विषयावरचे माझे वक्तृत्वशास्त्र हे पुस्तक दि. १३ मे सन १८१८ रोजी अक्षय तृतीयेला प्रसिद्ध झाले. या पुस्तकाचा बॅ. जयकर, सौ. काशीबाई हेर्लेकर, भारताचार्य चिंतामणराव वैद्य, रायबहाद्दूर गुप्ते, प्रि. विष्णू मोरेश्वर महाजनी, रावसाहेब गोविंदराव कानिटकर, डॉ. कुर्तकोटी (शंकराचार्य), काळकर्ते अण्णासाहेब परांजपे वगैरे त्या काळच्या थोर पुढाऱ्यांनी फार मोठा गौरव केला. शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि कॉलेजातील वक्तृत्वसभांनी या पुस्तकाचा टेक्स्ट बूक म्हणून आस्थेने अभ्यास केला. सध्या ते पुस्तक दुर्मिळच आहे. प्रस्तुत वक्तृत्व – कला आणि साधना ही वक्तृत्वशास्त्राची ५२ वर्षांनंतर निघणारी दुसरी आवृत्ती म्हणण्यापेक्षा, वक्तृत्व विषयाच्या सांगोपांग चर्चेसाठी देशकालवर्तमानानुसार अगदी नव्यानेच केलेला दुसरा प्रयत्न, असे म्हणणेच वाजवी ठरेल. वक्तृत्वच्या क्षेत्रात मायक्रोफोन नि रेडिओ यंत्राचा प्रवेश झाल्यामुळे तर वक्तृत्वविषयक जुन्या नियमात आरपार बदल झाला. प्रस्तुतच्या पुस्तकात वक्तृत्वाची शैली कमावतानाच, शीलसंवर्धनाच्या आणि भाषाशैलीच्या केलेल्या अनेक सूचना उदयोन्मुख तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील असा मला विश्वास वाटतो.

या पुस्तकाची रचना करताना माझा ६० वर्षांचा ‘वक्ता’ या नात्याचा अनुभव नि तपश्चर्या मी ओतली आहे. प्रस्तुत पुस्तकाचा अखेरचा भाग पुरा करीत असतानाच एकाएकी माझी दृष्टी विलक्षण मंदावली आणि जवळजवळ मी आंधळाच झालो म्हणाना. त्यामुळे पुस्तकाच्या छपाईची मुद्रणे तपासणेही मला अशक्य झाले. अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी माझे शिष्य श्री. पंढरीनाथ सावंत यांनी ते काम नेकीने सफाईदार पार पाडले. अंधावस्थेचा अनुभव एक वर्ष घेतला. त्यातून माझी सुटका नेत्रशास्त्रनिपुण डॉ. श्रीधर विठ्ठल ओक यांनी नुकतीच केली. ठाकरे घरामे आणि डॉ. ओक यांचा ऋणानुबंध अत्यंत जिव्हाळ्याचा. माझ्या आयुष्यात मला आंधळ्याचा धडसा करण्याची डॉ. ओकांची ही तिसरी वेळ. त्यांच्याविषयी माझी कृतज्ञता अबोल झाली आहे. उभ्या हयातीत कमीत कमी ७० वर्षे मायबोलीच्या द्वारे तरुण मनाचे सार्वक्षेत्रीय प्रबोधन करण्यात वाणी-लेखणी झिजवली. थोड्याच महिन्यात मी आयुष्याच्या ८५ वा मैलाचा दगड ओलांडणार. (असे आज तरी वाटते. भविष्योत्तर कोणी अंदाजिले आहे ?) मऱ्हाठी जनतेची आजवर केलेली सेवा मी स्वतःच्या समाधानासाठी केली. कसल्याही शाबासकीसाठी नव्हे. एखाद्या आवडीच्या विषयावरील ग्रंथाची दुसरी आवृत्ती तब्बल ५२ वर्षांनी लेखकाच्या हयातीत प्रसिद्ध व्हावी, ही लहानसान समाधानाची गोष्ट खचित नव्हे. निर्णयसागर छापखान्याचे तरुण नि उत्साही व्यवस्थापक श्री. पांडुरंगराव मोरे यांनी आपुलकीने प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन हाती घेऊन कै. रामचंद्र येसू शेडगे यांच्या नि माझ्या जुन्या ऋणानुबंधांवर शिक्का मोर्तबच केले.

“मातोश्री” २५, कलानगर, वांन्द्रा पूर्व, मुंबई – ५१. एएस.

दिनांक १० मे सन १९७०

महाराष्ट्राचा विनम्र सेवक केशव सीताराम ठाकरे

विषयाची अनुक्रमणिका

विषय

1.वक्तृत्व-शास्त्र का कला ?

2.आवाजाचे आरोग्य आणि महत्त्व

3.आरोह अवरोहांचा विचार

4.विराम

5.कटाक्ष म्हणजे शब्दाघात

6.वाचन

7.पाठांतर

8.शब्दांचे सामर्थ्य

9.बालबोध शब्दयोजना

10. संभाषण – चातुर्य

11. मनोविकास

12. आत्मविश्वास आणि व्यक्तीमत्व

13.विकार – प्रदर्शन आणि अभिनय

14. मैदान मारून सभेचा फड जिंकावा लागतो

वक्तृत्व – शास्त्र का कला ?

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् भर्तृहरि, नीतिशतकम्. (बाहुभूषणांनी, चंद्रासारख्या तेजस्वी हारांनी, गंधादि लेपनाने, फुलांनी किंवा केशसंस्काराने पुरुषाला शोभा येत नसून, संस्कारयुक्त वाणीनेच तो शोभा पावतो. कारण, वरील सर्व भूषणे अल्पजीवी असून, वाणीचे भूषण मात्र चिरंजीव होय.) वक्तृत्व ही कला आहे का शास्त्र आहे ? कोणतीही कला घ्या, तिला आधी काहीतरी