संस्कृतीचा संग्राम: Page 10 of 22

हुल्लडीपेक्षा दुसरे विशेष आदरणीय ‘धार्मिक’ तत्त्व सापडणे कठीण आहे. इतकेच नव्हे तर दंग्यांत सामील झालेल्या शेकडो अविचारी उनाडटप्पूंना आपण दंग्यांत सामील का झालो याचे कारण ‘सब लोग बाहर निकले, मैं भी बाहर पडा’ याशिवाय अधिक देता आले नाही. आधीच मुसलमान समाज मनस्वी अशिक्षित, त्यात विकृत धर्मकल्पनेचा मनावर पगडा बसल्यामुळे, आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास या न्यायाने, त्यांच्या आंडदाडपणाला वारंवार उकळी फुटते, बरे, आजला मुसलमान समाजांत जे काही थोडे विद्यालंकृत विवेकी लोक स्पृहणीय कर्तबगारीने पुढे आले आहेत, त्यांचा आपला धर्मबांधवांवर असावा तितका वचक किंवा आदर नाही. अल्लीबंधूंसारखे जे कोणी विद्यासंपन्न व प्रतिभासंपन्न काही तुरळक विद्वान आहेत, ते आपल्या विवेकहीन धर्मवेड्या समाजबांधवांत व्यापक विचारांचा फैलाव करण्याऐवजी, स्वतःच शिंगे मोडून वासरांत घुसतात आणि स्वतःची समाजमान्यता कायम राखण्यासाठी कुराणप्रियतेचे थेर माजवितात. सारांश, ज्या उन्नत विचारांनी चिकित्सापूर्ण विवेकवादाचा आज सर्व जगभर फैलावा केला आहे व ज्यामुळे निरनिराळ्या धर्मपंथांतील सर्वसामान्य तत्त्वांचे एकीकरण करण्याची प्रवृत्ति आज उत्पन्न झालेली आहे, त्या विचारांचा लवलेशहि या विद्यालंकृत इस्लामी पंडितांना मानवू नये, यात अज्ञानापेक्षा काही तरी विशेष गूढ डावपेचांचे पाणी मुरत आहे, असे उघडच होते. प्रत्येक कृतीला धर्माची मान्यता शोधण्यात मौलवी लोक मोठे हुषार, धर्माज्ञा सापडली नाही की ते सत्यालाहि पाठमोरे व्हायला दिक्कत बाळगीत नाहीत. २० व्या शतकात एखादी गोष्ट मनाला पटली, पण त्याचा पुरस्कार करणारी धर्माज्ञा जर ७ व्या शतकातल्या कुराणात नसली, तर चांगले शहाणे-सुरते विद्वान मौलवी व पुढारी त्या गोष्टींचा धि:क्कार करण्यात महापुण्य समजतात. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या उन्नतीचा प्रश्न आज सर्वत्र प्रामुख्याने पुढे आला आहे. खुद्द हिंदुस्थानात काही विवेकसंपन्न मुसलमान भगिनी विद्यालंकृत होऊन देशसेवेसाठी पुढे आलेल्या आहेत. अल्लीबंधूंच्या पूज्य व वृद्ध मातोश्रींची देशाभिमानाची उत्कट तळमळ आज त्रिलोकविश्रुत झाली आहे. त्यांची लक्षावधि मुसलमानांपुढे उदात्त विचारांची अनेक व्याख्याने झाली. परंतु ७ व्या शतकाच्या साच्यात २० व्या शतकाची दुनिया कोंबण्यातच धर्मरहस्य पाहणा-या मौलवींनी नुकताच एक ‘फतवा’ जाहीर केला आहे की स्त्रियांची व्याख्याने ऐकू नयेत अशी महंमद पैगंबराची धर्माज्ञा आहे! अर्थात यापुढे धर्मशील अल्लीबंधूंच्या देशाभिमानी मातोश्रींची व्याख्याने बंदच पडली पाहिजेत, हे सांगणे नकोच. तेराशे वर्षांपूर्वी एखाद्या विशिष्ट धर्मप्रवर्तकाने प्रोक्त केलेल्या अनुशासनाची तेराशे वर्षांनंतर आजसुद्धा अक्षरशः अंमलबजावणी करण्याचा आग्रह म्हणजे गतानुगतिक जीर्णमतवादाचा कळस होय. क्षेत्र सामाजिक असो, राजकीय असो, किंवा कसलेंहि असो, त्याला धार्मिक स्वरूप देण्याची वहिवाट खुद्द महंमद पैगंबरानेच पाडलेली, मग मोपल्यांचे अत्याचार, मालेगांवचे खून, मुलतानचा निर्लज्ज धुमाकूळ किंवा गांधीच्या नॉन्कोऑपरेशनची खिलाफतशाही यांचा जो खेळखंडोबा मातला. त्यालाहि धर्माचा भरभक्कम पाय कां असू नये? मुसलमानांनी अशा प्रकारे सगळ्यात बाबतीत धर्माची फोडणी घालण्याचा परिपाठ ठेवला, म्हणून त्या फोडणीचे वर्म आता कोणास उमजत नाही, असे थोडेच आहे? असा हा धर्म जरी विश्वव्यापी विशाळ असला, तरी त्याचा प्रसार जुलूमजबरदस्तीच्या ‘सोज्वळ व सात्विक’ साधनांनीच अव्वल अखेर होत असल्यामुळे, त्या धर्माचे वारे अनुयायांच्या आंगच्या कातडीच्या आत घुसलेच नाही, तर त्यात कोणी चकित व्हायला नको. हिंदुस्थानातले ५ कोटी मुसलमान हिंदूंचे मुसलमान बनलेले आहेत, ही इतिहासप्रसिद्ध गोष्ट धर्माचे कितीही जरतारी पांघरूण घातले, तरी लपणे शक्य नाही. महाराष्ट्रांतल्या मुसलमानांची दिनचर्या पाहिली तर त्यांचा भाडोत्री किंवा बळजबरीचा धर्म अझून वरवरच तरंगत असलेला दिसतो. कातडीच्या आत तो घुसलाच नाही तर अंतःकरणात कसला भिनतो? त्यांचे हिंदू देवदेवताचे नवस अझून सुटत नाहीत. आंगावर देवी आल्या की शितळादेवीची प्रार्थना सुरू होते. गावच्या देवाचा आणि शिवेवरच्या म्हसोबाचा वर्षासनाचा वचक अझून आहे तसाच आहे. कित्येकांच्या घरचे पूर्वापार कुळस्वामींचे टाक अजूनहि भक्तिभावाने पुजले जात आहेत. साधारणतः पुरुषवर्ग धार्मिक बाबतीत सडक सीताराम तेव्हांच बनतो; पण स्त्रियांच्या मनावर बिंबलेले बरेवाईट धर्मसंस्कार निघणे फार कठीण असते. वेळी