संस्कृतीचा संग्राम: Page 9 of 22

प्रसंगावधानी पांघरूण घालावे, नाहींतर तत्त्वज्ञानाच्या पुण्याईवर किंवा शिल्लक असलेल्या मनगटाच्या जोरावर सर्व मुसलमानांना हिंदु करून घ्यावे; यापेक्षा तिसरा मार्ग नाही. हिंदुधर्माचा मूळचा मिशनरी बाणा आणि हिंदुसंस्कृतीचा सर्वसंग्रही याचकपणा आज जर कायम राहिला असता, तर हिंदु आणि मुसलमान या भेदाला इतके तीव्र स्वरूप खास आले नसते. आजचा मामला अर्थात् चमत्कारिक होऊन बसला आहे. इस्लामधर्म कट्टा सर्वसंग्रही आणि प्रचलित हिंदु धर्म ऊर्फ भिक्षुकशाही अधर्म कट्टा दुराग्रही, तुसडा, एकलकोंड्या आणि नामर्द. सर्वसंग्रही इस्लाम लोक मर्द, तर तुसडे अदूरदृष्टी हिंदु लोक नामर्द. कोठल्याहि क्षेत्रांतला कसलाहि विषय असो, राजकीय असो, सामाजिक असो, नैतिक असो, त्याला धार्मिक फतव्याच्या आणि खुतब्याच्या सबबीवर वाटेल तसे धोरणी वळण देणे मुसलमानांच्या हातचा मळ आहे. हिंदूंना इहलोकीच्या व्यवहारापेक्षां परलोकच्या झाडसारवणाची छातीफोड झुरणी लागलेली; त्यांना भिक्षुकशाही धर्माच्या क्षुद्र सोवळ्याओवळ्यापलीकडे, राजकारणाच्या किंवा समाजकारणाच्या क्षेत्रात नजर टाकण्याची अक्कलच उरलेली नाही! एकाची धर्माची कल्पना व्यवहारचतुर व विश्वव्यापी, तर दुस-याची व्यवहारशून्य व संकुचित; एक धिंगामस्तीच्या कामांत वाकबगार, तर दुसरा एक चपराक लगावली तर दुसरा गाल पुढें करणारा येशूचा अवतार. इहलोकींच स्वर्गसुख भोगण्याची मुसलमानांची प्रतिज्ञा, तर स्वर्गसुखासाठी परलोकी झटपट मरून जाण्याची हिंदू धर्माची भिक्षुकी आज्ञा. असे हे दक्षिणोत्तर प्रवृत्तीचे दोन समाज धार्मिक क्षेत्रातच परमोच्च तात्त्विक भावनेने समरस होणे कितपत शक्य आहे, याचा वाचकांनी विचारच करावा. सारांश, सध्यां ज्या फंद फिसाटांवर हिंदी मुसलमानबांधव, स्वतःच्या नसांत नित्य खेळणा-या रक्ताची ओळख विसरून, खिलाफतीसारख्या भाडोत्री धर्मकल्पनांनी स्वतःस हिंदू समाजापासून अलग मानण्याचा आत्मघात करीत आहेत, त्याचा योग्य विचार केल्यास, हिंदू समाजालाहि तुल्यबली बनल्याशिवाय हा कृत्रिम भेदाचा भयंकर भरकटलेला वाद ताळ्यावर येणे शक्य नाही. बाहेर दिसणा-या भेदाचे स्वरूप हेच काय ते खरे स्वरूप अशा कल्पनेची मनावर छाप बसू दिली, तर प्रस्तुत वादाची चिकत्सा नीट होणार नाही आणि त्याचे निराकरणहि करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला अंतरंगातच प्रवेश केला पाहिजे. अखिल हिंदुस्थानातल्या भिन्न भिन्न संस्कृतींच्या मुसलमान समजांना वगळून, आपण खुद्द महाराष्ट्रातल्याच मुसलमान बांधवांच्या सामाजिक, धार्मिक व सर्वसामान्य समजुतीचे परीक्षण केल्यास नामभेदाशिवाय व बाह्यांग-भेदाशिवाय हिंदुब्रुवात आणि मुसलमान ब्रुवात वास्तवीक कसलाच भेद दिसून येणार नाही. राजकीय सत्तेच्या बळाने पूर्वीच्या अस्सल हिंदूंवर झालेल्या इस्लामी जुलूमजबरदस्तीच्या धर्मांतरातूनच हिंदुस्थानातला अखिल मुसलमान समाज निर्माण झालेला आहे. जबरदस्ती किंवा लाचलुचपतीने धर्मांतर झाले म्हणजे माणसाची संस्कृती, प्रकृती, भावना किंवा हजारो वर्षे वंशपरंपरेने रक्तांतून उत्क्रांत किवा अपक्रांत होत आलेली ईश्वरविषयक बरीवाईट कल्पना तात्काळ समूळ नष्ट होत नाही. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमचा महाराष्ट्रांतला मुसलमान समाज. त्यांतील व्यक्तिमात्रांची नावे व पेहराव बदलले तर अस्सल हिंदूंत आणि त्यांच्यांत कसलाहि भेद दिसून येणार नाही. एवढा मोठा कडवा एकेश्वरी इस्लाम धर्म, पण आज दोन अडीच शतकांच्या अवधीत सुद्धा त्याला आमच्या या धर्मांतरित मुसलमान बांधवांच्या धार्मिक समजुतीत बाह्य सोंगाच्या बतावणीपेक्षा मुळीच काही फरक घडवून आणता आलेला नाही, ही गोष्ट विचार करण्यासारखीच आहे. धर्माच्या सबबीवर महाराष्ट्रांत काही तुरळक ठिकाणी जे हिंदू मुसलमानांचे दंगे अलीकडे झालेले आहेत, त्यांच्या चिथावणीची मूळ कारणे किंवा मुसलमानांनी वादार्थ पुढे केलेली कारणे, यांचे पृथःकरण केले, तर कोणत्याहि विवेकी व विचारी हिंदू मुसलमानाला असे प्रांजलपणे कबूल करावे लागेल, की ही कारणे प्राणघातक दंग्याशिवाय सुद्धा आपापसांत मिटविता येणे शक्य होते, हिंदूंच्या धर्माचा प्राण भजनी टाळात किंवा वाजंत्र्याच्या सनईत अडकलेला नाही, किंवा ‘न तस्य प्रतिमा अस्ति’ अशा निराकार, निर्गुण व स्थिरचरव्यापी अल्लाच्या प्रार्थनेचा व्याप विशिष्ट मशिदीच्या चार भितीत कोंबलेला नाही, हे तत्त्व प्रत्येक विचारवंत धार्मिकाला कबूल केल्याशिवाय सुटका नाही, गोवधाच्या बाबतीत, प्रत्यक्ष कुराणाचीच आज्ञा, हिंदूंच्या पौराणिक निषेधापेक्षा, मुसलमानांची कानउघडणी करण्याइतकी सर्वसमर्थ आहे खास. अर्थात आजपर्यंतच्या दंग्यांत ‘दंगा केलाच पाहिजे’ या माथेफिरू