संस्कृतीचा संग्राम: Page 8 of 22

करणे आता प्राप्त आहे. धर्म, सामाजिक जीवन, नैतिक विकास, राजकीय महत्वाकांक्षा आणि संस्कृति अशी अनेक क्षेत्रे आहेत. यांपैकी कोणत्या क्षेत्रात ही शेंडी-दाढीची गाठ बेमालून मारता येईल, हे पाहणे आहे. खरे पाहिले तर खटाशी भिडवावा खट, उद्धटाशी व्हावे उद्धट या समर्थोक्तीचाच अखेर अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे जरी स्पष्ट आहे, तरी निर्वाणीची ही वेळ येण्यापूर्वी त्वयार्धं मयार्धंच्या काही पाय-या ओलांडल्या तर दोनहि पक्षांच्या माणुसकीला ते विशेष शोभून दिसेल खास. अनेक क्षेत्रांपैकी राजकीय क्षेत्रांत हिंदु- मुसलमानांची एकी नसणेच शक्य नाही. दोघांचेहि बापजादे पूर्वी चक्रवर्ति असले, तरी आज दोनहि समाज ब्रिटीश सत्तेच्या गुलामगिरीच्या उकळत्या हंड्यात बटाट्याप्रमाणे शिजविले जात आहेत. तात्पुरत्या राजकारणी डावपेचांच्या सिद्धीसाठी काही विशिष्ट हक्कांच्या सवलतीची एखादी ओंजळ मुसलमानांच्या झोळीत पडली काय, किंवा हिंदूंच्या चौपदरीत पडली काय, सुपात असणा-यांनी हसायला नको व आधणांत पडलेल्यांनी रडायला नको, अशी वास्तविक स्थिति आहे. सुपातल्यांनाही अखेर आधणाचीच वाट धरावयाची असते, हे विसरतां येत नाही. विशेषतः मुसलमान समाज अंगमस्तीच्या कामांत कितीहि दांडगा असला तरी राजकारणी क्षेत्रात ज्या बुद्धिमत्तेची आवश्यकता विशेष, त्या बुद्धिसामर्थ्यासाठी तरी निदान त्यांना हिंदूंच्या गळ्याला मिठ्या मारणे भाग आहे. आतां, धार्मिकदृष्टया हिंदु-मुसलमानांची एकी होणे शक्य आहे काय? या प्रश्नाचा विचार करू. धर्माविषयी बोलतांना त्यातल्या गूढ उदात्त तत्त्वांकडे पाहा, त्यांतले मूलभूत तत्त्व एकच आहे, ‘राम रहिम सब एकहि है’ इत्यादि मुद्दे बरेच लोक एकीच्या मंडनार्थ पुढे आणतात. देव एक आहे, हा सिद्धांत सर्व धर्मपंथात सामान्यत्वे सारखाच मान्य आहे. परंतु तेवढ्यावरून त्या सर्वांची सर्वच बाबतीत एकवाक्यता अझूनपर्यंत तरी घडून आलेली नाही. याला अपवादच हुडकून काढावयाचे असतील तर ते तत्त्वज्ञानाच्या परमोच्च स्थितीला पोहचलेल्या हिंदु-मुसलमान संतांत मात्र आढळतात; इतरत्र नाही. पण तत्त्वज्ञानाच्या या परमोच्च वातावरणात हिंदु हा मुसलमान बनत नसून, मुसलमान मात्र अंतर्बाह्य पक्का हिंदु बनत असतो, हे अवश्य लक्षात घेतले पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या धर्मकल्पना अगदीच अस्पष्ट व भ्रष्ट असतात. शिवाय, विशिष्ट धर्मपंथानुकरण त्या त्या धर्मातल्या मूलभूत तत्त्वप्रत्ययापेक्षा, ऐहिक लाभांची आशा, काही तरी सुटसुटीत सवलती, किंवा शुद्ध बळजबरी यावरच आजपर्यंत घडून आलेले आहे. ज्या इस्लाम धर्माचा प्रसारच मुळी रक्तबंबाळ नागव्या तलवारीच्या जोरावर खुद्द धर्मोत्पादक महंमदानेच करण्याचा पाया घातला, त्या धर्माची तात्विकदृष्टया हिंदुधर्माशी एकवाक्यता घालण्याचा यत्न करणे म्हणजे विळ्या भोपळ्याचे गाठोडे बांधण्यासारखेच आहे. तत्त्वज्ञानापेक्षा तलवारीच्या जोरावरच ज्या धर्माचा मिशनरी बाणा सर्व हिंदुस्थानभर बेसुमार बोकाळला; त्या धर्माच्या आसुरी स्वरूपावर तात्विक एकवाक्यतेचा सफेदा कितीहि चोपडला तरी व्यर्थ होणार यात संशय नाही. नुसत्या तत्त्वज्ञानावरच जर महंमदाने भिस्त ठेवली असती, तर त्याला हिंदुधर्माने आमूलाग्र गिळून पचनी पाडले असते. बौद्ध धर्माच्या –हासानंतर हिंदु धर्मीयांनी आपला जन्मजात मिशनरी बाणा टाकल्यामुळे, त्यांना इस्लाम व क्रिस्ती धर्मपंथांपुढे बाह्यतः जरी हतवीर्य व्हावे लाभले, तरी त्यांच्या सर्वस्पर्थी तत्त्वज्ञानाने, नकळतच का होईना, अखेर या दोनही प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याशिवाय सोडली नाही. असे झाले नसते तर आज पृथ्वीच्या पाठीवर एकहि हिंदु शिल्लक राहिला नसता. हिंदूंच्या टिकावाचे मर्म येथेच आहे. मात्र ते मर्म आता अत्यंत जीर्ण व हतबल स्थितीला येऊन पोहोचले आहे. तत्त्वज्ञान कितीहि मिशनरी स्पिरिटचे असले, तरी अनुयायांमध्ये जर त्या स्पिरिटचा लवलेश नसेल, तर त्या तत्त्वज्ञानाचे आयुष्य संपलेच म्हणून समजावे. हिंदूंनी आपल्या तत्त्वज्ञानाच्या मिशनरी स्पिरिटवर निष्क्रिय विश्वास टाकून, व्यवहारदाक्षिण्याला भडाग्नि दिल्यामुळेंच त्यांचा राष्ट्रीय अधःपात झाला आणि आता तर त्या सुप्रसिद्ध मिशनरी स्पिरिटचाहि खडखडाट उडाल्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचीहि जबरदस्त शंका उत्पन्न झाली आहे. अशा अवस्थेत जुलूमजबरदस्तीची ख्याति असलेला मिशनरी इस्लाम धर्म आणि बेअक्कल भिक्षुकशाहीने लेचापेचा केलेला शेंदाड हिंदु धर्म, यांच्या एकीचा स्पष्ट दिसणारा मार्ग म्हटला म्हणजे एकजात सर्व हिंदूंनी मुसलमानी धर्माचा स्वीकार करून आपल्या नामर्दाइवर चतुरस्रतेचे