संस्कृतीचा संग्राम: Page 7 of 22

जबाबदार मुसलमानांचा ‘निषेध’ म्हणजे बाटलेल्या हिंदूंचा ‘धर्मपरिवर्तन विधि’ नव्हे खास. मोपल्यांच्या धार्मिक अत्याचारांवर मलमपट्टी लावणारे डॉ. मुंजे यांना म. गांधींचे कल्याणशिष्य शौकत अल्ली यांनी दिलेले सणसणीत उत्तर विचार करण्यासारखे आहे. अल्लीसाहेब आपल्या मुलाखतीत म्हणाले, ‘मोपल्यांच्या अत्याचारांबद्दल मी शक्य तितक्या तीव्रतेने निषेध करीन. परंतु बाटलेले हिंदु परत हिंदु धर्मात घेण्याच्या खटपटीला माझ्याकडून कसलीहि मदत मिळणे शक्य नाही, तशी आम्हाला धर्माज्ञाच नाही, याबद्दल फार दिलगिरी वाटते.’ ‘अल्ला हो अकबर’च्या आरोळ्या किंचाळणारी लहान पोरे गल्लोगल्ली फिरविणा-या शहाण्या देशभक्तांच्या डोक्यात या कानपिचकीचा काहीच उजेड पडू नये, हे कशाचे लक्षण? (३) मोपल्यांना खिलाफतीची अस्पष्ट माहिती झाली होती, पण अनत्याचाराच्या तत्त्वांचा त्यांना गंधहि नव्हता. खिलाफत व काँग्रेसच्या कामगारांना मलबारांत जाण्याचा सरकारकडून प्रतिबंध झाला नसता, तर या बंडाचा अंकूर गर्भातल्या गर्भात ठेचला गेला असता. आतां पुढे येत असलेल्या पुराव्यांवरून (अ) खिलाफतवाल्यांची चिडखोर व माथी भडकवणारी शिकवणूक व (ब) ब्रिटीश राज्य आतां भुसभुशीत झालें आहे, त्याच्या जागी खिलाफतराज्य आणून स्थापन करावयाचे आहे, अशा गप्पा मलबाराबाहेरच्या इस्लामी चळवळ्यांनी मलबारांत जाऊन मोपल्यांच्या डोक्यांत भिनविल्या, अशी दोन मुख्य कारणे मोपले बंडाला कारण झाल्याचे सिद्ध होत आहे. त्यावरून म. गांधींच्या विधानांना काय किंमत द्यावयाची ती वाचकांनीच ठरविलेले बरे. (४) मोपल्यांच्या माथेफिरूपणा म्हणजे हिंदु मुसलमानांच्या एकीचा भक्कमपणा असेच मला वाटते, कारण एवढे बंड झाले तरी आम्ही (हिंदु) अगदी शांत बसलो. नामर्दपणावर पसरलेली इतकी छानदार विणीची खादी इतरत्र पहावयास मिळणार नाही. (५) जबरदस्तीचे धर्मांतर किंवा त्याहिपेक्षां वाईट गोष्टी यापेक्षा सध्याचे (इंग्रजी सत्तेचे) जूं अधिक वाईट नव्हे काय? विचारी वाचकांनीच उत्तर द्यावे. (६) ४ ऑगस्ट १९२० च्या यंग इंडियांत गांधी म्हणतात, ‘इस्लाम हा मोठ्ठा उदार धर्म आहे. त्यावर आणि त्याच्या अनुयायांवर विश्वास ठेवा. जोपर्यंत खिलाफतीचा तंटा चालला आहे, तोपर्यंत गोरक्षण किंवा इतर धार्मिक प्रश्नांत मुसलमानांशी आपण नुसते बोलणे लावणे, हे सुद्धां महापातक आहे.... आपण जर खिलाफत वाचविण्याचा झटून प्रयत्न केला तर मुसलमानहि गोरक्षणास मदत करतील, असी मी ग्वाही देतो.’ असल्या पोकळ विचारसरणीने हिंदु मुसलमानांत ऐक्य घडून येणे शक्य नाही, हे आता खुद्द गांधीभक्तांच्याहि अनुभवास आले आहे. मग गांधींना एखाद्याने ‘मॅडमुल्ला’ म्हटले तर त्यांनी का खवळावे? यंग इंडियात म. गांधींनी हिंदु- मुसलमान ऐक्यावर जेवढे लेख लिहिले आहेत, त्या सर्वांचा मासला वरील धर्तीचाच आहे. अशा लेच्यापेच्या विचारसरणीच्या मुळांशी कितीहि उच्च कळकळीचा सात्विक हेतू असला, तरी तिचा परिणाम विचारावर मुळीच न होता तात्पुरत्या लोकप्रसिद्धीच्या हळदीसाठी धाधावलेल्या अल्लड तरुणांच्या विकारांवर मात्र होतो; आणि तो तसा झालाहि. प्रस्तुतचे द्वैत केवळ शब्दलालित्याच्या किंवा शांतिरस्तु, पुष्टीरस्तु आशीर्वादाच्या बळावर शमणारे नव्हे, ही जाणीव म. गांधींना होऊ नये हे आश्चर्य आहे. पण आश्चर्य तरी कसले? सत्वगुणी माणसाने या फंदात आधी पडूच नये. ते त्याचे कामच नव्हे. या त्रिगुणात्मक सृष्टीत सत्व, रज किंवा तम यांपैकी कोणत्याहि एकेका गुणाचा उच्च परिपोष अखेर अपजयीच होत असतो. त्रिगुणांचा समतोल समनव्य झालेल्या सत्तेला किंवा व्यक्तीलाच ही तिरंगी नाठाळ दुनिया वठणीवर आणून आपल्या काबूंत ठेवता येते. रेड्याला आणि वाघाला एकाच बालदीतले पाणी एकत्र प्यावयास भाग पाडणा-या सर्कसवाल्याला सुद्धा तात्पुरत्या या त्रिगुण समन्वयाची हुबेहूब नक्कल करावी लागते. अभेदाचा भेद होऊ नये, पण झाला. हिंदूंचे मुसलमान होऊन, धर्म-भेदाच्या विरळ भेदाने एकाच रक्तमांसाच्या भावंडांत द्वैत उत्पन्न होऊ नये, पण झाले. त्याला कारणे काहीहि असोत, [ती मूळ ग्रंथांत दिलेली आहेत] त्यांची शाब्दिक मीमांसा द्वैत निर्मूलनास फारशी उपयोगी पडणार नाहीत. हिंदु आणि मुसलमान हा भेद नाहीसा झाला पाहिजे, एवढा हेतू ठाम ठरल्यावर, तो कसा साध्य करता येईल? सगळ्यात क्षेत्रांत शक्य नसेल, तर कोणत्या? याचे निर्दय निःस्पृहतेने विवेचन