संस्कृतीचा संग्राम: Page 6 of 22

नवचैतन्याचा विलक्षण संचार होऊन तिने मुस्लीम लीगचा सवता सुभा आमूलाग्र पचनी पाडला आणि स्वराज्यप्राप्तीच्या कार्यक्रमात अस्पृश्योद्धाराच्या जोडीनेच, मुसलमान बांधवांच्या ऐक्याला विशेष प्राधान्य देण्यांत आले. खुद्द महात्मा गांधींनींच हा प्रश्न हाती घेतल्यामुळे, त्यांत काही थातरमातर किंवा हस्तिदंती कावेबाजपणा घुसणे शक्यच नाही, अशी सर्व राष्ट्राची तेव्हाच खात्री पटली. हिंदु मुसलमानांच्या दिलजमाईचे अनेक अकल्पनीय प्रकार आतांपर्यंत घडून आले, येत आहेत व पुढे येतील. तथापि या दिलजमाईची धडपड सुरू असतानाच, जणुं काय तिचा आरपार फोलपणा सिद्ध करण्यासाठी मलबारांत मोपले मुसलमानांची बंडाची भयंकर गडबड उडाली. मोपल्यांच्या बंडाने व परवांच्या मुलतानच्या दंग्याने हिंदु मुसलमानांच्या दिलमजाईचा प्रश्न इतका बिकट होऊन बसला आहे की तो सोडविण्यासाठी महात्मा गांधींची सत्याग्रही पुण्याई सुद्धा अंतःपर हतबल ठरून पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही, मग इतरांची कथा काय? विशिष्ट राजकीय हेतू साधण्यासाठी किंवा महात्माजींच्या उत्कट तपस्सामर्थ्याने उडालेली गाळण छपविण्यासाठी, एखादा शहाणा ‘राष्ट्रीय’ या प्रश्नाची शाब्दिक कसरतीने टोलवाटोलव करू म्हणेल तर ते दिवस आता उरलेले नाहीत. हिंदु मुसलमानांची एकी झालीच पाहिजे, त्याशिवाय स्वराज्य प्राप्त होणार नाही व यदाकदाचित झालेच तर ते टिकणारहि नाही; हा महत्मा गांधींचा सिद्धांत बाह्यतः कितीहि खरा असला, तरी ती एकी कशी घडवून आणतां येईल याचे स्पष्टीकरण किंवा बिनचूक निदान मात्र त्यांना मुळीच करतां आले नाही. हिंदुंनी मशिदीत जाणे आणि मुसलमानांनी देवळांच्या आवारात किंवा गरुडमंडपांत येऊन व्याख्याने देणे, इत्यादि प्रकार बाह्यांगाचे आहेत व ते नेहमी टिकाऊच रहातील असा भरंवसा कोणी देऊंहि शकणार नाही. म. गांधींनी हिंदु मुसलमानांच्या ऐक्याविषयी ज्या खटपटी केल्या व आपल्या ‘यंग इंडिया’ पत्राद्वारे जे विचार व्यक्त केले, त्यांचे आज जो कोणी काळजीपूर्वक पर्यालोचन करील, त्याला हेच कबूल करावे लागेल की गांधी हे कितीहि महात्मा असले तरी प्रस्तुत वादात पौराणिक बडबडी पलीकडे त्यांच्या महात्म्याची फारशी मजल गेलीच नाही. हाच सिद्धांत किंचित निराळ्या भाषेत मांडावयाचा तर तो असा मांडता येईल की म. गांधीच्या सत्वगुणप्रधान पुराणांचा आसुरी मायेने चिंब भिजून निघालेल्या त्यांच्या मुसलमान शागीर्दांवर कांहीच परिणाम झाला नाही. इतकेच नव्हे, तर हिंदूंच्या विवेकबुद्धीला पटतील अशा काहीहि सूचना त्यांना केव्हांहि करता आल्या नाहीत. त्यांच्या ‘यंग इंडिया’च्या पुराणांवर भाळून जाऊन बेताल नाचणारे हिंदू वेताळ त्यावेळी जरी मुबलक बोकाळले होते, तरी ती पुराणे किती फोल होती व ते सिद्धांत किती लेचेपेच होते, याचा पुरावा मोपल्यांच्या दुष्ट बंडाने जेव्हांच्या तेव्हाच दिला.

विशेषतः मोपल्यांच्या बंडाचा भयंकर धुमाकूळ माजल्याच्या बातम्यांनी सारे हिंदुस्थान दणदणू लागल्यावर सुद्धा, त्यांचा फोलपणा व मोपल्यांचा ‘मर्दपणा’ सिद्ध करण्यासाठी गांधींनी दाखविलेल्या कानाडोळ्याचा उदासपणा व असहकारितावाद्यांनी बंडाच्या ख-या हकिकती खोट्या ठरविण्यासाठी केलेल्या धडपडी कोणाच्याहि स्मरणातून जाणे शक्य नाही. मोपल्यांच्या अमानुष अत्याचारांचे भरभक्कम पुरावे भराभर सर्वत्र प्रसिद्ध होताच, नाइलाज म्हणून तारीख २८ जुलै १९२१ च्या यंग इंडियात म. गांधींनी जे प्रवचन झोडले आहे, त्यातली विधाने कोणाला कधि काळी पटतील ती पटोत! त्यात वस्तिस्थितीचे जितके अज्ञान भरले आहे, तितकाच हिंदूंचा तेजोभंग आहे. जितका मनाचा नामर्दपणा आहे, तितकाच विचारसरणीचा कमकुवतपणा आहे. म. गांधी म्हणतात – (१) जर इस्लामचा पाया जुलूम जबरदस्तीवर असेल तर आमचा खिलाफतीचा पुरस्कार चुकीचा होईल. इस्लाम धर्मप्रसाराचा इतिहास मानवी रक्तांत बुचकळलेल्या तलवारीच्या लेखणीनेच आजपर्यंत लिहिला गेलेला आहे, हे महात्मा गांधींना मुळीच अवगत नसेल काय? जबरदस्तीने मुसलमान धर्माची दीक्षा देण्याचे फर्मान कुराणांत असो वा नसो; इतिहासाचा पुरावा डोळ्याआड करणे, याला दांभिकपणा असे म्हणतात. (२) बळजबरीने इस्लामधर्मदीक्षा देण्याच्या पातकाबद्दल, ऐतिहासिक दृष्टया सर्रास सर्व मुसलमान समाजाला दोषी ठरविता येणार नाही. अशा कृत्याचा जबाबदार (?) मुसलमालांनी निषेधच केलेला आहे. म. गांधींचे ऐतिहासिक ज्ञान केवढे आहे, त्याचा वाद घालीत बसण्यांत अर्थ नाही. परंतु