संस्कृतीचा संग्राम: Page 5 of 22

हिंदु मुसलमान पात्रे प्रत्यक्ष नाचवून, आपल्या केसरी प्रासादिक देशभक्तीचा शिमगा वृत्तपत्री धुळवड शेणवडीपेक्षा रेसभरसुद्धा कमी इरसाल नसल्याचे सिद्ध केले. या फाजील मेळ्याचा फाजीलपणा अजूनहि कमी झाला नसून, मुसलमानांवर भुंकण्यास सवकलेले हे ‘राष्ट्रीय’ कुतरडे कै. नामदार गोखले प्रभृति उदारमतवादी स्वकीयांचे लचके तोडता तोडता, आता तर कुलीन स्त्रियांची इज्जत जाहीर रीतीने घेत असते. सारांश, टिळकांच्या प्रोत्साहनाने भरवंसाट भडकणा-या तत्कालीन राजकारणी वातावरणाचे निःपक्षपणे समालोचन केले तर असे स्पष्ट विधान करणे भाग पडले की त्या वेळच्या महाराष्ट्रीय हिंदूंच्या राजकीय मोक्षप्राप्तीच्या कल्पनांचे भांडवल मुसलमानांच्या बीभत्स निर्भत्सनेतूनच काढले जात असे. याचा परिणाम फार वाईट झाला आणि त्याची कडुजहर फळे महाराष्ट्राला अझून भोगावयाची आहेत. महाराष्ट्रातले मुसलमान न हिंदुर्नयवनः असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यात व हिंदूंत कसलाहि भेद नाही. त्यांची राहणी, आचारविचार, उदरभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वी हिंदुंप्रमाणेच एकजिनशी आहेत. कारण ते जात्या मुळचे हिंदूच. पूर्वजांवर झालेल्या धर्मांतराच्या बळजबरीमुळेच ते आमच्याच रक्तमासाचे आप्तसंबंधी असूनसुद्धा आज निव्वळ नावाला आमच्यापासून पारखे झाल्यासारखे दिसतात इतकेच. अशा रीतीने धर्माचरणाच्या बळजबरीच्या बाबीशिवाय इतर सर्व व्यवहारांत महाराष्ट्रातले मुसलमानभाई हिंदूंशी एकजीव असता, टिळकांच्या गणपति- मेळ्यांनी व शिवाजी उत्सवांनी त्यांची मने हकनाहक दुखावली गेली. आणि नाईलाज म्हणून ते फटकून वागू लागले, तर त्यांत दोष कोणाचा? कै. टिळक लोकसंग्रहाचे अर्वाचीन प्रणेते असे त्यांचे भक्तजन कंठरवाने वेळी अवेळी प्रतिपादन करीत असतात. पण त्यांच्या लोकसंग्रहाला मुसलमानांचा मात्र कधीहि विटाळ झाला नाही. मुसलमान हे लोकच नाहीत की काय? आणि ज्या राष्ट्रोद्धारासाठी टिळकानीं आपला राष्ट्रीय संप्रदाय निर्माण केला, त्याला या लोकांच्या संग्रहाची आवश्यकता नाहीच की काय? मुसलमानांत जातिभेद नसला, तरी प्रांतपरत्वे उच्च नीच संस्कृतीची भिन्नता पुष्कळच आहे. सगळ्या ठिकाणचे सगळेच मुसलमान एकजात शौकतअल्ली टैपाचे किंवा मोपले सांच्याचे नाहीत.

महाराष्ट्रात तर सर्रास शुद्ध हिंदु मुशीचा मुसलमानच आढळून येतो. संस्कृतिसाम्याचा फायदा घेऊन व्यापक मिशनरी धोरणाने येथल्या मुसलमानांना कै. टिळकांनी जर आपल्याकडे ओढण्याची खटपट केली असती, तर आज निदान महाराष्ट्रापुरता तरी हा प्रश्न पुष्कळच सुटला असता खास. पण ज्यांचे सर्व राजकारणच मुळी जातिभेदाच्या आणि स्वजातिवर्चस्वाच्या मसाल्याचे, तेथे मुसलमानाला पुसतो कोण? खरे पाहिले तर बंगालच्या फाळणीची चळवळ निर्माण होईपर्यंत महाराष्ट्रीय हिंदूची राजकीय दृष्टी अत्यंत संकुचित आणि एकलकोंडेपणाचीच होती. कै. टिळकांच्या केसरी संप्रदयाची स्वराज्याची दृष्टी सुद्धा गायकवाड वाड्याच्या कुंपणापलीकडे फारशी जात नसे. राष्ट्रीय सभेच्या वार्षिक लळितात देवपार्टी व राक्षसपार्टी एक दोन दिवस काही तरी अललल डुर्रर्र करून राष्ट्रैक्याची पुराणे झोडीत; परंतु नेहमी पुराणांतली वांगी पुराणांत ठेवण्यापलीकडे त्यांचाहि काही इलाज नसे. बंगालच्या चळवळीच्या दणक्याने महाराष्ट्रीय हिंदूंची राजकीय स्वार्थाची दृष्टी उदारपणाकडे जरी बरीच कलंडली, तरी हिंदु मुसलमानांच्या ऐक्याच्या बाबतीत त्यांचा सुतकी बाणा टिळकांच्या हयातीपर्यंत तरी निदान फारसा कमी झाला नाही. नुसता शाब्दिक चोंबडेपणा मात्र रगड होता खरा! ज्या राष्ट्र्यैक्याच्या विकासासाठी आजची कार्यक्षम राष्ट्रीय सभा कसोशीने झटत आहे, त्याचा पाया जे प्रांतिक ऐक्य, त्याचीहि पर्वा आमच्या हृदयाला फारशी स्पर्श करीत नसे. हिंदुस्थानच्या राजकीय क्षेत्रांत कल्पनातीत चापल्याने भराभर पालटणा-या राजकारणी उलथापालथीचे चित्रपट पाहून सुद्धा मुसलमानांच्या मनधरणीचा किंवा एकीकरणाचा प्रश्न आम्हांला फारसा बोचतच नसे, मात्र राजकीय अधःपाताची जाणीव होऊन, मुसलमान संघ कावेबाज नोकरशाहीच्या बगलेत घुसण्याचा यत्न करीत असतां, महाराष्ट्रश्र्वुरीण केसरीने त्याची ‘प्यारी रंडी’ संज्ञेने मनमुराद निंदा करायला मात्र मुळीच कमी केले नाही. सारांश, हिंदुस्थानच्या राष्ट्रीय उद्धारांत हिंदूंना मुसलमानांच्याहि एकीची आवश्यकता आहे, ही गोष्ट राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय होईपर्यंत कोणीच लक्षात घेतल्याचे दिसत नाही.

हिंदुस्थानच्या सुदैवाने सत्याग्रही महात्मा गांधींचा उदय होऊन, त्यांच्या तपःसामर्थ्याच्या दिव्य तेजाने सर्वत्र अननुमूत प्रबोधनाची दांडगी खळबळ उडाली आणि दुटप्पी टिळक संप्रदायाचा अस्त झाला. वार्षिक हरदासी कीर्तने करणा-या राष्ट्रीय सभेत