संस्कृतीचा संग्राम: Page 22 of 22

राजकीय पुनर्घटनेच्या कार्यात मुसलमानांना हिंदूंशी सहकार्य करण्यापुरती एकीची भावना नसेल, तर त्या आत्मघातकी भावनेंत शुद्ध अरेरावीपेक्षा दुसरे काही नाही असेच म्हटले पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात स्वामी श्रद्धानंद यांनी पतीतपरावर्तनाची दांडगी चळवळ सुरू केल्यामुळे, हा धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न विशेष पुढे आला आहे. इस्लामधर्म हा मिशनरी धर्म आहे, हे प्रसिद्धच आहे. परंतु हिंदु धर्म हा मिशनरी धर्म नाही, किंवा पूर्वी तसा नव्हता, असे या शुद्धीकार्याच्या आक्षेपकांना कोणी सांगितले? हिंदुधर्म हा मिशनरी धर्म नव्हता, असेहि गृहित धरले तरी धर्मस्वातंत्र्याच्या दृष्टीने त्याला मिशनरी धर्म बनविण्याला कोणाची म्हणून का हरकत असावी? खरे पाहिले तर बळजबरीच्या बाटवाबाटवीमुळे आणि भिक्षुकशाहीच्या मयत धर्ममार्तंडाच्या मूर्खपणामुळे धड ना मुसलमान धड ना हिंदु अशा संस्कृतीच्या संग्रामात पडलेल्या न हिंदुनर्यवनांना त्यांच्या प्रेमाच्या हिंदु धर्मात स्वामी श्रद्धानंद घेत आहेत, यामुळे अस्सल मुसलमानांच्या अस्सल धार्मिक भावना कां व कशा दुखविल्या जातात हे एक खिलाफतीच्या कोड्याइतकेच कोडे आहे. परंतु या कोड्याला आपल्या रड्या ओरड्याची साथ देण्यासाठी काही गांधीभक्त हिंदू पुढे यावेत, ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. गांधींनी हिंदुमुसलमान एकीच्या पिटलेल्या डांगो-यांच्या तपशीलाचा विचार केला, तर गांधीभक्तांचे किंचाळणे गैरवाजवी नाही; आणि महात्मा दयानंद सरस्वति यांच्या पतितपरावर्तनविषयक महत्त्वाकांक्षेचा विचार केल्यास त्यांचे सच्चे शागीर्द स्वामी श्रद्धानंद हिंदुशुद्धीसभेच्या विद्यमाने मोठ्या वर्णनीय धडाडीने करीत असलेली कामगिरी मुळीच गैरशिस्त नाही असे प्रत्येक विवेकी हिंदुमुसलमानांला कबूल करणे प्राप्त आहे. स्वामी श्रद्धानंद धार्मिक क्षेत्रापुरता संस्कृतीचा संग्राम हिंदुस्थानांतून नष्ट करण्याचा चिरस्मरणीय प्रयत्न करीत आहेत. आत्म्याच्या आवडीचा विषय ते आत्म्याला देत आहेत. भाडोत्री धर्मबंधनांनी गुदमरलेल्या संस्कृतीची मान ते मोकळी करीत आहेत. आणि स्वामी दयानंदाचे अपूर्णकार्य अत्यंत निःस्वार्थबुद्धीने पुढे चालवून या प्राचीन आर्यजननीच्या आर्यसंस्कृतीची अब्रू ते संरक्षण करीत आहेत. श्रीकृष्ण भगवंताचा हा हिंदु लोकसंग्रह यशस्वी होवो!