संस्कृतीचा संग्राम: Page 3 of 22

व्यवसायच उरला नाही .त्यांच्या मनाच्या जात्यातले दळण कमी झाले, आणि ते स्वतःलाच भरडण्याच्या एकेरीवर आले. अशा स्थितीत दोघांहि समाजांना सामाजिक आणि धार्मिक बाबतीची वाळू भरडण्यास सापडली. वाळूच्या या दळणांत मतभेदांचे गारगोटीचे काही कणखर फत्तर लागताच, त्यांच्या स्फोटाची पहिली सलामी १८९३ साली काठेवाडांत प्रभासपट्टम शहरी हिंदु मुसलमानांच्या दंग्याने दिली.

स्फोट होऊन ठिणगी पडण्याचाच काय तो अवकाश असतो. ती एकदा पडली की गवताची गंज किंवा एखादा वाडाचसा काय, सा-या विश्वाचे क्षणार्धात होळकुकडे करणे तिच्या हातचा केवळ मळ होय! प्रभासपट्टणची ठिणगी धुमसता धुमसता अखेर तारीख ११ ऑगस्ट सन १८९३ शुक्रवार रोजी मुंबईच्या जुम्मा मशिदीत आगीचा भयंकर स्फोट उडाला आणि सतत एक पंधरवडा चाललेल्या त्या हिंदु मुसलमानांच्या दंग्याने सारे हिंदुस्थान गदगदा हादरले होते. मुंबापुरी रक्तांत न्हाऊन निघाली. रस्तोरस्ती हिंदु मुसलमानांची प्रेते पडली. बेसुमार अत्याचार झाले. कित्येक देवळे व मशिदी उध्वस्त झाल्या. हिंदु स्त्रियांवर बलात्कार झाले. शहरात शांतता राखता राखता मुंबई सरकारच्या लष्करी आणि आरमारी सैन्याच्या नाकी नळ वाहू लागले. अखेर २५ ऑगस्ट १८९३ रोजी दंगेखोर लोक काबूत येऊन, शहरांत शांततेची चिन्हे दिसू लागली. हिंदु मुसलमानांत भयंकर रक्तपात, अतोनात प्राणहानी आणि मनस्वी अत्याचार घडविणा-या या कुप्रसिद्ध मुंबईच्या दंग्याने हिंदु आणि मुसलमान लढ्याचा प्रश्न अलीकडच्या काळांत विशेष महत्त्वाने पुढे आणला. अभेदातच भेद उत्पन्न झाला. भेदात विपर्यासाची कीड पडली. रिकाम्या मनात या किडीने पोखरण घातली. पोखरणीत नसत्या द्वैताचा विषबिंदु पडला. विषाने रक्त दूषित झाले आणि आपपर भेद विसरून हिंदु आणि मुसलमान या नकली बाह्यांगावरच झगडण्याची राष्ट्रविघातक कुबुद्धि सैतानी खेळ खेळू लागला. रिकाम्या मनाचा दुष्परिणाम, दुसरे काय? सतत तीन शतके राजकीय वर्चस्वासाठी प्रामाणिक चुरशीने एकमेकांशी झगडणारी हिंदु मुसलमानांची मनोवृत्ति, राजकारणाचा आटारेटा किंचित हातावेगळा होताच, सामाजिक व धार्मिक स्वरूपाच्या क्षुद्र भेदात रममाण होऊन वर्दळीवर यावी, आणि गेल्या महायुद्धाने निर्माण झालेल्या नवचैतन्याच्या प्रसादाला पात्र होणा-या हिंदी राष्ट्राच्या आकांक्षेच्या मार्गात त्य भेदाची पर्वतप्राय धोंड पडावी, हे खरोखर देशाचे दुर्दैव होय. मुंबईच्या दंग्यामुळे हिंदू आणि मुसलमानातील तेढ किती विकोपास गेलेली होती, हे अलीकडच्या काळात जगाला प्रथमच दिसले. या तेढीच्या तपशीलाचे पृथःकरण केले तर स्वराज्यसत्ता गमावून एका त्रयस्थ वरचढ सत्तेचे गुलाम बनलेल्या गुलामाच्या मनोवृत्तीला साजेशोभेसाच त्याचा मसाला होता. स्वराज्य-स्वातंत्र्याच्या बाळ्याबुगड्या गमावून, वाडवडिलांच्या गतवैभवाच्या सुक्या ओल्या गप्पांची भोके कुरवाळीत बसणा-या गुलाम हिंदु मुसलमानांच्या सडक्या मनोवृत्तीचा तो यथाप्रमाण धांगडधिंगा होता. त्या वेळच्या शहाण्यासुरत्या वर्तमानपत्रकर्त्यांचे उद्गार पाहिले, तर असे स्पष्ट दिसून येते की हिंदु आपल्या मुत्सद्देगिरीच्या गुर्मीत होते आणि मुसलमान आपल्या आडदांडपणाच्या मिजासीत होते. बळी तो कान पिळी हा सनातन कायदा मुसलमानांनी हाती घेतला होता आणि नेभळे हिंदु इंग्रेज अधिका-यांवर पक्षपाताचा आरोप करून, बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना गतेतिहासाचे दाखले दाखवून, सुक्या शाब्दिक धमक्या देत होते. त्या वेळी कै. टिळकांनी प्रस्तुत दंग्यांची चिकित्सा करणारे केसरीत लिहिलेले लेख पाहिले तरी त्यात हीच संकुचित वृत्ति व्यक्त झालेली आढळते. हिंदु मुसलमान प्रश्नाकडे ख-या राष्ट्रीय दृष्टीने पहाण्याची जी व्यापक वृत्ति आज प्रचलीत झाली आहे, तिचा लवलेशहि टिळकांच्या अंतःकरणाला शिवलेला नव्हता. उठल्या सुटल्या भल्याबु-या पातकाचे खापर इंग्रेजांच्या माथ्यावर फोडून, आपल्या नेभळ्या तोंडपाटिलकीचे मंडण करण्याचा कैसरीने महाराष्ट्रात रूढ केलेल्या परिपाठाचा उगम याच लेखांत पाहावा.

या दोन समाजांच्या एकीकरणानेच भावी हिंदी राष्ट्राचे दृढीकरण केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी जागृति तत्कालीन अनेक विचारवंत हिंदु-मुसलमान पुढा-यांना झाली नव्हती, असे नव्हे. परंतु अखिल हिंदुस्थानात व्यापक धोरणाच्या व अभेदभावाच्या राष्ट्रीय जागृतीची पुण्याई कै. टिळकांच्या पदरी बांधण्याचा उपद्व्यापी अट्टहास करणा-या शहाण्यांना इतकेच सप्रमाण बजावणे अवश्य आहे की हिंदूंचा विशेषतः महाराष्ट्रातल्या हिंदूंचा स्वाभिमान जागृत करण्याचा कै. टिळकांनी यत्न केला, असे सामान्य विधान केल्यास काही