संस्कृतीचा संग्राम: Page 2 of 22

पुराणोक्त चातुर्वर्ण्याने हिंदु समाजाची घडी परीटघडीपेक्षाहि फार सुरेख इस्तरीत चापून चोपून बसविली, असली वाचाळ-पंचविशीची पुराणे झोडणा-या भोंदू पंडितांनी तर हिंदूंचा प्रचलीत अधःपात आणि त्यांची सर्वांगीण गुलामगिरी अवश्य विचारात घेतली पाहिजे.

हिंदू आणि मुसलमान या बिकट प्रश्नाची उत्पत्ति हिंदूंच्या मूर्खपणांतून कशी झालेली आहे. याचे विस्तृत सोपपत्तिक विवेचन मूळ ग्रंथात आलेलेच आहे. प्राचीन लोकसंग्रही बाण्याला हिंदु जर बेमान झाले नसते, तर आज हा प्रश्नच उद्भवला नसतां, हे त्यावरून स्पष्ट ध्यानी येईल. इंग्रजांचे नोकरशाही राज्य या देशात होईपर्यंत हिंदु मुसलमानांच्या बाह्य चुरशीचे स्वरूप शुद्ध राजकीय दिसत होते; त्याच्या पाळ्यामुळ्या हिंदूंच्या थेट अस्तित्वाच्या जिवाग्री जाऊन बसल्या असतील, अशी मात्र कोणाचीच कल्पना नव्हती. महाराष्ट्राचा भगवा झेंडा खाली उतरून त्याच्या जागी बनिया कंपनीचा युनियन जॅक बावटा फडफडेपर्यंत, इंग्रजी सत्ता हिंदुस्थानात दृढमूल झाल्याची कोणाचीच खात्री पटणे शक्य नव्हते. अखेर इंग्रजांच्या सवाईसोट्या राज्यपद्धतीच्या दडपणाखाली हिंदु आणि मुसलमान सामनेवाले सारखेच चीत होऊन, दोघांच्याहि दामटीचे आकार एकाच वळणाचे दिसू लागले. इंग्रजी राज्यकारभाराच्या सणसणीत तापलेल्या तव्यावर दोघांची भाकर सारखीच अभेद भावाने भाजली जात असतांना उगाच कधिमधि चुरचुर फुरफूर होत असे. नाही असे नाही. पण ती अगदीच क्षुल्लक. १८५७ च्या बंडांत तर हिंदु आणि मुसलमान अगदीं एकजीव व एकजिव्ह होऊन, त्यांनी इंग्रेजी सत्तेला पायबंद लावण्याचा अखेरचा निर्वाणीचा थैमान केला. पण इंग्रेजांची सद्दी जबरदस्त! काडतुसाला लावलेल्या डुकराच्या चरबीने हिंदु मुसलमानांची बुद्धि राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी कितीहि भडकली, तरी अखेर त्या चरबीचे वंगण इंग्रजांच्या जोरावर सद्दीलाच पडावे, हा अनादि अनंत काळाच्या पटातला एक रहस्यमय चित्रपट होय. यात मुळीच शंका नाही. सत्तावनच्या बंडाने हिंदु आणि मुसलमान या दोन प्रमुख हिंदी समाजांच्या राजकीय महत्वाकांक्षाचे वस्त्रगाळ पीठ झाल्यामुळे, अखिल हिंदुस्थान देशाच्या राष्ट्रीय चैतन्याला पूर्ण बधिरता आली. त्याची हालचाल नष्ट झाली. वर्तमानकाळाच्या धमधमणा-या वर्मावरच मर्मी घाव पडल्यामुळे, भूतकाळचा पराक्रम त्याला दिसेनासा झाला व भविष्यकाळाच्या दिशेला काळाकुट्ट भयाण अंधःकार पसरला. सुमारे दोन अडीच शतके राजकारणाच्या क्षेत्रात हमरीतुमरीचे संग्राम करून, यशापयशाच्या भरतीओहोटीने सा-या जगाच्या भवितव्यतेला उलथी पालथी करणारे हिंदु आणि मुसलमान १८५७ साली इंग्रेजी सत्तेची खास अखेरची ठोकर खाऊन जमीनदोस्त होताच, आसेतुहिमाचल हिंदुस्थानातच नव्हे, तर सा-या उपलब्ध दुनियेत मसणवटीतील घोर शांतता नांदू लागली.

शांततेच्या याच हंगामात इंग्रेजी सत्तेचा पाया येथे कायमचा बसला गेला. तागडीबहाद्दर बनिया कंपनीने आपल्या राजकीय सत्तेची कटकट महाराणी व्हिक्टोरियाच्या ओटीत घातली आणि सर्वत्र व्हिक्टोरीया निशाणी धरुनि चहुंकडे चालती शुद्ध नाणी या सोज्वळ गाण्याचे घाणे हिंदुस्थानात घरोघर सुरू झाले. हिंदु मुसलमानांच्या राजकारणी महत्वाकांक्षा आतां ठार झाल्या. बापजाद्यांचे पराक्रम आठवून त्यांचे पोवाडे गाण्यापलीकडे, आणि कधिमधी दिल्लीदरबारासारख्या प्रसंगी दोघांनी मिळून इंग्रजी सत्तेची मनमुराद खुषामत करण्यापलीकडे, त्यांना काही धंदाच उरला नाही. मोंगल बादशाही आणि हिंदु स्वराज्यशाही यांच्या झगड्यात हिंदु आणि मुसलमान असे दोन युद्धमान भिन्न तट इतिहासात आपल्याला दिसतात खरे, पण वास्तविक पाहिले तर हिंदूंशी झगडणारे मुसलमान हे खरेखुरे तुर्की मुसलमान नसून, अस्सल हिंदु संस्कृतीचे व हिंदु रक्ताचे इस्लामी पेहराव केलेले अस्सल हिंदूच होते. म्हणूनच एकरंगी एकशिंगी इंग्रजी सत्तेच्या एकाच तडाख्याने या एकजिनसी संस्कृतीच्या एकदेशी प्रतिस्पर्ध्यांना चुटकीसरसे चीत करून, त्यांच्या राजकारणी आकांक्षेला बेरोजगार केले. मनुष्याचे मन हे जात्यासारखे आहे. त्याला एकसारखे काही ना काहीतरी दळायला दळण लागते. दळणाची काहीच सामुग्री त्यात पडली नाही, तर ते स्वतःलाच दळून भरडूं लागते. हिंदु मुसलमानांच्या मनाची निष्क्रीयता बंडोत्तरकाळी इतकी वाढली की ते मेल्यापेक्षाही मेले बनले. राजकारणी बुद्धिबळाचा पटच त्यांच्या हातून हिसकावून नेल्यामुळे, त्यांचे रिकामटेकडे मन सैरावैरा भडकू लागले. आपण होऊन आंगावर आलेले देशाच्या राज्यकारभाराचे किचकट ओझे परोपकारी दयाळू माबाप इंग्रजी सरकारने स्वतःच्या शिंगावर घेतल्यामुळे हिंदु, मुसलमानांना ऐदीपणाशिवाय दुसरा काही