संस्कृतीचा संग्राम

हिंदू धर्माचें दिव्य या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीला पुरवणी म्हणून संस्कृतीचा संग्राम ही पुस्तिका लिहिण्यात आली. हे पुस्तक म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील संघर्षाचा थोडक्यात आढावा आहे. अर्थातच खास प्रबोधनकारी टचने या आढाव्याला भाष्याचा दर्जा मिळवून दिलाय. बारापैकी सहा मोगल बादशाह जन्मभर हिंदू म्हणून आचरण केलेल्या मातांचे पुत्र होते आणि काही अपवाद वगळता मोगल राजवटीत हिंदू मुस्लिम संस्कृतीचा संगम झाला होता. लोकमान्य टिळकांच्या कथित राष्ट्रीय चळवळींनी महाराष्ट्रातील मुसलमान हिंदूंपासून दुरावला. महात्मा गांधींचा मुस्लिमविषयक दृष्टिकोन अत्यंत भोंगळ होता. अशी प्रबोधनकारी हिंदुत्वाची भूमिका यात स्पष्ट होते.

संस्कृतीचा संग्राम - लेखक केशव सीताराम ठाकरे

संस्कृतीचा संग्राम हिंदु आणि मुसलमान! हिंदु धर्माच्या दिव्याचे चित्र देशबांधवांपुढे ठेवताना या प्रश्नाला जितके महत्त्व होते त्यापेक्षां सहस्रपट महत्त्व आज त्याला आलेले आहे. हिंदु कोण आणि मुसलमान कोण, याची स्पष्ट परिस्फुटता मूळ ग्रंथात केलेलीच आहे. आज या दोन भिन्न भिन्न दिसणा-या समाजांत विरोधाची जी तीव्रता दिसत आहे, तिची उत्पत्ति हिंदुंच्या नादानपणांतून झालेली आहे. अभेदांतून भेद निर्माण झाला आणि अखेर तो दोनहि भेदांच्या समूळ –हासाला कारण होऊन बसला, असा हा चालू घडीचा मामला आहे. महायुद्धामुळे सर्व जगांत उत्पन्न झालेल्या नवचैतन्याने हिंदुंशिवाय जगातील सर्व समाजांच्या मनगटांतल्या नसा टरारून तट्ट फुरफुरल्या आहेत. तत्त्ववेत्तेपणाची सुकी घमेंड मारणारा बोलभांड हिंदु तोंडाची नुसती टकळी करीत बसला आहे, तर व्यवहारदक्ष इतर सर्व राष्ट्रे व समाज मनगटाच्या जोरावर आपापल्या सर्वांगीण भाग्योदयाचा मार्ग निष्कंटक चोखाळण्यासाठी शक्तियुक्तीची पराकाष्ठा करीत आहेत. सारांश, काव्यकल्पनांत मग्न राहून, वेदांताचा फाजील गर्व वाहणारा हिंदु समाज एकीकडे आणि लाथ मारू तेथे पाणी काढू अशा आत्मविश्वासाने फुरफुरलेली व्यवहारकुशल सारी दुनिया एकीकडे, असा आजचा प्रसंग आहे. पूर्वी हिंदूंनी राज्ये केली, जगाच्या ब-याचशा उपलब्ध भागांवर साम्राज्यसत्ता आणि धर्मसत्ता गाजविली, आणि वातावरणाच्या अणुरेणूतून अझूनहि पडसाद देणा-या मोठमोठ्या लढाया मारल्या. परंतु त्या सर्व हिंदुस्थान द्वीपकल्पाच्या सरहद्दीच्या आतच आत घुसलेल्या गनिमांशी प्राणान्तीची टक्कर देण्यात हिंदु वीरांनी आपल्या वीरश्रीची न भूतो न भविष्यति अशी कमाल केली खरी; पण डच, प्रेंच, इंग्रजा प्रमाणे परदेशांत बळेच घुसून, टाचेखाली सापडणारा जमिनीचा प्रत्येक तुकडा आमचा, अशी जेतृत्वाची धमक मात्र हिंदुंनी ऋग्वेदोत्तर काळी कधीच दाखविली नाही.

वेदान्ती हिंदू या शेळपटापणाचे मंडन कसेहि करो; सर्व दोषांवर पांघरूण घालण्याची कला हिंदुंच्या वेदान्तशास्त्राला चांगली अवगत आहे. एखाद्या जबरदस्ताने दोन सणसणीत श्रीमुखात भडकवाव्या आणि या कमकुवत वेदान्त्याने त्या निमूटपणाने सहन करून, ‘हा सत्याचा जय झाला!’ म्हणून फिदीफिदी दात काढून हसावे, ही तर आमच्या तत्त्वज्ञानाची हिंदु कसोटी! अर्थात जगातल्या धकाधकीच्या मामल्यात असला स्थितप्रज्ञ समाज सा-या जबरदस्त जगाच्या प्रत्येक सुस्का-याला लेंड्या गाळू लागला, तर त्यात काय नवल? जगजेतृत्वाची धमक म्हणजे महत्वाकांक्षी राष्ट्राची प्राणज्योत. ही प्राणज्योत ऋग्वेदकालीन आर्यांच्या हृदयात महत्तेजाने तेवत होती, म्हणूनच ते हिंदुस्थानाला पादाक्रांत करू शकले, ही ज्योत पुढे मिणमिण करतां करतां बुद्धोत्तरकाली साफ विझली, आणि आजच्या आर्यवंशज हिंदुंच्या हृदयात महत्वाकांक्षेची फुटकी पणतीही आढळत नसल्यामुळे, सर्वत्र अमावास्येचा थयथयाट बोकाळला आहे. जगज्जेतृत्वाच्या धमकीचा पलिता विझताच, लोकसंग्रहाचा बाणा आंधळा झाला. सर्वत्र अंधार पडल्यामुळे कर्तबगारीची दौड स्वार्थाच्या टीचभर कुंपणातच गिरक्या मारू लागली. सरहद्दी पलीकडच्या अफाट जगावर हरदिन हरघडी टवकारून पाहणा-या गरुडनेत्राची उघडझाप पिलपिल करू लागताच. राजकीय आकांक्षेने आकुंचितपणाची बुरख्याची ओढणी घेतली; आणि राजकारणी वचकाची मांड ढिली पडतांच हिंदूंच्या अस्तित्वाच्या नरड्याला नख देण्यासाठी सा-या जगाने आपापली नखे पाजळून सज्ज केली. हिंदुस्थानाचे चहुबाजूंनी संरक्षण करण्याची निसर्गाने आपल्याकडून शक्य तितकी मजबूत तटबंदी केलेली असताहि, उत्तर सरहद्दीवरच्या एका बारीकशा खैबर बिळातून परदेशी उंदरांच्या टोळ्यांनी भराभर आंत घुसून, स्थानिक हिंदू मांजरांच्या गळ्यात घंटा बांधाव्या, हा विलक्षण चमत्कार विचार करण्यासारखा आहे. हिंदुस्थानाच्या नैसर्गिक सरहद्दीपेक्षाही,