वाचकांचे पार्लमेण्ट: Page 6 of 74

पर्यंत ध्येयाची गाठभेट न झालेले कितीतरी आहेत. शांताराम दशरथ बि-हाडे, मेहुणवारे. स०- सती जाणे किंवा विधवा रहाणे, यात ऐहिक किंवा पारलौकीक कोणते? ज०- परलोकाविषयी माहिती कोणत्याहि ज्ञानकोशात नाही.तिकडे गेलेले लोक जितके बेपर्वा कीं चुकून कधि भेटत नाहीत, रेडिओवरहि बोलत नाहीत. तेव्हा तेथला सुखदुःखाचा वादच नको. सती स्तोम पोटभरू भिक्षुकांनी माजवले आणि विचारशून्य मूर्खांनी वाढवले. शेकडा ९९ स्त्रिया आपखुशीने नव-याच्या जळत्या सरणावर चढणार नाहीत याची पक्की खात्री केल्यानंतरच सतिबंदीचा कायदा झाला आणि तो कदरीने अमलात आणला गेला. ऐहिक सुखाच्या कल्पना वायफळ होत. शेकडा १०० विधवांना पोळपाट लाटण्याचे किंवा भलत्याच इसमाची शय्या थाटण्याचे ऐहिक सुख मात्र लाभते. प्रत्येक अपत्यहीन विधवेने आपण होऊन पुनर्विवाह लावण्याचे धाडस दाखविले पाहिजे. स०- पोथ्या पुराणे ऐकून परिस्थिती सुधारली का बिघडली? ज०- माणसांची जनावरे बनली. स०- विज्ञानशास्त्राकडे आमचे लक्ष कां वेधले जात नाही? ज०- गुरुचरित्र, व्यंकटेश स्तोत्रादि पोथ्यांची ठरावीक मुदतीची पारायणे करून मोक्षाचा गोळा आयता आमच्या हातात पडत असताना विज्ञानशास्त्राची ती कटकट हवी कोणाला? त्या धर्मभ्रष्ठ अमेरिकन –नानी रेडियो राडार रॅकेट आटम बांब काढावा आणि आम्ही धर्म अध्यात्मवादी शहाण्यांनी मोदकांचे पार बांधून बुद्धिदात्या गणोबाची आराधना करावी. कबीराने म्हटलेच आहे ना, ''तूं तो राम सुमर, --- लढवा दे.'' हवी कशाला ती आपल्या पंचाईत? शिवाय, विज्ञान शास्त्राकडे लक्ष लागले तर परमेश्वराचे अस्तित्व हायड्रोजन ऑकसिजन वायूत खलास होईल, त्याची वाट काय? बिचा-या परमेश्वराला हिंदुस्थानाशिवाय नि हिंदूंशिवाय जगात दुसरे मायपोट नाही. मनोहर सपकाळे, सावदा. ठीक ठीक, तुमचे नाव ‘उर्फ लक्ष्मण सपकाळे’, हे समजले. पण कायहो, मनोहरराव उर्फ लक्ष्मणराव, मी किती शिकलो आहे, मला पोरेबाळे किती, असल्या प्रश्नानी पार्लमेण्टचे काही अडत आहे का? स०- आपण आत्मचरित्र लिहिले किंवा लिहिणार आहात काय? ज०- सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, या धोरणाने थोर लोकोत्तर विभूतींची चरित्रे अभ्यासण्याची नि लिहिण्याची मला फार आवड आहे. रंगो बापूजी, पंडिता रमाबाई ही चरित्रे प्रकाशात आणली. आता संत श्री. कर्मयोगी गाडगे बाबांचे मोठे चरित्र लिहीत आहे. असल्या थोर महान व्यक्तींच्या पुढे हा ठाकरे कोणत्या झाडाचा पाला. स०- आमच्या सावदा हायस्कुलातील मराठीचे एक शिक्षक सांगतात की प्रबोधनकार ठाकरे पूर्वी कोल्हापूरच्या राजाच्या पदरी दिवाण होते (अर्थात काही दिवस) आणि त्या राजाश्रयाच्या जोरावर आपण प्रबोधन चालवित होता. ज०- आरपार खोटी गोष्ट आहे ही, म-हाट्यांच्या इतिहासाबाबत आणि समाजसुधारणेच्या शेकडो प्रश्नांवर शाहू छत्रपति माझी सल्ला मसलत वरचेवर पुष्कळ घेत असत. त्यांचा किंवा आणखीं कोणा राजाचा मी (थोड्या दिवसापुरताच का होईना) दिवाण असतो, तर हयातभर दिवाणा कशाला राहतो? राजाश्रयावर प्रबोधन काढले नि चालवले, ही तर माझी नागडी बदनामी आहे. आजवर कोणत्याहि बाबतींत केव्हाहि राजाश्रयाचे पाप मी पत्करलेले नाहीं. शाहू महाराजांचा मी अश्रित असतो तर सन १९२१ साली प्रबोधन निघताच, त्याच्या २ -याच अंकात ''अंबाईचा नायटा'' हा एक लेख लिहून शाहू महाराजांची खडबडीत हजेरी मी कशी घेऊं शकलो असतो? तुमच्या त्या शिक्षकजींना हा सवाल टाकून, त्यांची गैरसमजूत दूर करावी. आपले बाकीचे सवाल पुढल्या बैठकीत. लक्ष्मीसुत तळवेल. स०- परवा १२ १२ ५१ रोजी सर्वत्र दत्तजयंति साजरी झाली. तीन डोक्यांचा नि सहा हातांचा देव झोप कसा घेत असेल? ज०- घोड्याप्रमाणे हा देव उभ्याउभ्याने झोपेची डुलकी घेत असेल. मला कधि कुठे तो भेटलाच, तर तुमच्यासाठी त्याला हा खुलासा अगत्य विचारीन. स०- सत्व रज तम या तीन गुणांचा संयोग म्हणून ही दत्ताची कल्पना आहे काय? ज०- बरोबर हेरलेत, शैव वैष्णवांचे वाद मिटवण्यासाठी एका डोकेबाज माणसाने हा तीन डोक्यांचा देव आपल्या कल्पनेतून प्रसवून तुमच्या आमच्या डोक्यांवर बसवला आहे. शैव वैष्णव वाद तर मिटले नाहीच,