वाचकांचे पार्लमेण्ट: Page 5 of 74

हरकत कसली? स०- विद्यार्थ्यांना राजकारणाच्या वादविवादात भाग घेणे योग्य का अयोग्य? ज०- हायस्कूल कॉलेजांतून पार्लमेण्टे चालविण्याची प्रथा उत्तम आहे. मात्र प्रत्यक्ष राजकारणाच्या चळवळीत भाग घेणे उचित नाही. विद्यार्जनाचा काळ विद्यार्जनातच घालवला पाहिजे. गांधी चळवळीत शिक्षण सोडून राजकारणी धामधुमीत भाग घेणा-या विद्यार्थ्यांच्या जीवनाचे धिंडवडे उडालेले आहेत. रामकृष्णराव दौलतराव शेळके, मु. राजूर, पो. बोदवड. स०- डॉ. आंबेडकर यांचा बौद्द धर्माकडे ओढा फार आहे. त्या धर्माने दलित जनतेचे दारिद्र्य नि हीनता नष्ट होईल काय? ज०- धर्माच्या रंगचोपडणीने पूर्वी कधि असे झाले नाही आणि आता असे होणार नाही. स०- बोदवड येथे परवा एका बुवानी मोठ्या आकसाने सांगितले का आता सारे पंथ जाळून, देशाचा कारभार साधू संत नि भक्त यांच्या हातात आला तर सारी विषमता एकदम नष्ट होईल. ज०- होईल होईल. सबंध हिंदुस्थान सदेह वैकुंठाला जाईल. मुरलीधर कृष्णा पाटील, भादली बु. स०- विवाहित पुरु, कधिकधि पत्नीविषयी जिव्हाळा ठेवूनहि दुस-या एकाद्या तरुणीच्या आकर्षणात सापडतो, याचे कारण काय? ज०- त्याच्या पत्नीचा अर्धवटपणा. स०- संसार आपणासाठी का आपण संसारासाठी? ज०- वासासाठी फूल का फुलासाठी वास? विश्वनाथ डी नेहेते, सावदा स०- काँग्रेजी राजवटीत कलावंतांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थान किंवा उत्तेजन कां मिळत नाही? ज०- काँग्रेजी राजवट ही सुतक्यांची राजवट आहे. पाच वर्षांत त्यांनी लोकांचा नूर पार कोमेजून टाकला आहे. देशाला अवकळा कशी आणावी ही एकच कला त्यांना चांगली साधली आहे. स०- मोठमोठे पुढारी एकसारखे पक्ष-बदल कां करतात? ज०- ज्या खाणावळीत चांगले जेवायला मिळेल तिकडे जाणे, हा मनुष्याचा स्वभावच आहे. स०- वाङमयामध्ये मानवी जीवनाची खरी कल्पना येते काय? ज०- जीवन जगून अनुभवावे लागते. कल्पना करून ते जगता येत नाही. नामदेव नारायण शिंदे मु० पो० भुसावळ स०- भारताची संस्कृती उज्वल नि प्राचीन असतां, येथे भयंकर आर्थिक विषमता कां असावी? ज०- संस्कृतीचा नि आर्थिक विषमतेचा काही संबंध नसतो. शिवाय, संस्कृतीच्या आमच्या कल्पना नि जल्पना वाह्यात आहेत. स०- आपल्या उज्वळ सोज्वळ नि श्रेष्ठ संस्कृतीत अस्पृशता निर्माण झालीच कशी? आणि टिकली तरी कशी? ज०- ही संस्कृती उज्वल सोज्वळ नि श्रेष्ठ नाही म्हणूनच. दयाराम तुकाराम गवळी, तारखेडे स०- हल्ली आपल्यात पूर्वीसारखे कवि कां नाहीत? ज०- पूर्वीसारखे म्हंजे कसे? आताचे काय वाईट आहेत? स०- नैमित्तिक अस्पृश्यता मानावी का न मानावी? ज०- घाण दुर्गन्ध पुरती अस्पृश्यता पाळलीच पाहिजे. जातीय अस्पृश्यता मानणे माणुसकीचे नव्हे. नारायण नथू चौधरी, कांडवेल. पो. निंभोरा स०- दारुबंदी कायदा झाला तरी पिणारे पितातच. रेशनिंग आहे तरी काळा बाजार चालतोच. द्विभार्या प्रतिबंध कायद्याचे असेच होत असेल का? ज०- शंका आहे वाटतं. विवाहाशिवाय लग्न लावता येते. स०- वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय? ज०- वैयक्तिक स्वातंत्र्याची जाणीव. गणपति ओंकार सोनार, एकतारा, पो. बेटावद स०- माणसाने सदा नम्र असावे म्हणतात, पण नम्रतेपासून जन्मात तरी काही फायदा होईल काय? ज०- नम्रता म्हणजे मेंध्येपणा असे कुणी सांगितले तुम्हाला? स०- स्त्री ही पुरुषाची माता, घटकेची प्रेयसी आणि अनंत काळची शत्रु असे म्हणतात, ते कसे? ज०- स्त्रीला अनंत काळची शत्रु ठरवणारा वेदान्ती माणुसकीला मुकलेला असावा. सीताराम मोतीराम पाटील, भादली बु।। स०- हिंदुस्थानात चहाचे प्रस्थ कोणत्या सालापासून चालू झाले? ज०- माझ्या लहानपणीं म्हणजे ६७ वर्षांपूर्वी आमच्या घरात चहा चालू होता. तेव्हां ते प्रस्थ त्यापूर्वी बरीच वर्षे समाजात चालू असावे. चहाचा इतिहास चहा इतकाच लज्जतदार आहे. सन १७६७ साली चहा प्रकरणावरूनच अमेरिकेत इंग्लंडविरुद्ध मोठे वादळ उठले आणि त्या वादळातून अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे निशाण फडकले. स०- माणसाने कोणत्या वयापासून ध्येय बाळगावे? ज०- कुत्र्या मांजरासारखे ध्येय हे काय बाळगायचा प्राणी आहे की काय? ध्येयाचा नि वयाचा काही संबंध नाही. आयुष्याच्या अखेर