वाचकांचे पार्लमेण्ट: Page 4 of 74

उत्तरासाठी जोड कार्ड अथवा पोस्टाचे तिकीट पाठवीत जावे. --ठाकरे. बी. आर. तायडे, मु०पो० रावेर, स०- येत्या निवडणुकीनंतर हिंदु कोड बिल पास होण्याची आशा आहे काय? ज०- काँग्रेसवाल्यांना निवडून देण्याचा लोकांनी मूर्खपणा केला, तर तुमच्या आमच्या हयातीत ते पास व्हायचे नाही. स०- सेक्युलर स्टेट चा मराठी प्रतिशब्द काय आहे. ज०- शब्दकोशात संसारी, ऐहिक, लौकीक, पुष्कळ काळाने होणारा, असे प्रतिशब्द दिलेला आहेत. चर्च किंवा धर्म यांशी संबंध नसलेले राज्य, असा त्यात मार्मिक श्लेष आहे. निधर्मी राज्य किंवा धर्मातीत म्हणजे धर्मबिर्म न मानणारे राज्य, धर्म विषयाच्या बाहेर असणारे राज्य, असा अर्थ सांगण्यात येतो. प्रस्तुतचे काँग्रेजी राज्य धर्मातीत म्हणून कितीहि पुकारा होत असला तरी पायांचे किंवा संस्थांचे दगड बसवताना एकजात पांढरटोपे काँग्रेजी मुखत्यार भटांच्या चर्पटपंजरीने हिंदुधर्म पद्धतीनेच पाया भरणीचे मंगलकार्य साजरे करतात. सेक्युलरपणाच्या कल्पना हा एक ठळक काँग्रेजी निर्लज्जपणा आहे. स०- पिशाच्च योनी अस्तित्वात आहे म्हणतात, ते खरे आहे काय? ज०- सभोवर चिलटा पिसवांइतका काँग्रेजी प्राण्यांचा सुळसुळाट दिसत असताना नाही म्हणण्याचे धाडस कोणी करावे? स०- गर्भवतीला मुलगा होईल का मुलगी होईल हे निश्चित सांगणारे एकादे शास्त्र आहे काय? ज०- आयुर्वेदात माहिती आढळते. शास्त्र आहे किंवा नाही, मला माहीत नाही पण कित्येक स्त्रिया मात्र हे अचूक सांगताना आढळतात. स०- काहीं स्त्रियांत नि काही पुरुषांतहि वांझपणा असतो. तो कशाने उत्पन्न होतो? तो घालवता येतो काय? ज०- कशाने उत्पन्न होतो, ते सांगता येणार नाही. पण काही शास्त्रीय सर्जिकल किंवा औषधी उपायांनी तो घालवता येईल, अस माझे एक डॉक्टर स्नेही सांगतात. सूचना - बालसंगोपनाविषयीच्या पुस्तकांबद्दल बुकसेलराकडे चौकशी करावी. त्रिं. ज. आगाशे, पुणे. स०- दारुबंदी आणि वेश्याव्यवसाय यांत अधिक वाईट कोणते? ज०- दोनीहि वाईटच. दारुबंदीमुळे वेश्याव्यवसायाला उत्तेजन मिळू लागले आहे. पुर्वी दारू पिण्यासाठी लोक क्लब आणि बारमध्ये जात असत. आता दारूच्या घोटासाठी वेश्यांच्या घरी जात असतात. स०- दुधदुभते विकणारे गवळी आणि मासेमार कोळी यांच्या व्यवसायातील विशेष काय? ज०- गवळी पाण्याचा पैसा करतो आणि कोळी पाण्यातून पैसा करतो. केसरीलाल लछीराम जैसवाल, महाळुंगी जहागी, ता० मलकापूर स०- कृष्ण नि गांधी यांपैक्षा आपण दोघे मोठे, असे आपण म्हणता, ते कसे? ज०- आपण दोघे छोटे, हा न्यूनगण्ड बाळगण्यात तरी काय पुरुषार्थ आहे? स०- शरीरातला आत्मा निघून गेल्यावर मृत्यू होतो, मृताचा आदर करणारे ‘आत्म्याला शांति मिळो’ म्हणतात. तेव्हा ते कोणाला विनंती करतात? ज०- देह आत्म्याचा संयोग आणि वियोग हे एक कोडे आहे. आजवर कोणाला ते सुटले नाही नि पुढे सुटणारहि नाही. मृत माणसाविषयी काही गोड बोलले पाहिजे, एवढ्यासाठी आत्म्याच्या शांतीचा तोडगा निघालेला आहे. केवळ सदिच्छेपेक्षा त्यात अधिक अध्यात्म काही नाही. मनोहर सपकाळे, सावदा. स०- भावना व वासना यात फरक काय? ज०- भाव नाही ती भावना आणि वास नाही ती वासना. स०- आजच्या तरुणांनी जीवनाची पूर्वतयारी कशी करावी? ज०- जगातल्या थोरथोर नर नारींची चरित्रे अभ्यासून आपल्या पिंड प्रकृतीशी जुगणा-या व्यक्तीच्या जीवन-तपशिलांप्रमाणे. स०- सोशालिस्ट पक्षाचे अंतिम ध्येय काय? ज०- सोशालिस्ट वाङ्मयाचा काळजीपूर्वक अभ्यास करा. देअर इज नो शॉर्टकट टू नॉलेज. स०- सत्यशोधक शब्दाची व्याख्या काय? ज०- तुपाची चव शब्दानी सांगा. स०- महात्मा गांधींनी सत्य अहिंसेच्या प्रचारासाठी जीवन खर्ची घातले, तरी त्यांना नोबेल प्राइज कां मिळू नये? ज०- त्यांच्या कीर्तीच्या गगनचुंबी उंचीचा नोबेल कमिटीचा हात पोचू शकला नाही म्हणून. विनायक तळवेल स०- येत्या निवडणूकीत सोशालिस्ट पक्ष विजयी झाला आणि त्याचे सरकार बनले, तर ते काँग्रेसपेभा अधिक सुधारणा करणारे होईल काय? ज०- लोकशाही स्वराज्याच्या प्रयोगाचा सध्या आपण श्रीगणेशा घटवीत आहोत. काँग्रेसपक्षाची लायकी आपण पुरीपुरी पाहिली. आता सोसालिस्टांना प्रयोगाची सवलत द्यायला