वाचकांचे पार्लमेण्ट: Page 3 of 74

महान धर्मसंस्थापकांना चांगला मृत्यु कां येऊ नये? त्यांची हत्याच कां व्हावी? ज०- मृत्यूचे चांगले वाईट प्रकार आपण ठरवतो. तसे ते मुळीच नसतात. मृत्यु म्हणजे मृत्यु. हत्येने झालेला मृत्यु वाईट म्हणावा, तर लढाईत मरणारांच्या पुण्याईची गीतास्तोत्रे फोल ठरवावी लागतील. वात पित्त कफाने जर्जर होऊन बिछान्यात कण्हत कुंथत मरण्यापेक्षा कर्तव्यमग्न असताना ठार मारले जाणे अधिक श्रेयस्कर, आत्महत्या करणारांच्या मृत्यूचा मात्र कडकडीत निषेधच झाला पाहिजे. बळीराम शंकर पोलिस पाटील, रणगांव, पो सावदा. स०- बहुतेक भजनी मंडळीत तमाशांतील किंवा सिनेमातील संगीत गाणी गायली जाताना आढळतात. ते देवाला आवडेल का? ज०- देव बसला देवळात! गाणारांची तर करमणूक होते ना? एरवी तरी भजने देवासाठी थोडीच असतात? देवाला काय कळणार त्यात. स०- पुरुषांचे मन आकर्षण्यासाठी स्त्रियांनी सौंदर्यप्रसादने वापरावी काय? ज०- परस्पराकर्षणासाठी दोघानीहि वापरली तरी काय हरकत आहे? स०- इतर समाजांत प्रतवाहनाची पद्धत गौरवशील असते, --- लोकांत तशी ती कां नसावी? ज०- इतरांपेक्षा हिंदुलोक या बाबतीत रानटी नि खुळचट आहेत. पंढरीनाथ मनसाराम नेहेते, सावदा. स०- इंग्रेज लोक १३ अशुभ कां मानतात? ज०- येशू क्रिस्ताने जे अखेरचे भोजन (सपर) केले त्या वेळी जुडास सकट १३ आसामी त्याच्या पंगतीला होते. हा एक आधार. दुसरा युरोपात पूर्वी चेटक्यांचे प्राबल्य फार होते त्या चेटक्यांच्या टोळीत खूप चेटक्या असत या दंतकथेवरून १३ आकड्याच्या अशुभत्वाचा प्रसार झाला. येशू ख्रिस्ताला शुक्रवारी सुळावर दिले म्हणून पाश्चात्य ख्रिस्ती शुक्रवार घातवार समजतात. त्यांच्या माकडी नकलेने आम्हीहि तसेच मानीत असतो. लोकभ्रम अतिशय स्पर्शजन्य आहे. स०- एस. एस. सी. परिक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात सरकारचा हेतु काय आहे? ज०- शालान्त परिक्षेच्या टिकलीसाठी घाघावलेल्या अर्धालांब पोरापोरीची गचडी विरळ करण्यासाठीय स०- हिंदूंचे कोणते सण आता रद्द करावे आणि कोणते नवीन चालू करावे? ज०- सगळे बंद करावे. हिंदूंना सण साजरे करण्याची अक्कलच उरलेली नाही. स०- होमगार्ड म्हणजे काय? त्याची उत्पत्ति नि कार्य काय? ज०- देशाचे सैन्य बाहेर युद्धात गुंतले असताना स्वदेशाचे संरक्षण करण्यासाठी स्वयंसेवकांची पथके तयार करण्याचा उपक्रम नेपोलियनने केला. १९ व्या शतकाच्या मध्यावर या प्रथेचे पुनरुज्जीवन युरोपात झाले. १९०८ साली टेरिटोरियल फोर्स याच तत्वावर काढले नि पुढें त्याचे सैन्यातच विलिनीकरण झाले. होमगार्डचा उपक्रम वर्तमान जीवनात एक आवश्यक बाब आहे. भाऊलाल गणेशमल ओसवाल, बोदवड. स०- हल्ली चोहीकडे लोकशाहीचे प्रस्थ का माजले? ज०- कोणत्या शाहिचे भोक्ते आपण आहात? स०- सुभाषबाबू जिवंत आहेत का मरण पावले? जिवंत असल्यास ते भारतात कां येत नाहीत? मरण पावले असल्यास, भारतीय पुढारी त्यांचा स्मृतिदिन कां साजरा करीत नाही? ज०- ‘मी खरोखरच मेलो आहे.’ असे स्वता जिवंत माणसांना सांगण्याची मृत माणसाना कसलीच सोय नसल्यामुळे, त्यांच्या जगण्यामरण्याच्या गप्पांचा धुरोळा उडवून राजकारणी पाचपेच लढवायची डोकेबाजाना चांगली संधि मिळते. सुभाषबाबू निश्चित मरण पावले आता स्मृतिदिनाविषयी म्हणाल तर, भारतीय पुढारी इतके सत्ताधुंद झाले आहेत का सुभाषबाबूंच्या क्रांतिकार्याची त्यांना दिक्कत वाटेनाशी झाली आहे. नेताजींनी ब्रिटिशांच्या हिंदी पलटणी फोडण्याचे भीमकर्म केले नसते, तर ब्रिटिशांनी आणखी २५ वर्षे स्वातंत्र्याच्या काँग्रेजी केकाटण्याला दाद दिली नसती. या शहाण्यांना वाटते का आपण खादी टोपी कुडत्याच्या दिमाखावर स्वराज्य मिळवले. सुभाषबाबूंच्या पाठोपाठ बिचा-या आझाद सैनिकांनाहि या काँग्रेजी कसाबानी धुळीचे दिवे फुंकित वाटेला लावले. सूचनाः- प्रत्येकाने अधिकात अधिक फक्त ४ च प्रश्न विचारीत जावे. वाचकांचे पार्लमेण्ट जबाबदारः- प्रबोधनकार ठाकरे काही खुलासेः- (१) माझे प्रबोधन पाक्षिक अजून चालूच आहे, अशा समजुतीने अनेक स्नेहीजन ते चालू करण्याविषयी मला वरचेवर पत्रे पाठवित असतात. प्रबोधनच्या ऐवजी गेली चार वर्षे मी बातमीदार साप्ताहिकाच्या ओसरीवर बसून प्रबोधनची कामगिरी करीत असतो. तेव्हा त्या सर्व हितचिंतकांनी बातमीदारचे वर्गणीदार व्हावे. (२) कोणतीहि विचारणा करणारांनी