वाचकांचे पार्लमेण्ट: Page 2 of 74

पडले पाहिजेत. प्रकाशचंद्र रतनलाल सुराणा, बोदवड. स०- काँग्रेसला मते कां देऊ नये?

ज०- गेल्या तीन साडेतीन वर्षातले बातमीदारातले माझे लेख वाचले दिसत नाहीत. आजूबाजूच्या परिस्थितीचाहि चटका आपल्याला लागलेला दिसत नाही. काय उत्तर द्यायचे? थोडक्यात सांगतो, गेल्या चार साडेचार वर्षात काँग्रेसपार्टीने राज्यकारभाराची नालायकी भरपूर सिद्ध करून, जनतेला अन्न वस्त्र आस-याला महाग केले आहे. म्हणून त्या नालायक पार्टीचे सरकार आता नको, असे लोकांनी ठरवले आहे. सीताराम मोतीराम पाटील, भादली बु०

खुलासा०- ''मला इतके प्रश्न उद्भवतात कीं त्यांच्यामुळे मला वेडे होण्याची पाळी आली आहे''... अशा प्रस्तावनेने पाटीलभाऊनी तडाड ४८ प्रश्नांची सरबत्ति माझ्यावर सोडली आहे. नवनवीन माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारण्याची जिज्ञासा निराळी आणि ही वेळ लागण्याची आपत्ति निराळी. एकंदर अंदाज घेतला तर या तरुणाच्या आजूबाजूची परिस्थिती विचित्र दिसते. रहाणी खेडेगावची. वृत्तपत्रात येणारा मजकूर, बातम्या, त्याला भांबावून सोडतात. बुद्धीला स्थिरता देणारे वाङमय अवलोकनातच नसावे. त्यामुळे आजूबाजूच्या नि घरातल्या मंडळींच्या वागणुकीचा अर्थ त्याला नीटसा लागत नसावा आणि त्यानाहि याच्या मनातले व्यापार कळत नसावे. हे पहा, सीतारामभाऊ, रागाऊ नका. तुमच्या बहुतेक प्रश्नांचे जबाब इतरांना दिलेल्या जबाबांत वरचेवर आढळतील. पण एक काम करा. जगाच्या विश्वाच्या नि राष्ट्राच्या भविष्याची विवंचना टाकून द्या आणि स्वतःच्या बुद्धीला विवेकाची झिलाई देईल असे वाङमय अभ्यासात ठेवा. ''जीवनाविषयी मी अगदी निराशावादी बनलो आहे'' म्हणता? तुमचे वय ते किती, विद्या किती, आणि एकदम जीवनाविषयी निराशा? आयुष्यात काय असे मोठे पानपत झाले हो मॅट्रिक होऊन नोकरी मिळत नाही म्हणून शालेय पुस्तकी ज्ञानापेक्षा आणि वर्तमानपत्री लिखाणापेक्षा, अंगात काही हुन्नर असेल, मनगट घासून काम करण्याची हिंमत असेल, तर त्या खेडेगावात रहाता कशाला? सोडा ते आणि पडा बाहेर. मिळेल तो रोजगार पत्करा. तेथे स्थिर व्हा. व्यवहाराची कदर अनुभवा. लोकांत मिळून मिसळून वागा म्हणजे बुद्धी स्थिर होईल आणि स्वतःकडे नि जगाकडे पहाण्याची दृष्टी निवडेल, तुमच्या मनमोकळेपणाने उत्तेजित होऊनच मी हे विचार सांगत आहे इतरानाहि ते उपयोगी पडतील. लक्ष्मणकुमार चौगुले, मच्छे, बेळगांव.

स०- मध्यम वर्गाचे आजकाल भयंकर हाल होताहेत असो ओरडा ऐकू येतो. पण सिनेमा थेटरांत भारी दरांच्या जागांवर त्यांचीच नेहमी गर्दी असेत. हे काय गूढ आहे?

ज०- उपाशी पोटी मिशीला तूप लावून फिरण्याची बापजाद्यांची यांची खोड अजून सुटत नाही.

स०- शिवाजी छत्रपती आणि लो० टिळक यांच्याबद्दल बाळासाहेब खेरांनी जे अनुदार उद्गार काढाले, त्यावरून त्यांचा इतिहास विषय कच्चा होता, असे म्हणावे लागते. मग ते शिक्षणमंत्रि कसे झाले?

ज०- मंत्रि व्हायला विशेल अक्कल लागते, अशी का आपली समजूत आहे? ज्या काँग्रेसी राज्यात गुंडपुंडांचे दादा जस्टिस ऑफ द पीस होतात, तेथला इतर मामला किती सांगावा? स०- मार्क्सचे तत्वज्ञान शेकडा ९० लोकांचा अन्न पाण्याचा प्रश्न सोडवते म्हणतात?

ज०- पुस्तकापुरते तत्वज्ञान असेल ठीक. हरिनाम संकीर्तनाचे सदेह वैकुंठाला जाणारे लोक आमच्याकडे फार होतात. पण मार्क्स तत्वांचा उच्चार नि प्रचार करणारांचे डोळे इंगळासारखे लालबुंद आणि डोईच्या झिंज्या शिंदीच्या खराट्यासाऱख्या फडफडणा-या असल्यामुळेंच येथील विचारवंत लोक त्या तत्वापासून दोन हात दूर रहात आहेत. मार्क्सवादी लालभडक मडक्यांनी आगी उत्पात नि खुनांचे सत्र जागोजाग चालवून शेकडो लोकांच्या प्राणहानीने सध्याच्या तुटपुंज्या अन्नसामुग्रीत काटकसर घडवली, ऐवढे मात्र खरे. तेव्हढी तोंडे खायला कमी झाली.

स०- संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात असूनहि अद्याप तो कां निर्माण होत नाही? ज०- बडबड फार, चळवळ कोठेच काही नाही म्हणून.

स०- प्रेम म्हणजे काय? ज०- वेलाशिवाय टवटवणारी कळी आणी दोरासिवाय अंतराळी उडणारी वावडी. पंढरीनाथ भिवसन पाटील, बोरनार पो. म्हसावद. स०- आताच्या परिस्थितीत मुलींना कितपत अधिक शिकवणे श्रेयस्कर आहे? ज०- जितपत मुलांना शक्य नि श्रेयस्कर आहे तितपत. स०- महात्मा गांधी, येशू क्रिस्त अशा