कोदण्डाचा टणत्कार: Page 10 of 71

गादीवर बसण्यास का पात्र मानला जात नाही, या प्रश्नाच्या उत्तरांतच चित्पावनांचा ब्राह्मणपणा भाडोत्री ठरत आहे. * (*या गोष्टीबद्दल पुण्याचे विद्वान ‘आचार्य’ कतें. ता. २५ मे १९१५ च्या अंकात उद्गार काढतात - ‘‘आचार्यांच्या पहिल्या वर्षाच्या सोळाव्या अंकात प्रो. भानु. करवीर-पीठाच्या जगद्गुरूंचे सर्वाधिकारी झाले, वर्तमान आम्ही अभिनंदनपूर्वक प्रसिद्ध केले होते. पण त्या बहुमानाच्या व किफायतशीर पदावर त्यांना फार दिवस आरूढ होता आले नाही, हे कळविण्यास आम्हाला अतिशय खेद होतो. आम्ही तर अशीही आशा करीत होतो, की, ‘चंचुप्रवेश मुसलप्रवेश’ किंवा ‘भटाला दिली ओसरी’ या न्यायाने आता आमच्या कोकणस्थांना ‘जगद्गुरू’ होण्याचाही मान लवकरच मिळेल ! कारण हे प्रगतिप्रधान सर्वाधिकार देशस्थानेच संकेश्वरच्या पीठावर बसले पाहिजे, कोकणस्थ स्वामीचा त्या पीठाला स्पर्शही होता कामा नये, असल्या अनुदार कल्पनांना फार दिवस टिकू देणार नाहीत. फार काय पण प्रसंग पडल्यास ते स्वतः संन्यासदीक्षा घेऊन जगद्गुरूंचे पीठ सुशोभित करतील व विलायतेस जाऊन आचार्यांचे जगद्गुरूत्व सार्थ करतील, अशी आम्ही बळकट आशा करीत होतो. पण चार-सहा महिन्यांच्या आतच ती निष्फळ झाली. हे आम्हा कोकणस्थांच्या दैवदुर्विलासाचेच स्पष्ट चिन्ह आहे. ’’) ते काहीहि असले तरी आम्ही स्पष्ट विचारतो की शिवाजीच्या वेळी हे ऊर्ध्वबुद्धी चित्पावन होते कोठे? शिवकालापासून तो परवाच्या कै. न्या. रानड्यांच्या ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ पर्यंतचे सर्व जुने नवे लेख, कागदपत्रे, बखरी, पाश्चात्य फिरस्त्यांच्या रोजनिशा गाळून चाळल्या किंवा मंडळाच्या अगर राजवाड्यांच्या घशांत कोळून कोळून पाजल्या तरी एक गोष्ट स्पष्ट सिद्ध आहे की शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात एकहि चित्पावनाच्या रक्ताचा थेंब खर्ची पडलेला नाही. स्वराज्यस्थापना हे चित्पावनांचे ब्रीदच नव्हे, मागे नव्हते व पुढे असणारहि नाही. आजहि हिंदी स्वराज्यविषयक चळवळींचे सूक्ष्म निरीक्षण केले तरी त्यांत ती चित्पावन खटपट्यांची तळमळ पेशवाई पाट्यावरवंट्याचा जीर्णोद्धार करण्यासाठीच आहे. शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा कायस्थ प्रभूंच्या रक्तावर झालेली आहे आणि त्या स्वराज्याचा प्राण घेऊनच चित्पावनांनी आपली प्रतिष्ठा वाढविली आहे. हा ऐतिहासिक पुरावा खोडण्यासाठी राजवाड्यांना मंडळाला किंवा अखिल चित्पावनांना आपल्या बेचाळीस पिढ्यांची पुण्याई खर्ची घातली तरी पुरणार नाही. ‘सातारकर छत्रपती महाराजांची बखर’ नामक शिळा छापाच्या पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या वेळच्या सर्व लहान मोठ्या राजकारणी पुरुषांची जी लांबलचक यादी खाते-प्रकरणशः छापलेली आहे, त्यांत एक चित्पावन औषधालासुद्धां सापडत नाही. मग हे शिवकालापासून कायस्थांशी झगडणारे ब्राह्मण कोण ? आता, ‘ब्राह्मण म्हणजेच चित्पावन’ अशीच जर राजवाड्यांची घाशीरामी व्युत्पती असेल तर, मग कोणाचा तेथे काय इलाच ? शिवकालांत चित्पावनांचे राजकारणी अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राजवाड्यांच्या व मंडळाच्या काय काय धडपडी सुरू आहेत, त्या आम्हांला पूर्ण माहित आहेत. याचे एक नमुनेदार उदाहरण देतो. राजवाड्यांनी नुकताच एका ‘राधामाधवविलास चंपू काव्य’ नामक ग्रंथाचा जीर्णोद्धार केला. त्यांत शहाजी राजांच्या तंजावर येथील राजवैभवाचे कादंबरीच्या धाटणीवर काही वर्णन असून त्यांच्या प्रभावळीतील काही ठळक व्यक्तींची नावे आहेत. या नावांची व्युत्पति लावून त्यांची नातीगोती शोधण्यात राजवाड्यांनी आपल्या संशोधकी अकलेला दिलेले तणावे हास्यास्पद असले तरी मनोरंजक वाटतात. त्यात एक नाव अभेद गंगाधर असे आहे. यावर राजवाड्यांनी ठरविलेली व्युत्पति पहा - ‘‘अभेद-अभयद-अभयंकर-अभ्यंकर. हा अभेद गंगाधर चित्पावन होता.’’ झाले काम. शहाजींच्या दरबारांत चित्पावनांची प्राणप्रतिष्ठा करतांच, शिवकाली चित्पावनांचे अस्तित्व सिद्ध केलेच की नाही ? आमची राजवाड्यांना अशी सूचना आहे, की असले बाष्फळ व्युत्पतिप्रदीप पाजळण्यापेक्षां त्यांनी एकदम ब्रह्मदेवालाच चित्पावनत्वाचा बात्पिस्मा द्यावा की, सगळाच वाद मिटला. अभेद गंगाधराचा अभ्यंकर चित्पावन बनविण्यांत काय फायदा ? एकदम मुळाशीच हात घातलेला बरा. निर्विकार चित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासाचे नुसते वरवर अवलोकन करणारालासुद्धां चटकन समजून येईल की श्री शिव छत्रपतींच्या स्वराज्योपक्रमापासूनचा इतिहास घेतला तर सामाजिक व राजकीय प्रदेशात चित्पावन लोकांचा प्रवेश नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीपूर्वी मुळीच झाला नव्हता. ‘‘कोकणस्थ ब्राह्मण हे प्रथमतः अगदी