कोदण्डाचा टणत्कार: Page 9 of 71

समाजाच्या मुळाशीच हात घालून त्याला निर्माल्यवत् बनविल्याची पुण्याई कमविली आहे. मग कायस्थ प्रभूच अपवाद कसे ठरतील ? उलट, ब्राह्मणांच्या जुलमी घाशीरामीचा मार अखिल ब्राह्मणेतरांपेक्षा कायस्थ प्रभूंवरच विशेष पडलेला आहे. याला कारण कायस्थाची वरचढ बुद्धिमत्ता व ब्राह्मणांना पदोपदी चेंचणारी राजकराण – कुशलता. चालू घटकेला सुद्धां पुणेरी चित्पावनांच्या डोळ्यांत खुपणारे प्रत्येक क्षेत्रातले जबरदस्त शल्य जर कोणते असेल तर ते कायस्थ प्रभूच होय. हे शल्य कोणत्या उपायांनी कायमचे उखडले जाईल, हा एक मोठा बिकट प्रश्न चित्पावनांपुढे गेली दोनशे वर्षे पडला आहे. हीच विंवचना राजवाडे अशी मांडतात - ‘‘कायस्थ समाजाला वेदोक्तसंस्काराचा अधिकार कसा द्यावा, हा प्रश्न गेली दोन अडीचशे वर्षे ब्राह्मण व क्षत्रिय समाजास पडला आहे. हा सामाजिक प्रश्न सुटत असतांना, १) संभाजीचा वध झाला, २) नारायणराव मारला गेला, आणि ३) प्रतापसिंह पदभ्रष्टता पावला.’’ – पृ. ४३, राजवाड्यांच्या समग्र निबंधदीपाचा अगदी थोडक्यांत सांराश काढावयाचा तर, ‘‘शिवकालापासून आजपर्यंत (? ) हा जो कायस्थ ब्राह्मणांचा झगडा चालला आहे, त्याचे अंतरंग काय आहे ? पृ. ३९’’ हे मोठ्या चतुराईने शोधून काढण्याच्या भरांत त्यांनी उपलब्ध सर्व इतिहासांना फांसावर चढवून कायस्थ प्रभू समाजावर खालील ठळक आरोप केले आहेत. आम्ही फक्त ऐतिहासीक मुद्यांपुरतेच आमच्या प्रत्युत्तरांचे क्षेत्र मर्यादित केले आहे. कायस्थांच्या उत्पत्तीविषयी, रक्तशुद्धीविषयी व शूद्रत्वाविषयी राजवाड्यांनी काढलेल्या चित्पावनी प्रलापांविषयी आम्ही काही लिहू इच्छित नाही. गावभवानीच पातिव्रत्याचा दिमाख मिरवू लागली तर तिच्या बाजारबसवेपणाबद्दल कोण घासाघीस करू इच्छील ? कायस्थांवरील आरोप १) संभाजीचा खून व तत्कालीन क्रांति कायस्थांमुळेच घडून आली. २) नारायणराव पेशव्याच्या खुनांत कायस्थ प्रभूंचे आंग होते. ३) सातारच्या महाराजांच्या वतीने दुस-या बाजीरावाच्या विरुद्ध इंग्रजांशी खटपटी करणारे कायस्थ प्रभूच. ४) सातारकर छत्रपति प्रतापसिंह यांच्या पदभ्रष्टतेला मूळ कारण कायस्थ प्रभूच असे ठळक चार आरोप करून, राजवाड्यांनी, पर्यायानेच नव्हे तर विशेष स्पष्टतेने, कायस्थ स्वराज्यद्रोही आहेत ठरविण्याचे पुण्यकार्य केले आहे व या शतकृत्याचा वाटा आपणांस मिळावा म्हणून श्रीमंत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे व दत्तो वामन पोतदार या दोघा ग्रॅज्यूएटांच्या मार्फत भा. इ. सं. मंडळाने राजवाड्यांच्या हाताला हात लावला आहे. महाराष्ट्राच्या भवितव्यतेची रात्रंदिवस काळजी करून करून झुरणीस लागलेल्या राजवाड्यांना वेदोक्तांच्या खटपटी उकरून काढणा-या कायस्थ प्रभूंच्या चळवळींची इतकी जबरदस्त दहशत पडली आहे की या खटपट्यांचा एकदा कायमचा निकाल लावून टाकण्यासाठी, अगदी उठवणीस आल्याप्रमाणे, ते सर्व आब्राह्मण चांडाळ महाराष्ट्रीयांची काकुळतीने विनंती करतात – ‘‘कायस्थ जातिधर्मोन्नति करण्याच्या कामांत तडजोड न झाल्यामुळे स्वराज्यास आपण मुकलो. आतां एकवर्णाच्या वावटळीत समंजसपणे वाट न काढली, तर आपण हिंदु समाजासहि गमावून बसू.’’ पृ. ४९. इतक्या बेजबाबदार आरोपाचा प्रतिकार नुसत्या लेखनशक्तीने होणे नाही. वास्तविक येथे पैजारांचे काम, असली बेअब्रूकारक व अपमानास्पद विधाने बेधडक ‘इतिहासाची साधने’ म्हणून प्रसिद्ध करणा-या मंडळातले लोक एक तर अस्सल पागल असले पाहिजेत किंवा तिलंदाज कटवाले असले पाहिजेत. याच चित्पावनी धोरणाने महाराष्ट्राचा इतिहास घडणार असले, तर तो कोणत्या वळणावर जाणार याचे भविष्य करायला ज्योतिषशास्त्र शिकले पाहिजे असे नाही. मंडळाच्या या बेजबाबदार आरोपाचा समारोपांत विस्तृत समाचार घेणेच बरे. तत्पूर्वी राजवाड्यांच्या इतर आक्षेपांचा यथाक्रम विचार करू. प्रथम ‘कायस्थ ब्राह्मणांचा झगडा’ ही मोठी खुबीदार शब्दयोजना करतांना, त्यांतील ‘ब्राह्मण’ शब्दाच्या व्याखेत राजवाडे कोणाचा समावेश करू पाहतात ? पेशवाई सत्तेच्या जोरावर कित्येक गबाळ देशस्थ व लोभी क-हाड्यांशी जबरीचे मिश्रविवाह ठोकून, गेल्या १५० वर्षात उत्क्रांतीची शर्यत अत्यंत स्पृहणीच वेगाने जिंकणारा राजवाड्यांचा चित्पावन समाज आज स्वतःस जरी ‘ब्राह्मण’ म्हणवीत असला, तरी त्याचा लौकीकी ब्राह्मणपणा अझुन अखिल हिंदु जनास सारखाच मान्य झालेला नाही. इतकेच नव्हे, तर अलोड विद्वता किंवा ‘चित्पावनता’ (अथवा राजवाड्यांच्या विश्वामित्री व्युत्पतींत बोलायचे तर ‘क्षितिपावनता’) आंगी असणारा एकहि चित्पावन शंकराचार्याच्या