कोदण्डाचा टणत्कार: Page 7 of 71

त्यांत छत्रपतींच्या पूर्वजांचा धागा थेट आदी नारायण ब्रम्ह्माच्या बेंबटात नेऊन घुसविला आहे. बरे झाले, ब्राह्म्याच्या पुढचा मार्ग या वंशवृक्षनिर्णायकाला दिसला नाही. नाही तर त्याच्याहि पुढे त्याची मजल गेली असती. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी क्षत्रियब्रुवांचा अभिमान काय विचारतां ? ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या तोंडातून (वांतीसरसे की काय ? ) पडले तर यांची उत्पत्ति थेट चंद्रसूर्याच्या रेतापासून ! चंद्रसूर्यांनी तरी आपल्या जन्मजात क्षत्रियपणाचे आज्ञापत्र ब्रह्ममुखजन्य किंवा ब्रह्मवांत्युत्पन्न भिक्षुकशाहीकडून मिळविले होते की नाही, हे मात्र कळत नाही. शिवाय असाही प्रश्न उद्भवतो की चंद्रसूर्याला जर पूर्वी पोरे झाली, तर त्यांच्या बायका कोण ? का ब्राह्मणांच्या उत्पत्तिसाठी ब्रह्मदेवानेच स्वतःकडे जसे बायकोपण घेतले, तसाच येथेहि प्रकार घडला ? बरे, पूर्वी पोरे झाली तर मग आताच का होत नाहीत ? का चंद्रसूर्याच्या रेताचा खजीनाच आटला ? का एकेका पोरापुरतेच त्यांनी कंत्राट घेतले होते ? आणि एकेक पोरगाच ते प्रसविले म्हणावे तर पुढच्या वेलविस्तारासाठी त्यांनी कोणाच्या पोरींशी लव्हाळी जमविली ? चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या पूर्वजांनी असाच एक धेडगुजरी पौरणीक फार्स आपल्या बोकांडी बसवून घेतला आहे. ‘चांद्रसेनीय’ शब्दाची व्युत्पत्ति ठाकठीक जमविण्यासाठी भटांच्या (बद) सल्ल्यांने त्यांनी एक चंद्रसेन राजा कल्पनेच्या तणाव्यांत निर्माण केला. ‘कायस्थ’ शब्दाची व्युत्पत्ति ‘काये तिष्ठति यः नः कायस्थ’ अशी बसविण्यासाठी, (काल्पनिक अवतार) परशुरामाच्या बाणाला बळी पडलेल्या चंद्रसेनाच्या तरुण गरोदर विधवेला दालभ्य ऋषीच्या आश्रमांत पळविली, तेथे ती बाळंत होऊन, तिच्या ‘कायस्थ’ म्हणजे शरीरांत वसलेला पुत्र जगाचा प्रकाश पहाता झाला. त्याचा वेलविस्तार म्हणजे हे चांद्रसेनीय कायस्थ. किती मूर्खपणाची ही व्युत्पति ! चंद्रसेनाचा पोरगाच तेवढा आपल्या आजच्या उदरांत-देहांत-कायेत-तिष्ठला, ‘स्थ’ झाला आणि बाकीची मानव जाती काय करते ? प्रत्येक प्राणी, कीडमुंगीसुद्धां उत्पत्तिपूर्वी आपल्या आईच्या उदरात ‘कायस्थ’ नसतोच की काय ? मग या ‘कायस्थ’ व्युत्पत्तीचे शहाणपण कशांत ठरविले ते समजत नाही. प्रत्येक भूतजात ‘कायस्थ’च असतो. पण धर्ममार्तंड गागा भटजी, चार वेद आणि सहा शास्त्रे पढलेले बृहस्पती कायस्थ धर्मदीप प्रकरण १ पान १७ ओळ १ वर मोठ्या व्युत्पत्तिकराचा डौल आणून जेहत्ते लिहितात आणि कित्येक विद्यमान भिक्षुकशाहीचे गुलाम कायस्थ प्रभू मोठ्या अभिमानाने वैदतुल्य वाक्य मान्य करतात की – चंद्रसेन भार्योत्पन्नो यः स दाल्भ्यमुनिना चित्रगुप्तवंशस्य कन्यया विवाहितस्तस्मै चित्रगुप्तधर्मो लेखनवृत्यादिरपि दत्त स्तस्मात्तदुत्पन्ना ये चांद्रसेनीय कायस्थारते चित्रगुप्तसमान धर्माणो भवन्ति ।। वाहवा ! काय इतिहास, केवढा धर्माधिकार, केवढी रॅशनल व्यत्पति ! सगळेच काही भिक्षुकी थाटाचे, हो ! पण एवढ्यावरच गाडे थांबत नाही. चांद्रसेनीय कायस्थ हे ‘हैहय कुलोत्पन्न क्षत्रिय’ आहेत. हे सिद्ध करतांना बडोद्याच्या एका मूर्ख कायस्थ संशोधकब्रुवाने भगवान श्री विष्णूवर भयंकर प्रसंग आणून भिडविला आहे. कोठच्याशा एका भिक्षुकी पुराणाच्या आधाराने श्रीविष्णूला त्याने घोड्याचा अवतार देऊन लक्ष्मीलाहि घोडी बनविले व या पारमेश्वरी दांपत्यापासून हैहय क्षत्रियांची उत्पत्ति करविली आहे. स्वतःच्या कुळामुळाचा श्रेष्ठपणा ठरविण्यासाठी देवालाहि घोडा बनविण्यास न कचरणा-या गाढवांच्या माणुसकीचा पुरावा कोण, कसा व कोठे देणार ? खरा इतिहास चांद्रसेनीय हा शब्द अपभ्रंश आहे. मूळ शब्द चांद्रश्रेणीय असा असून, त्यात चंद्रसेन नाही, त्याची बायको नाही, तिच्या पोटातले पोर नाही, दालभ्य ऋषी नाही, परशुराम नाही, कोणी नाही. चांद्रश्रेणीय हा स्थलवाचक शब्द आहे. काश्मिरांतल्या चिनाब नदीच्या खो-याला प्राचीन संस्कृत ग्रंथात चांद्रश्रेणी असे नाव आहे. या खो-यांत किंवा चिनाब नदीच्या कांठच्या प्रदेशात राहणारे ते चांद्रश्रेणीय. नद्यांची नावे मुलींना देण्याचा प्रघात अजूनहि हिंदु समाजात बराच आहे. कायस्थ प्रभूत नद्यांच्या ऐवजी चंपा, मालती, गुलाब किंवा पिरोझ इत्यादि फुलांची नावे मुलींना चिकटू लागली असली, तरी कोणत्याहि ब्राह्मण ब्राह्मणेतर समाजांत मुळीच प्रचलीत नसलेले ‘चिनुबाई’ हे नाव कायस्थ जातीत अजूनहि तुरळक परंपरेने चालत आले आहे. चिनुबाई हे नाव चिनाब नदीवरून उचललेले आहे, हे उघडच