कोदण्डाचा टणत्कार: Page 6 of 71

ब्राह्मणेतर हिंदु समाजाच्या बोकांडी बसलेली आहे. तिचा गागाभट्टाने रुपयाला वीस आणि पुरापूर फायदा घेतला. ब्राह्मणच काय ते कायस्थ प्रभूच्या धर्माधिकाराचे निर्णायक हीच घमेंड राजवाड्यांच्या प्रस्तुत उपद्व्यापांच्या मुळाशी सणसणत आहे. गागाभट्ट दक्षिणेत आल्यावर त्याने येथील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची मख्खी प्रथम नीट अजमावली. एवढा मोठा अतुल पराक्रमी स्वराज्य-संस्थापक शिवाजी व त्याचा बुद्धिवान हस्तक बाळप्रभू चिटणीस, पण केवळ वेदोक्त राज्यभिषेकासाठी दोघेहि भिक्षुकशाहीचे नसुते दासानुदास उर्फ कुत्ते बनलेले दक्षिणी ब्राह्मण तर काय, खुद्द ब्रह्मदेवाच्याही बापाचा बाप बनून बसलेले. गागाभट्ट झाला तरी जन्माचा भटुरडाच ! खरे बोलावे तर दक्षिणी ब्राह्मण म्हणजे सापाची अवलाद एका दंशात पुढच्या बेचाळीस पिढ्यांच्या अंगावर रक्तपिती उठविणारे. बरे, खोटे बोलावे तर शिवाजीकडून मिळणारी गडगंज दक्षिणा उघड्या डोळ्यापुढे ठार बुडते या अडचणीत तो सापडला असता त्याने एक ‘हिंदुस्थानी’ शक्कल लढवून दोनहि प्रतिस्पर्ध्यांना गाढव बनविले व आपली तुंबडी भरून काशीला फरारी झाला. त्यावेळी कायस्थ ‘प्रभू आणि ब्राह्मण’ हा तंटा विशेष जोरात होता. ब्राह्मणांचे म्हणणे थेट राजवाडी. जबरदस्त शिवाजी एकवेळ क्षत्रिय म्हटला तरी चालेल, पण या शिरजोर कायस्थ प्रभूंना शूद्र ठरवा. गागाने ताबडतोब ‘कायस्थ धर्मदीप’ फरकटून दिला भटांच्या पदरात. घ्या हा त्या संकरज कायस्थांच्या धर्माधिकाराचा निर्णय ग्रंथ. ही बातमी बाळाजी आवजीला कळताच तोहि गागाला भेटला आणि म्हणाला, ‘काय गागाभटजी, हे तुम्ही काय केले ?’ हजरजबाबी गागाने उत्तर दिले, ‘अरे ब्राह्मणांना दिलेला दीप संकरज कायस्थांबद्दल आहे. तुझा त्यात काय संबंध ? तुम्हा चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंबद्दल हा पहा मी कायस्थ धर्मप्रदीप लिहिला आहे तो घे.’ झाले. या युक्तीने ब्राह्मण गप्प, बाळाजी गप्प आणि गागाने लाखो रुपयांची दक्षिणा केली गडप. सारांश, दीप आणि प्रदीप या विषयींचा वाद म्हणजे शुद्ध भिक्षुकी कारस्थान होय. यामुळे कायस्थप्रभू, शिवाजी आणि ब्राह्मण हे सर्वच गागाच्या हलकटपणाच्या पचनी पडले. याविषयी विस्तृत माहिती घेऊ इच्छिणारांनी आमचा ‘ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास’ या ग्रंथातील चवथे ग्रामण्य (पृ. ९ ते २०) मुद्दाम अभ्यासावे, म्हणजे अनेक शंकांची निखालस निवृत्ति होईल. हिंदु धर्म आणि हिंदु समाज यांच्या विद्यमान अधःपाताला ब्राह्मणांची भिक्षुकशाहीच मुख्यतः कशी जबाबदार आहे. याचे सप्रमाण स्पष्टीकरण भिक्षुकशाहीचे बंड वगैरे अनेक ग्रंथात आम्ही केलेले आहेच. इतकेच नव्हे तर हिंदवी स्वराज्याचा खून पाडण्यात दक्षिणी भिक्षुकशाहीच विशेषतः कारस्थानी ठरलेली आहे. भिक्षुकशाही गुलामगिरीचा जबरदस्त पगडा मनावर बसेलेल्या पूर्वजांनी शंकराचार्यांची आज्ञापत्रे मिळविण्यासाठी लाखो रुपयांचे शेण केले आणि भटांच्या तोंडून स्वतःस क्षत्रियत्वाचे सर्टिफिकीट मिळविण्यासाठी वाटेल त्या पौराणिक कांदबरीला ब्रह्मवाक्य मानले. यात आज आश्चर्य मानण्याचे कारण नाही. तो काळ तसाच अज्ञानाचा अर्थात मुर्खपणाचा होता. वेदोक्तासाठी पूर्वीच्या कायस्थांनी किंवा शिवाजीच्या जातभाई दक्षिणी मराठ्यांनी भिक्षुकी दास्याचे केवढेहि थेर माजविले असले तरी चालू जागृतीच्या युगात कायस्थ प्रभू व मराठ्यादि इतर ब्राह्णणेतर, ब्राह्मणांना व त्यांच्या वेदोक्त श्रेष्ठत्वाला मुनसिपालटीच्या झाडूच्या खराट्याइतकीहि किंमत देत नाहीत. मग वेदोक्त पुरोणोक्ताचा आज काय भाव आहे ? आज जेथे खुद्द ब्राह्मणांनाच आपले बाह्मण्य सप्रमाण सिद्ध करण्याची पंचाईत पडली आहे, तेथे त्या गुंडांच्या तोंडचा क्षत्रियत्वाचा निर्णय मानणारा टोणगा कोण असेल तो असो ! आजचे कायस्थ प्रभू आणि मराठे त्यांच्या पूर्वजांनी भटांकडून मिळविलेल्या निर्णयपत्रांचे, पौराणिक धेडगुजरी गाथांचे किंवा गागाभट्टादि लुच्च्या भटांनी ठरविलेल्या सामाजीक व धार्मिक उत्पत्त्यांच्या कल्पनांचे गुलाम नव्हते. प्राचीन वंशावळीचे वृक्ष यांच्या शाखा उपशाखा ठरविण्यात ब्राह्मणांच्या कारस्थानी बदसल्ल्यांना बळी पडून अनेक ब्राह्मणेतरांनी आपल्या निर्भेळ परमेश्वरोत्पन्न उत्पत्तीसाठी मांडलेली मूर्खपणाची प्रदर्शने पाहून कौतुक वाटण्याऐवजी तिटकारा उत्पन्न होतो. छत्रपतींचा वंशवृक्ष म्हणून एक मोठे रंगी बेरंगी काशाचे पुस्तक रा. ब. डोंगरे यांनी छापिले आहे. हा नकाशा सातारी गळाठ्यांतच त्यांना सापडला आणि कै. शाहू छत्रपति करवीरकर यांनी हजारो रुपये खर्चून तो रविवर्मा प्रेसात छापविला.