कोदण्डाचा टणत्कार: Page 4 of 71

करण्याच्या भरात येण्यास त्यांना फारसा वेळ लागत नसून, भरांत आल्यावर त्यासंबंधी एकांतिक व अवमानकारक अशी विधाने करण्याचा मोह त्यांना सुटत नाही.’’ केसरीचे हे निस्पृह सर्टीफिकीट प्रस्तुतच्या वादाला किती समर्पक लागू पडते, याचा वाचकांना यथाक्रम, यथाप्रमाण परिचय पुढे होईल. राजवाडे हे संग्राहकाचे संशोधक बनून राहिले नाहीत, तर अलिकडे त्यांनी ‘समाजशास्त्री’ पद पटकविण्याची जारीने खटपट चालू केली आहे. इतिहास संशोधनाच्या उपद्व्यापाला पाठबळ म्हणून समाजशास्त्राध्यनाचा जो खटाटोप त्यांनी आरंभीला आहे, त्यांच्या सांगतेसाठी चित्पावनेत्तर अखिल हिंदु समाजाच्या बीज-क्षेत्र-शुद्धीचे पृथःकरण त्यांनी हाती घेतले आहे. या उत्कंठेची तळमळ त्यांना लागली असतानाच, सातारकर महाराजांच्या हतभागी कागदपत्रांच्या गळाठ्यांत त्यांना कायस्थधर्मदीप नामक जीर्ण महाग्रंथाचे एक पुंडके हस्तगत झाले.

विद्यमान सातारकर महाराज आणि त्यांच्या कारभा-यादि शुभनिशुभांची प्रभावळ हाच मुळी एक मोठा चमत्कारिक गळाठा आहे ! आमची अशी माहिती आहे की सातारा रेकॉर्डमधील कागदपत्रांवर अलीकडे काही वर्षे चांगली पाळत ठेवण्यांत आलेली असून ते नुसते पाहणारांस किंवा चाळणा-यांस ब-याच वशील्याच्या तट्टांची पायधरणी करावी लागते, मग तेथून पुंडकी हस्तगत करण्याची गोष्ट तर निराळीच ! मग राजवाड्यांनाच हे पुंडके कसे मिळाले ? याहि बाबतीत आम्हांला दाट संशय आहे, की या पुडक्याने कोणातरी कारस्थानी प्राण्याचा खिसा थोडा बहुत गरम झाल्याशिवाय ते गळाठ्यांतून बाहेर निसटले नसावे, राजवाडे हे पूर्वीप्रमाणे नुसते संग्राहकच असते, तर त्यांनी या पुडक्यांतील मजकूर तसाच्या तसा छापून ते मोकळे झाले असते, पण ते आतां बनले आहेत समाजशास्त्री. ज्या कायस्थ ज्ञातीबद्दल शब्दाच्या व्युत्पत्या ठरविण्यात ‘कायस्थ इति लघ्वी मात्र’ इत्यादी नाट्य वचनांचा देखील त्यांनी पुरस्कार केला, त्याच ज्ञातीबद्दलचा (?) हा ग्रंथ ! मग काय विचारतां ? या विद्वान समाजशास्त्राचा आनंद गगनांत मावेना. त्यांना चा. का. प्रभूंच्या इतिहासाच्या मुळाशी हात घालण्याची ईर्षा उत्पन्न झाली, आणि आजपर्यंत अध्ययन करून कमविलेल्या समाजशास्त्र प्राविण्याची कसोटी कायस्थ प्रभू समाजाच्या धार्मिक, सामाजिक, नैतिक व राजकीय इतिहासाच्या शिळेवर घासून पाहण्यास त्यांनी कंबर कसली.

मराठी समाज्याच्या स्थिती आणि लय कालांत चित्पावानांना सर्वच बाबतीत पुरून उरणारे असे कायस्थ प्रभूच. त्यांना धुव्वा उडवितां उडवितांच चित्पावन पेशवे रसातळाला गेले खरे, पण ते कार्य अपुरेच राहिले. ते श्री. राजवाडे पूर्ण करणार? पूर्ण करण्यापुरती विश्वसनीय सामग्री जरी लावली नाही, तरी कायस्थ धर्मदीपाची सबब तरी हाती पडली. बस झाले काम. एनकेने प्रकारे या अल्पसंख्य परंतु चित्पावनांना तुल्यबळी किंबहुना शिरजोर असणा-या कायस्थ प्रभूंची अनुलोम प्रतिलोमाच्या भट्टीत दामटी वळवून त्यांचा सामाजिक व धार्मिक दर्जा जाहीर रीतीने पाण्यापेक्षां पातळ केला की राजवाड्यांची तळमळ शांत. ‘माझा नवरा मेल्याचे दुःख नाही, पण तुझ्या कपाळी कूंकू मला पाहवत नाही’ एवढीच सामान्यतः – चित्पावनी हृदयाची तळमळ असते. पण येथेहि राजवाड्यांनी आपल्या विशिष्ट पूर्वापार परंपरेला अनुसरून पिशाच्चाच्या उलट्या पावलांचा क्रम स्वीकारला. असे आमचे मत आहे. कायस्थ प्रभूंच्या घरांतील वांसे मोजण्यास किंवा त्यांच्या उत्पत्तीचे मूळ शोधण्यासाठी त्यांच्या बीजक्षेत्राची ठरवाठरव करण्यास आपल्या मौल्यवान समाजशास्त्रप्राविण्याचा व्याप न करतां, वास्तवीक त्यांनी आपलेच घर प्रथम नीट पारखून पहावयास हवे होते. चित्पावनांस क्षितिपावन ठरविण्याचा अट्टहास करणा-या राजवाड्यांनी आपल्या संशोधक बुद्धीचा दिवा पाजळून आपल्याच ज्ञातीच्या धार्मिक सामाजिक व राजकीय इतिहासाचे घर नीट तपासून पाहिले असते, तर इतिहास संशोधन आणि समाजशास्त्रप्राविण्य या दोन दिव्य रसायनांचे अंजन पडलेल्या त्यांच्या डोळ्यांना क्षितिपावनत्वाचा एखादा शिलालेख किंवा ताम्रपट हस्तगत होण्याचा पुष्कळच संभव होता. शिवाय, हा संभव खराच फलदायी ठरता तर त्यांच्या अध्ययन तपश्चर्येची ही पहिली व ‘भवानी’ कायस्थधर्मदीपाच्या पुण्याईपेक्षां कितीतरी पट अधिक श्रेयस्कर झाली असती, अजूनहि त्यांनी आपल्या चित्पावन समाजाच्या संस्कृतीला समाजशास्त्राचा कस लाऊन पहावा, अशी आमची त्यांस आग्रहाची विनंती आहे. म्हणजे घारे डोळे, पिंगट केस व भुरी कातडी काय काय