कोदण्डाचा टणत्कार: Page 3 of 71

देशबंधूच जेव्हां इतिहास संशोधनाच्या ढोंगाखाली चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभूंवर हा नवीन ग्रामण्याचा हल्ला चढविण्यांत पुढाकार घेतात, तेव्हां हेच खरं देशाचे दुर्दैव नव्हे काय ? ब्राह्मण समाजांच्या मानाने कायस्थ प्रभु हा अत्यंत अल्प संख्यांक परंतु अत्यंत प्रभावशाली समाज आहे. ब्राह्मणेतर समाजांतल्या शेकडो जातीच्या लोकसंख्येपुढेहि हा समाज अगदीच चिमुकला आहे.

अल्पसंख्य आहे, चिमुकला आहे, मितभाषी आहे, चित्पावनांप्रमाणे उठल्या सुटल्या उगाच एखाद्या क्षुद्र बाबीची बोंबाबोंब करणारा नव्हे, तरी देखील बुद्धिमत्तेच्या प्रभावांत तो कोणत्याही महाराष्ट्रीय समाजाला हात धरू देणारा नाही. कायस्थांच्या कलमसमशेरीनेच शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा पाया घातला आणि आजहि तिच्या प्रभावाची दहशत सुबुद्धतेची शर्यत जिंकलेल्या चित्पावनांच्या हृदयांत घुसळा घालत असते. म्हणूनच मंडळाच्या रिपोर्टासारख्या कुंपणाआडून चोरटा गोळीमार त्यांना करावा लागतो. कायस्थ प्रभूंचा बराच इतिहास अझून उजेडात यावयाचा आहे. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा शेंडा बुडखासुद्धां उमगणार नाही, किंवा हे लोक कोणत्या झाडाचे पाले, कोठून आले, पूर्वी कोण होते, राक्षस-वनचर-अनार्य-शुद्र होते की आणखी कोण होते हेहि न समजण्याइतके ऐतिहासिक साहित्य आज उपलब्ध नाही, असा प्रकार मुळीच नाही. पण उपलब्ध इतिहास मुळीच लक्षांत न घेतां, एका फाटक्या तुटक्या चिठो-याचा जीर्णोद्धार करण्याच्या सबबीवर, त्यांच्या सर्व धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कवडीमोल ठरविणारा डेमी ८ पेजी संघाचा तब्बल २२ पानी निबंध छापून काढण्याची मंडळाला जी कुप्रेरणा झाली, तिच्या मुळाशी चित्पावन आणि कायस्थ प्रभु या दोन समाजांतील ऐतिहासिक हाडवैराशिवाय दुसरा कोणताच हेतु संभवत नाही. हे पुढील विवेचनावरून स्पष्ट दिसून येईल. अर्थात प्रस्तुतचा वाद कालमानाप्रमाणे कितीहि विघातक असला, तरी ज्या अर्थी भारत इतिहास-संशोधक मंडळानेच तो उकरून काढून कायस्थ प्रभू समजाला एका प्रकारे यादवी युद्धाचे आव्हान केले आहे, त्या अर्थी होऊ द्याच तर दोन हात असा कोदण्डाचा टणत्कार करून मंडळाच्या सलामीला उलट सलामी देणे आता आम्हास अपरिहार्यच आहे. या अनावश्यक वादाचे पिते श्रीयुत राजवाडे हे इतिहास-साहित्य संग्राहक म्हणून चांगली प्रख्या पावलेले आहेत. ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ शोधून ती संकलीत करण्यांत राजवाडे यांनी जे परिश्रम केले व स्वार्थत्यागाची जी परासीमा गाठली, ती महाराष्ट्रात अक्षरशः अद्वितीय व अत्यंत कौतुकास्पद आहे. आम्ही तर असेहि म्हणतो की श्री. राजवाड्यांचे ‘खंड’ जर बाहेर पडले नसते, तर महाराष्ट्रेतिहासाच्या क्षेत्रांत खरोखरच ‘सर्व अंधार’ पडला असता. राजवाड्यांची ही कामगिरी बहुमोल आहे, इतकेंच नव्हे तर, दुसरा राजवाडे प्रसवायास या महाराष्ट्राला आणखी एक दोन शतकांचीहि तपश्चर्या अपुरी पडेल, असे आमचे प्रांजळ मत आहे. परंतु राजवाड्यांच्या या बहुमोल कामगिरीचे त्यांच्या चित्पावनी हृदयाने पार मातरे केले आहे, असे कष्टाने म्हणावे लागते.

मेंढी दूध देते पण लेंड्यांनी घाण करते, असलाच हा प्रकार आहे. ते कष्टाळू संग्राहक आहेत, पण प्रामाणिक संशोधक नव्हते. ते जेव्हां संशोधकी घमेंडीने संग्रहीत कागद पत्रांतील मजकुराची ठरवाठरव करु लागतात आणि चिकित्सेच्या दिमाखाने विधानांची अंडी उबऊं लागतात, तेव्हां ‘मोडतोड तांबापित्तल’वाल्यानें केमिकल अनालायझरचे काम करण्याचा आंव घालण्यासारखा मूर्खपणा त्यांच्या हातून घडत असतो. इतिहास-संशोधनाचे कामी त्यांनी आजपर्यंत जो खेळखंडोबा केला, कमअस्सल कागदपत्रांनी अस्सलपणाचा बाप्तिस्मा देण्यांत जी हातचलाखी दाखविली आणि एखाद्या क्षुल्लक वेलांटीच्या आधारानें गोलांटी उडी मारून, सुताने स्वर्गाला जाण्याचा कसकसा आणि केव्हां केव्हां उपक्रम केला, त्याची वाच्यता करू म्हटले तर निराळाच ‘मंडळ-धर्म-दीप’ लिहावा लागेल. अनेक इतर संशोधकांनी व विविधज्ञानविस्तारादि मासिकांनी त्यांना वेळच्या वेळी सप्रमाण प्रत्युत्तरे देऊन त्यांचा चित्पावनी खोडसाळपणा महाराष्ट्राच्या नजरेस आणलाच आहे. खुद्द केसरीने ९ जून १९१४ च्या अंकात या राजवाडी माहात्म्याविषयी काय उद्गार काढले आहेत ते पहा - ‘‘मात्र कागदपत्र प्रसिद्ध करण्याच्या कामी एकसूत्रीपणाच्या अभावाच्या दोष त्यांच्या संशोधनाच्या कार्यात उघड दिसून येतो. तसेच थोड्या पुराव्याच्या पायावर अनुमानाची भली मोठी इमारत उठविण्याचे धाडस ते पुष्कळ वेळा करितात; आणि प्रतिपक्षावर टीका