कोदण्डाचा टणत्कार: Page 2 of 71

आणि राष्ट्रीय पुतळे सगळेच पेशव्यांच्या पगडीसारखे अचाट आणि अफाट ! एखाद्या विधवा भटणीची घाणेरडी खाणावळ असली तरी तिचे नाव केवढे अगडबंब ! ‘अखिल भारतीय मानव-जीवन संरक्षक सार्वजनिक अन्नपूर्णा कल्पतरू सदन’ असल्या मालगाडी वजा नावाचे भारत-इतिहास-संशोधक-मंडळ नावाचे एक उपद्व्यापी मंडळ पुण्यास आहे. सगळ्या भारतखंडाचा इतिहास शोधून काढण्याच्या अहमहमिकेच्या काढण्या या मंडळातल्या उपद्व्यापांच्या मानेला लागल्या आहेत. पुण्याच्या चित्पावनी राष्ट्रीय रिवाजानुसार या मंडळालाहि सार्वजनिकपणाचा मुलामा देण्याची व जगांतल्या सर्व अकलेचा कोठावळेपणा आपल्याकडे घेण्याची उत्पादकांनी व प्रवर्तकांनी पुष्कळच खटपट केली असल्यास त्यांत फारसे नवल नाही. थोडक्यांत सांगायचे म्हणेज उप्पर तो और बनवाया है, अंदर की बात बम्मन जाने.

बाहेरचा दिखाऊ भपका तर आकाशाइतक्या सार्वजनिक व्यापकपणाचा, आतली घाण म्हणजे केवळ नाकझरी ! या मंडळाचे वार्षिक रिपोर्ट प्रसिद्ध होत असतात. त्यात मामुली कार्याचा आढावा असल्याशिवाय काही स्वयंप्रतिष्ठित इतिहास-संशोधकबुवांची टिपणें टाचणे मोठमोठे लेखहि असतात. या संशोधकसेनेचे गुरुवर्य उर्फ कॅपटन श्री. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, बी. ए. हे सुप्रसिद्ध एककल्ली गृहस्थ होत. हे मंडळ सार्वजनीक म्हणवीत असले तरी त्यातले कार्यकारी व संशोधन म्हणजे एकजात एकरकमी एका पराचे ब्राह्मण. पुण्याची तर हीच मोठी विशेष आहे. येथील वाटेल ती संस्था किंवा चळवळ घ्या, तिचा गवगवा मात्र मोठ्या सार्वजनिकपणाचा. पण कारभारी पाहिले तर सगळे पेशवे सांप्रदायी ब्राह्मण ! उगाच नावाला एक दोन बावळट ब्राह्मणेतर असली की नाटक रंगले ! एवढी मोठी केसरी-मराठा संस्था, पण भटांशिवाय तिथे कोणाचीच डाळ शिजत नाही, पूर्वी शिजली नाही, पुढे शिजणे शक्य नाही. वाईची प्राज्ञपाठशाळा फक्त निर्भेळ ब्राह्मणांसाठी, इतर कोणाचाहि तेथे शिरकाव नाही. पण अखिल महाराष्ट्रीयांनी या ‘लोकपयोगी’ (?) संस्थेला हमखास मदत करावी म्हणून ‘सार्वजनिक’ केसरीकार दरवर्षी किती तरी स्फुटें खरडीत असतात. भा.इ.सं. मंडळात वाटेल त्याने यावे असा त्याचा जाहीरनामाच आहे. पण जेथे मुळांतच भटांचा सुळसुळाट तेथे इतर जातो कोण मरायला ? आणि गेलाच तर या पेशवाई कारभाराच्या पातळ भाजीत त्या बावळटाची दाद तितकीच लागते. खाणावळीच्या आमटीत डाळीच्या पिचकणाची जेवढी आशा, तेवढीच पुणेरी भटांच्या सहकार्यापासून इतरांना आशा. सदरहू मंडळ कोणत्या परसांतली भाजी हे पहिली तीन वर्षे फारसे कोणालाच माहीत नव्हते. पण लोक जर आपल्याकडे पहात नसले तर आपल्याच घराला आग लावून त्यांचे लक्ष वेधण्याच्या अमानुष युक्तीचा अवलंब करावयाचे ठरवून मंडळाने आपल्या चवथ्या वर्षाच्या रिपोर्टात कायस्थ प्रभूंची बदनामी करणारा श्री राजवाडे यांचा माथेफिरूपणालाहि लाजविणारा एक लेख प्रसिद्ध केला.

हे रिपोर्ट फार महान किंमतीने विकले जात असल्यामुळे ते कोणी फारसे घेत नाहीत. अर्थात हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर बरेच दिवस त्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. वर्तमानपत्रांतील अभिप्रायांकडे पहावे, तो चालू मन्वंतरांतली ही शक्ति बिनशर्त ब्राह्मणांच्याच हाती असल्यामुळे, त्या लेखांतल्या हलकट विधानांची वाच्यता कोण कशाला करतो ? इतकेच नव्हे तर तो लेख मंडळाच्या वार्षिक संमेलनात श्री. राजवाडे यांनी मोठ्याने वाचला, सर्व श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकला, निवडमंडळाने कोहीनुराप्रमाणे निवडला आणि अखेर तो छापून प्रसिद्धहि झाला. पण कोणी हूं का चूं केले नाही. महाराष्ट्रांतील एका सुसंस्कृत समाजाची हकनाहक बदनामी करणारा लेख इतक्या सर्व पाय-या ओलांडून बेधडक बाहेर पडतो आणि मंडळांतल्या अध्यक्षांपासून तो खालच्या झाडूपर्यंत त्याविषयी कोणी चकार शब्दहि काढीत नाही, या गलधटपणाला काय नाव द्यावे हेच समजत नाही. सध्यांचा काळ धार्मिक किंवा सामाजिक बाबतीत तंटे बखेडे करून राष्ट्रीय आकांक्षांना विरोध करण्याचा नव्हे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. इतकेच नव्हे तर प्राचीन हाडवैराची गाडली गेलेली भुते आपापल्या थडग्यांतून कधीकाळी पुन्हा बाहेर पडल्यास महाराष्ट्राच्या भवितव्यतेवर त्यांचा तांडवनृत्याचा केवढा प्राणघातक परिणाम होईल, याचे भेसून चित्र आम्हांला दिसत नाही, अशांतलाहि प्रश्न नव्हे. परंतु राष्ट्रैक्याची सताड पुराणे झोडणारे आमचे पुणेकर चित्पावन