कोदण्डाचा टणत्कार

हे पुस्तक म्हणजे प्रबोधनकारांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सांगावं आणि महाराष्ट्रानं त्याला इतिहास मानावा, अशी तेव्हाची परिस्थिती होती. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या एका मासिकात राजवाडेंनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीला देशद्रोही ठरवलं. राजवाडे कंपू स्वजातीशिवाय इतर जातींना स्वाभीमानी राष्ट्रवादी इतिहासाच्या नावाने त्यावेळी पायदळी तुडवत होता. प्रबोधनकारांनी हे सारं चक्र वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी उलटं फिरवलं. कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी या त्यांच्या पुस्तकानं इतिहास लेखनाला एक नवी दिशा दिली.

 

कोदण्डाचा टणत्कार अथवा भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी

लेखक व प्रकाशक केशवर सीताराम ठाकरे

वज्रप्रहार ग्रंथमाला कचेरी, २० मिरांडाची चाळ, दादर, मुंबई – १४

किंमत दीड रुपया

अर्पण-पत्रिका

प्रतिस्पर्ध्यांच्या निंदेला, कारस्थानांना आणि नानाविध छळांना न जुमानता, धार्मिक व सामाजिक स्वयंनिर्णयाच्या सक्रीय संदेशानें बहुजन समाजाच्या आत्मिक प्रबोधनाचें चिरंजीव राष्ट्रकार्य करणारे प. वा. राजर्षि श्रीशाहू छत्रपति करवीरकर आणि आंग्लाईच्या पहिल्या भर अमदानींत चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभू समाज आत्मज्ञानपराङ्मुख झाला असतां, स्वार्थत्यागपूर्वक जुन्या ऐतिहासिक बखरींचा जीर्णोद्धार करून त्यांच्यांत आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारे इतिहासपंडित प. वा. रायबहादुर भाईसाहेब गुप्ते F. Z. S. यांच्या दिव्यात्म्याला हा टणत्कार साष्टांग प्रणिपातपूर्वक अर्पण असो ! केशव सीताराम ठाकरे प्रास्तविक खुलासा या पुस्तकाची पहिली आवृत्ति कार्तिक शु. १५ त्रिपुरी पोर्णिमा शके १८४० (ता. १७ नवंबर १९१८) रोजी प्रसिद्ध झाली व अवघ्या एकच महिन्यांत सर्व प्रति खलास झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत मागणीचा जोर सारखा वाढतच आहे. पहिली आवृत्ति इन्ल्फुएंझाची साथ अगदी जोरांत असतांना घाईघाईत दोन छापखान्यांत कशी तरी छापून काढली होती. या दितीयाआवृत्तींत पुष्कळच नवीन मजकूर घालून कित्येक अस्पष्ट विधानें स्पष्ट केली आहेत. विशेषतः छत्रपति संभाजींच्या चरित्रावर अगदी नवीन प्रकाश पाडणारा ऐतिहासिक मजकूर वाचकांना प्रथम याच पुस्तकांत पहावयास मिळत आहे. प्रस्तुतचे पुस्तक प्रथमतः भारत इतिहास संशोधक मंडळास प्रत्युत्तरादाखल म्हणून जरी लिहिले होते, तरी विधाने स्पष्ट करतांना घातलेल्या चर्चात्मक मजकुरामुळे त्याचे एकांगी स्वरूप जाऊन, त्याला एका इतिहास विषयक चिकित्सक निबंधाचे स्वरूप आले आहे. किंबहुना असेही म्हणतां येईल की, हे पुस्तक म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे रहस्य अचुक पटविणारे हॅन्डबुकच होय.

भिक्षुकी कारस्थानामुळे क्रान्तीचक्रांत सर्वस्वाचा होम झाला असता आणि हुंडाविध्वसनाच्या चळवळीमुळे आमच्यावर बिथरलेल्या कायस्थ प्रभू निंदकांच्या विरोधाचा जोर भयंकर असताहि ही द्वितियावृत्ति लिहून काढण्याइतकी मनाची शांति ज्या भगवान श्रीकृष्णाने अभंग राखिली त्याला अनन्य भावे साष्टांग प्रणिपात करून, हा टणत्कार निस्पृह व विवेकी देशबांधवांना विचारक्रांतीकारक होवो, अशी अपेक्षा करून, ‘‘शंभर वर्षांपूर्वींचे महाराष्ट्र’’ अथवा “हिंदवी स्वराज्याचा खून” या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशाकडे वळतो. वज्रप्रहार ग्रंथमाला सर्वांचा नम्र सेवक २० मिरांडाची चाळ, केशव सीताराम ठाकरे दादर, मुंबई – १४ श्री शिवजयंती २५ एप्रिल १९२५. ।। जय जय रघुवीर समर्थ ।। कोदण्डाचा टणत्कार अर्थात पुणे भारत-इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी लेखक – केशव सीताराम ठाकरे प्रहर नमतु चापं प्राक्प्रहार प्रियोSहम् । मयि तु कृतनिधाते किं विदध्या परेण ।। - महावीरचरित विषय - प्रवेश पुणे आणि पेशवाई ! महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले भूत म्हणजे चित्पावन पेशवाई आणि या भुताचा भूतखाना म्हणजे पुणे !! पेशवाई ओंकारेश्वरावर कधीच गेली असली तरी तिच्या कोळशाच्या वैभवाची स्मारके पुणेकर चित्पावन आपल्या बुद्धिवैभवांत अजूनहि वरचेवर घटवीत असतात. पुण्यास चाललेल्या नानाविध चळवळी केवळ वर्तमानपत्री डांगो-यांतून ऐकणा-यांना किंवा वरवर पहाणा-या बावटळांना असे वाटते की ही पुणेरी भटमंडळी देशासाठी अगदी जीव द्यायला उठलेली आहेत. केवढे त्यांचे गिरसप्पी वक्तृत्व, काय त्यांचे शिक्षणप्रयत्न, काय त्यांची ती धडापासरी साप्ताहिके, दैनिके आणि मासिके, केवढाल्या त्यांच्या राष्ट्रीय संस्था, किती लांबरूंद त्यांचे रिपोर्ट, केवढे मोठमोठे त्यांचे राष्ट्रीय फंड, राष्ट्रीय पुरुष