काळाचा काळ: Page 9 of 40

आणि कित्येक पोक्त शहाणे आपल्या पांढ-या केसांना कलप चोपडून काळे करण्याची धडपड करतात. पण त्या दोघाहि मूर्खांना पांढ-या रंगाचं रंगेल माहात्म्य मुळीच उमगलेलं नसतं. बनबीर – पांढ-या केसांना काय इतकं माहात्म्य आहे? कर्णपाल – पांढ-या केसांच्या मुत्सद्यांशिवाय आजवर एक तरी राजकारण पार पडलं आहे का सरकार? राजकारणाप्रमाणंच प्रेमप्रकरणात सुद्धा पांढ-या केसांची मध्यस्थी तितकीच उठावदार वठत असते. लग्नं जुळवण्याच्या मोहिमेवर काळ्या केसांच्या कच्च्या तरुणांपेक्षा पांढ-या केसांचे पक्के दर्दी बुद्रुक काय उगाच जातात, खावंद, पांढरे केस म्हंजे बायकांच्या घोळक्यात बिनदिक्कत घुसण्याचा राजरोस परवाना. शिवाय, पांढ-या केसांचे तरुण अलिकडे बायकांना फार आवडतात आणि म्हाता-यांच्या कामचेष्टा कितीहि खोडकर असल्या तरी चिडखोर बायका फारशा वर्दळीवर येत नाहीत. बनबीर – पांढ-या केसांच्या कर्णपालाऐवजी काळ्या केसांचा जयपाळ राणीकडं पाठवण्यात चूकच झाली म्हणायची आमची. कर्णपाल – छे छे छे छे, चूक आणि सरकारकडून? व्हायची नाही. सगळाच व्यवहार त्रयराशिकी पद्धतीनं करून थोडंच चालणार? एका बाईला पाच पोरटी म्हणून दहा बायकांना पन्नास कारटी थोडीच होणार? सम व्यस्त, शक्याशक्य, पात्रापात्र सगळंच नीट पहावं लागतं. रूपमतीपुढं हा कर्णपाल म्हंजे महिषासुर मर्दिनीपुढं टोणगाच म्हटला तरी चालेल. खावंद, राणीच्या वशीकरणाची कामगिरी माझ्यापेक्षा जयपाळच चोख बजावील. अहो, तरुण तरुणी सगळे छांदिष्ट, एकदा एखाद्या गोष्टीचा छंद घेतला, का त्याच्यासाठी जीव द्यायचा. मोठे हट्टी. आपली ही राजकन्याच घ्या ना. बनबीर – राजकन्या? कमलनं काय केलं? कर्णपाल – मेजवानीची सारी तयारी झाली न् हिचा पत्ताच नाही. बनबीर – पत्ताच नाही? गेली कुठं मग ती? कर्णपाल – सारा राजवाडा पालथा घातला..... बनबीर – रूपमतीकडं तर गेली नसेल? कर्णपाल – तिकडेहि शोध केला. बनबीर – मोठी हट्टी पोर. चितोड जिंकला, त्या दिवशी सकाळी आम्ही या कमलचं तोंड पाहिलं. भाग्याची पोर, म्हणून राजकन्येसारखी हिला आम्ही वाढविली. हिच्या हट्टीपणाचा आम्हाला पुष्कळ वेळा राग येतो, पण ती गुणाची पोर समोर आली, का सारा राग जागच्या जागी जिरतो. कर्णपाल, कमलला कुणी काही बोललं तर नाही ना? (दूर पाहून) ती.... ती.... ती कोण तिकडं चालली आहे? कर्णपाल – ती.... ती..... ती...... बटकिची चंचलादासी..... अग ए फटाकडे, इकडं ये. (चंचला येते.) राण्डलेक, चिचुंद्री, बिजलीसारखी इकडून तिकडं. तिकडून इकडं, कंबर लचकावीत, मान फलकावीत न् डोळे मिचकावीत चमकतेस, पण राजकन्या कमलदेवी कुठं आहे? चंचला – ताईसाहेब आत्ताच एकलिंगेश्वराच्या देवळाकडं गेल्या. बनबीर – दर्शन घेऊन नुकतीच ती आली होती ना? मग पुन्हा कशाला गेली? बरोबर कोण आहे? चंचला – कुणी नाही. पाठोपाठ मी जात होते, तर मला दटावून म्हणाल्या, नको येऊस माझ्या मागं. मग मी काय करणार सरकार. बनबीर – मलाच जाऊन तिची समजूत घातली पाहिजे. (जातो) (चंचला जाऊ लागते.) कर्णपाल – अग ए चटकचांदणी, अगदी लांडोरीच्या फणका-यानं चाललीलसशी? चंचला – माझ्यामागं कामं आहेत. कर्णपाल – कामं सगळ्यांच्याच मागं लागलेला आहे. थोडी थांबलीस, तर काय माझ्या उभा-यांनं तुझ्या मखमली नख-यात गरम मसाला पडेल? चंचला – म्हातारे बाबा........ कर्णपाल – तुझा बाप म्हातारा, म्हातारा म्हातारा कुणाला म्हणतेस? मला तु दुस-या लाख शिव्या दे, पण म्हातारा शिवी देशील, तर नाक चिरून मिरच्या भरीन. चंचला – म्हातारा ही कधिपासून शिवी झाली बाई? आता तुम्हाला म्हातारा नाही म्हणायचं, तर काय तरुण म्हणून आरत्या ओवाळायच्या? कर्णपाल – आढीतल्या पाडापेक्षा पिकल्या आंब्याचा दर्जा केव्हाही मोठाच, वयानं म्हातारे, मनानं म्हातारेच असतात, असा काही नेम नाही. तारुण्याच्या भरअमदानीत म्हातारे बनणा-या तकलादी तरुणापेक्षा, म्हातारपणच्या भर अवसानात तारुण्याची कळी टिकवणा-या, माझ्यासारख्या कळीदार जवानाशी, तुझ्यासारखी तरुण फटाकडी, जरा बोलली चालली, किंचित हसली खेळली, जरा नाचली बागडली..... चंचला – (स्व.) म्हातारा आज रंगात