काळाचा काळ: Page 8 of 40

शरम वाटली पाहिजे..... पण रूपमति, तुला माझ्या मागणीला बिनतक्रार मान वाकवलीच पाहिजे. मोठमोठ्या मानधनप्रभूंच्या माना वाकवून, त्यांना माझ्या पायांवर लोळण घ्यायला लावणारा हा बनबीर, या काळाच्या काळाशी गाठ आहे. सामोपचाराची कालमर्यादा संपल्याबरोबर, नादान गुलामांनी थेर माजवलेल्या नीतिशास्त्राच्या नरड्यावर टांच देऊन, रूपमति, तुझ्या निरीला हात घातल्याशिवाय हा बनबीर राहणार नाही. अंक पहिला समाप्त काळाचा काळ अंक २ रा ] [ प्रवेश १ ला स्थळ आणि पात्रे : राजवाड्याचा महाल (कव्हर) विचारमग्न बनबीर शतपावली करीत फिरत आहे. बनबीर – (स्व.) काय बरं हे गूढ असावं ? उदयसिंहाच्या खुनाची बातमी इतक्या झटपट हिच्या पर्यंत कशी गेली?..... जयपाळ?.... जयपाळनं तर सांगितली नसेल?.... पण असं होणार नाही. त्यानं आपल्या इमानाची साक्ष हरवख्त चोख पटवलेली आहे. (कर्णपाल येतो.) कर्णपाल – बनबीर महाराजांचा जयजयकार. बनबीर – कोण? कर्णपाल? अगदी वेळेवर आलास. संताप नि निराशा यानी माझ्या हृदयात घुसळण घातली असता, मनाला धीर देण्यासाठी तुझीच जरूरी होती. कर्णपाल – महाराजांची इच्छा हात जोडून मूर्तिमंत उभी आहे. बनबीर – कर्णपाल, ती हेकेखोर रूपमती..... कर्णपाल - काय, जयपाळला सुद्धा वश होत नाही? बनबीर – आमच्या खास मनधरणीलाहि ती जुमानीत नाही. आम्ही आत्ताच तिची भेट घेऊन आलो, उदयसिंहाच्या खुनाची बातमी तिच्या कानी इतक्या झटपट कशी पडली कोण जाणे. त्यामुळं सारं गाडं एकदम बिथरलं. जयपाळानं तर ही चुगली केली नसेल? कर्णपाल – अशक्य. अगदी अशक्य. सरकारची शंका अस्थानी आहे. जयपाळासारखा हाडाचा चोख माणूस मी आजवर कधि पाहिला नाही. बनबीर – मग सात पहा-यांची तटबंदी फोडून ही बातमी राणीला बिनचूक कशी मिळाली? कर्णपाल – बातम्या न् बायका, शिंदळीच्या दोघींही पळण्यात पटाईत. बोल बोलता स्वर्ग पाताळाचा ठाव घेऊन पृथ्वीवर हजर. गडावर ही बातमी सगळीकडे ज्याच्या त्याच्या तोंडी झाली आहे. बायकांची तोंण्ड म्हंजे बिनबुडाचं भांडं. तिथं काही टिकायचं नाही. रूपमतीच्या दिमतीच्या एखाद्या फटाकड्या बटकीचं तोंड कुठंतरी लागलं असंल अन् तिनं ही बातमी तिला सांगितली असंल. बनबीर – त्या अवदसेला शोधून काढून ठार मारली पाहिजे. कर्णपाल – बेषक बेषक. जीभ कापून जीव घेतला पाहिजे. हासुद्धा राजद्रोहच आहे. पण सरकार, रूपमति म्हणते तरी काय? बनबीर – मी तिची मनधरणी केली, हवी ती लालूच दाखविली, अखेर दटावणीचा वळसाहि दिला. पण या तीनीहि उपायांनी तिच्या हट्टी स्वभावापुढं हात टेकले. मी एवढा काळाचा काळ, पण माझ्या शब्दाला ती रतिमात्र भीक घालीत नाही. कर्णपाल – सरकार, आपलं थोडं घसरलं.... फारसं नाही चुकलं.... पण घसरलं. जयपाळाच्या खटपटिंचा अंदाज घेण्यापूर्वी राणीच्या तोंडाला तोंड देण्याची खावन्दानी उगाच घाई केली. अहो ही बायकांची जात भाटीसारखी मोठी हट्टी. धरायचं ते धरतील, करायचं ते करतील, पण गुरगुरण्या, फुसफुसण्यानं सारा गाव उठवणीला आणतील. पडछाया न् बाया, एकाच सूत्रागोत्राच्या. आपण जों जों त्यांच्या पाठी लागावं, तों तों त्या टिकलीच्या पाठ दाखवून पळतात. पण तुम्ही त्यांच्याकडं पाठ फिरवा मात्र, का चिकटल्याच येऊन त्या पोटाला. बनबीर – तरुणींच्या प्रेमयाचनेत म्हातारे बुद्रुक बरेच वाकबगार असतातसं दिसतं. कर्णपाल – सरकार, प्रश्न अनुभवाचा आहे. रंगेल प्रेमाला ही काळ्या पांढ-या रंगाची कसोटी बिनचूक उमगते. काळ्या कुळकुळीत केसांच्या पार्वतीनं पांढ-याशुभ्र जटादाढीमिशीच्या म्हाता-या शंकरासाठी काय उगाच घोर तपश्चर्या केली? त्याने तिला कितीतरी झिडकारली, फिडकारली पण अखेर पार्वतीनं शंकराच्याच गळ्याला मिळी मारली ना? बनबीर – तारुण्यापेक्षा केसांच्या रंगाची महति विशेष असते म्हणतोस? कर्णपाल – आकर्षणशास्त्रातला हा मोठा गमकाचा मुद्दा आहे सरकार. काळ्याभोर केसांपेक्षा पिंगट भु-या केसांच्या तरुणीकडे सगळ्यांचे डोळे चटकन वळतात, ते काय उगाच? काळ्या डोळ्यांपेक्षा घा-या डोळ्यांची चमक काही न्यारीच असते. काळ्या डोक्यांची तरुण मंडळी पांढ-या केसांची टर उडवतात