काळाचा काळ: Page 7 of 40

खात्री पटलेली आहे. तरीसुद्धा तुझं इमान कसोटीला लावून पहाण्याची आमची लहर लागत आहे. दिल्दार जयपाळ, शास्त्रशुद्ध विवाहाच्या बंधनानं राणी रूपमति माझ्याशी एकजीव झाल्याशिवाय, आमच्या मस्तकावरचा राजकिरीट केव्हाही डळमळीतच राहणार. तू आत्ताच्या आत्ता जाऊन राणीची भेट घे. तिला सांग, अल्पायुषी नव-याच्या पापासाठी, सोनेमोल आयुष्याच्या मातीचा चिखल, अश्रूंच्या अखंड पाटांनी भिजवीत बसण्यापेक्षा, त्या हतभागी नव-याची राज्यलक्ष्मी मनगटाच्या जोरावर हस्तगत करणा-या आमच्या सारख्या दिग्विजयी पुरुषोत्तमाची पट्टराणी होऊन देवानं दिलेल्या आयुष्याचा, तारुण्याचा आणि सौंदर्याचा सदुपयोग कर, अशी राणी रूपमतीची तूं खात्री पटवली पाहिजेस. जयपाळ – यशापयश देवाधीन, प्रयत्नांत कसूर करणार नाही. बनबीर – ती आमची खात्री आहे. जा. आत्ताच्या आत्ता धावत जा. तिच्या पुत्राच्या मृत्यूची बातमी तिच्या कानांवर जाऊन, मनोविकारांच्या सर्व कोमल भावनांना ती पारखी होण्यापूर्वीच तिच्या पाणिदानाची संमती तू मिळवली पाहिजेस. मनाच्या वेगानं जाऊन, तितक्याच तातडीनं राणीच्या मनाला काबीज कर. तिच्या प्रेमदानाचं स्वागत करायला, प्रेमाचे पंख लावून, तुझ्या पाठोपाठ आम्ही आलोच समज. जा. जयपाळ – जोहार. (जातो) बनबीर – कर्णपाल, आत्ताच आपण खरी मात केली. आता मी मेवाडच्या खराखुरा अधिपति झालो. आम्हाला आता एकसुद्धा प्रतिस्पर्धी उरला नाही. विक्रमाजिताच्या राज्यलक्ष्मीप्रमाणंच त्याची पट्टराणी आमची अर्धांगी झाल्यावर, बनबिराची ही विजयी समशेर, दिल्लीला पालथी घालून, काबूल, कंधारच्या डोंगराळ मुलखात पराक्रमाचा धौशा गाजवण्याची कामगिरी हाती घेणार आहे. कर्णपाल – योग्य......... रास्त......... वाजवी. बनबीर – आता तूं एक नाजूक काम केलं पाहिजे. राणी रूपमतीनं आपले वैधव्याचे अश्रू पुसून, शास्त्रशुद्ध विवाहानं आम्हाला निष्कलंक प्रेमाचं पाणिदान करायचं निश्चित ठरवलं आहे, अशी दे एक कण्डी तू लोकांत फैलावून. कर्णपाल – पण राणी वश होण्यापूर्वीच? बनबीर – तिच्या खुशीनाखुशीची कोण पर्वा करतो. बेलाशक दे ही बातमी फैलावून सगळ्या गडावर. सामोपचारानं ती वळली नाही, तर जबरीनं तिला अंकित केल्याशिवाय आम्ही रहाणार नाही. बनबिराच्या इच्छेला विरोध? परमेश्वराची छाती नाही, मग या बंदिवान रूपमतीची काय प्राज्ञा. कर्णपाल – वाहवा. ही शक्कल मात्र नामी खरी. स्वयंभू सत्ताधीशांखेरीज असले मुकाबले पार पडत नसतात. जबरदस्ताच्या जबरीची जरब गाभण नसेल तीहि गाभ टाकील. बनबीर – कर्णपाल, परमारांवर मिळवलेल्या विजयाच्या आनंदोत्सवासाठी आजची सारी रात्र मेजवान्या, नाचगाणे....... कर्णपाल – आणि मदिरापानात.... बनबीर – घालवण्याची आमची इच्छा आहे. कर्णपाल – आणि ती योग्य वाजवी न् रास्त आहे सरकार. बनबीर – आमच्या सर्व लढाऊ सैनिकांनी सुद्धा आजची रात्र बेहोष आनंदात घालवावी, म्हणून आमच्या खास मयागारातल्या कंधारी अनार मद्यार्काची सर्वांना सर्रास सवलत आम्ही देत आहोत. कर्णपाल – द्वारकेच्या यादवांवर ताण. बनबीर – फक्त गस्तीच्या शिपायांना मात्र सक्त मनाई आहे. कर्णपाल – आणि ती वाजवी योग्य आणि रास्तच आहे. गस्तीचे शिपाई मस्तीला आले का सा-या बंदोबस्ताला बस्तीच मिळायची. असली नसती सुस्ती काय कामाची. बनबीर – जा तर मग. आमच्या वैभवशाली मेजवानीच्या व्यवस्थेचे हुकूम जारी कर. कर्णपाल – जो हुकूम. जोहार (जातो.) बनबीर – (स्व.) आत्ताच्या मेजवानीच्या प्रसंगीच राणी रूपमती माझ्या मागणीचा स्वीकार करून, शेजारी बसेल, तर माझ्या आनंदाला सीमा उरणार नाही. या रजपूत स्त्रियांचा मानीपणा एरवी कुणाला कितीहि कौतुकास्पद वाटला, तरी माझ्यासारख्या दिग्विजयी नरकेसरीचा इच्छाभंग होत असताना, त्या मानीपणाची मान्यता कोण मानी मान्य करील ?...... खरं पाहिलं तर रूपमतीच्या बापाजवळ प्रथम मी तिला मागणी घातली. पण पृथ्वीराजाचा मी दासीपुत्र, या सबबीवर त्या उर्मटानं माझ्या मागणीचा धिःकार करून, तिला विक्रमजिताच्या बाशिंगाला आवळली. बनबीर दासीपुत्र आं? पण आज याच दासीपुत्राच्या सत्तेखाली शुद्धबीजाचे हे घमेंडखोर रजपूत माना वाकवून उभे आहेत ना? गुलामगिरीच्या बेशरम फासात माना अडकल्या असताना सुद्धा, शुद्ध रक्ताच्या न् शुद्ध संस्कृतीच्या गप्पा झोडणा-या हिंदूंच्या या पागलपणाला उपमा देताना शरमेलाहि