काळाचा काळ: Page 6 of 40

पाहून, आम्हाला फार आश्चर्य वाटतं. ही सारी भुतावळ उदयसिंहानंच उठवलेली असावी, असं नाही का तुला वाटतं? जयपाळ – सरकार, वावटळ येते न् जाते. पण तिचा आगापिछा उमगणं, कठीणच काम. बनबीर – पण या वावटळीची जरूरच काय? राजकुमाराचं मोकळ्या मनानं स्वागत करायला आम्ही तयार असतां, आमच्या या मेहरबानीचा धिःकार करून, भणंग भिका-याप्रमाणं रानावनात वणवण भटकण्याचं दुर्भाग्य त्यांनी का पत्करावं, या त्याच्या मनाच्या ठेवणीचा तुला काही अंदाज घेता येतो काय? विक्रमाजिताचा अकाल मृत्यू होताच...... जयपाळ – (स्व.) हो. खून म्हंजे अकाल मृत्यूच तो. बनबीर – नुसत्या परंपरेच्या पुण्याईनं उदयसिंह बालराजा गादीवर बसता, तर जयपाळ, एकमेकांची हाडं फोडायला सवकलेल्या, तुम्हा पागल रजपुतांच्या बेबंदशाहीच्या थडग्याखालीच तो जिवंत गाडला जाता आणि या चितोडवर मुसलमानांचा चान्दतारा हमखास फडकला असता. जयपाळ – यात मला तर मुलीच शंका वाटत नाही. बनबीर – बेबंदशाहीची पाळंमुळं खणून काढून, रजपुती सत्तेचा विस्ताराचा मार्ग आम्ही बिनधोक खुला केला. आणि चितोडच्या दरा-यानं उभा हिंदुस्थान धाकात ठेवला. आज चितोडची राजगादी म्हणजे बिनकाटेरी गुलाब पुष्पांची शय्या बनवली आहे आम्ही. वचनाप्रमाणं ती उदयसिंहाच्या हवाली करायला आम्ही तयार असता, त्यानं निव्वळ खोडसाळ द्वेषानं आमच्या सत्तेविरुद्ध दिल्लीच्या पातशहाकडं गुप्त खलबतं करावी, हे काहीसं चमत्कारिक नाही का? जयपाळ – चमत्कारिक तर खरंच सरकार (म्हातारा, कर्णपाल सरदार प्र. क.) कर्णपाल – राजाधिराज बनबीर महाराजांचा जयजयकार असो. बनबीर – कोण? कर्णपाल? काय बातमी घेऊन आलास? आनंदाची का दुःखाची? कर्णपाल – दुःखाची? आता वा-याच्या झुळकीवरसुद्धा दुःखाला थारा मिळेनासा झाला आहे सरकार. चितोडगडाला न् खुद्द महाराजांना माझ्या बातमीचं मोल करता करवणार नाही. उदयसिंहाचा अवतार संपला. जयपाळ – (दचकून) उदयसिंहाचा अवतार संपला ? बनबीर – का? जयपाळ, या बातमीनं तू इतका बावरलास ? पांढरा फिकट पडलास ? तो आमचा कट्टा दुष्मन नव्हता का? जयपाळ – म्हणूनच मला आश्चर्य वाटलं सरकार. कोणत्या मर्दानं सरकारच्या कपाळी हा यशाचा टिळक लावला ? काय, तपशील तरी काय आहे कर्णपाल? कर्णपाल – राजकुमार प्रथम दोन तीन वर्षे आग्रा येथे हुमायून बादशहाच्या आस-याला होता. बनबीर – पण त्याच्यामागे तो शेरशहा शनीसारखा लागला आहे ना? कर्णपाल – होय सरकार, हुमायूनच जिथं पळपुटीच्या घसरणीला लागलेला. तिथं तो या पळपुट्या राजपुत्राला कितीशी मदत करणार? आग्र्याहून उदयसिंह रोठज येथे शेरशहाला शरण गेला..... बनबीर – परधर्मी शेरशहाला शरण? जयपाळ – मूर्तिभंजक सैतानाशी संगनमत? बनबीर – त्या पोराच्या नादी लागून, शेरशहा मेवाडवर चाल करून येता, तर त्याच्या तोंडावर आमचा दोस्त गुजराथचा बहादूरशहा सोडून, आम्ही काट्याने काटा उखडला असता. जयपाळ – आणि खुद्द खावंदानीच त्याचा पार धुव्वा उडवायला काय कमी केलं असतं? बनबीर – अलबत्. पण जयपाळ, राजकारणात अजून तू कच्चा आहेस. जयपाळ – अगदीच. बनबीर – दैत्यांवर दैत्य घालून देवांनी जय मिळवला. तरच ते राजकारण. बरं, पुढं काय झालं? कर्णपाल – इकडून रवाना झालेल्या दोन मारेक-यांनी उदयसिंहाला अखेर कनोज येथे गाठला. तिघांचा भयंकर अटीतटीचा सामना झाला. राजकुमारसुद्धा काही सामान्य असामी नव्हता. पहिल्या झटापटीतच त्याने एका मारेक-याला ठार लोळवला. पण शेवटी दुस-या जोडीदारानं मात्र मात केली. त्याच्या खंजिरानं उदयसिंहाच्या काळजाचा बिनचूक ठाव घेतला. बनबीर – फुटक्या कपाळाच्या कृतघ्न पोरा, तुटली..... तुटली तुझ्या पोरकट महत्त्वाकांक्षेची वावडी. परधर्मियांचे आंगठे चुखण्यापेक्षा, तुझ्या आजाचं, संगराण्याचं रक्त नसानसांत खेळवणा-या या स्वधर्मी चुलत्याची मनधरणी तुला बेइभ्रतीची वाटावी काय? जयपाळ – चुलता म्हणजे पिता. बनबीर – पण या पित्याला रक्तपिता समजून, त्या उद्दाम पोरानं जाणूनबुजून माझ्या मेहरबानीचा धिःकार केला. कर्णपाल – दैव देतं न् कर्म नेतं, ते हे असं. बनबीर – जयपाळ, तुझ्या राजनिष्ठेबद्दल आमची बालंबाल